सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा. २४ सप्टेंबर १८७३ रोजी भारतात आमुलाग्र सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील शोषक लोक धर्माच्या नावाने विविध कर्मकांडांच्या आधारे शेतकरी कष्टकऱ्यांना लुबाडतात. खोटा धर्म सामान्यांच्या माथी मारतात. सामान्यांना कायम अंधश्रद्ध ठेवतात. या साऱ्यातून बाहेर काढून लोकांना विशुद्ध नैतिक, बुद्धिवादी व विज्ञानवादी बनवण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माची निर्मिती केली. त्या दिशेने सामान्यांनी वाटचाल केली पाहिजे अशी भूमिका मांडली. अखंड रचनेच्या माध्यमातून महात्मा ज्योतीराव फुले यांनी त्यांना अभिप्रेत असलेला सत्य धर्म मांडलेला आहे. एका अखंडात ते लिहितात
निर्मिकानें जर एक पृथ्वी केली । वाही भार भली सर्वत्रांचा ॥ तृण वृक्ष भार पाळी आम्हांसाठी । फळे ती गोमटी । छायेसह ॥ सुखसोयीसाठीं गरगर फेरे । रात्रंदिन सारे । तोच करी ॥ मानवांचे धर्म नसावे अनेक । निर्मिक तो एक । जोती म्हणे ॥ एक सूर्य सर्वां प्रकाश देतो । उद्योगा लावी तो । प्राणीमात्रा ॥ मानवासहित प्राण्यांचें जीवन । सर्वांचें पोषण । तोच करीं ॥ सर्वां सुख देई जनकाच्या परी। नच घरी दुरी । कोणी एक ॥ मानवांचा धर्म एकच असावा । सत्यानें वर्तावा । जोती म्हणे ॥ स्त्री-पुरुष सर्व कष्टकरी व्हावे । कुटुंबा पोसावे । आनंदाने ।। नित्य मुलींमुलां शाळेत घालावे । अन्नदान द्यावे । विद्यार्थ्यांस ।। सार्वभौम सत्य स्वतः आचरावे । सुखे वागवावे । पंगु लोकां ।। अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल । स्वतः सुखी व्हाल । जोती म्हणे ।।
या अखंडातील विचार जरी लोकांनी आचरणात आणले तरी त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकते. सुख संपन्नता येऊ शकते. सर्वांच्या मनातील भाबडेपणा जाओ, सर्वांना दांभिकांचा खोटेपणा लक्षात येओ, सर्वांना सत्यशोधनाची दृष्टी प्राप्त होओ आणि सर्वजण सत्य व नैतिकतेच्या मार्गाने वाटचाल करोत ही सदिच्छा.
डॉ.अनंत दा. राऊत कार्याध्यक्ष (केंद्रीय समिती) सत्यशोधक समाज प्रतिष्ठान