समतावादाची लढाई कधीही ब्राह्मण्यवादी नेतृत्वात लढता येणार नाही !

समतावादाची लढाई कधीही ब्राह्मण्यवादी नेतृत्वात लढता येणार नाही !

समतावादाची लढाई कधीही
ब्राह्मण्यवादी नेतृत्वात लढता येणार नाही !

* मित्रांनो, हिंदी पट्ट्यात, किंवा असं म्हणूया की, हिंदी साहित्यात विद्रोहाचा स्वर ही एक अतिशय अलिकडची घटना आहे. हिंदीमध्ये ही क्रांती मार्क्सवादामुळे आली. जर मार्क्सवाद आला नसता, तर हिंदी लेखक अजूनही गगन विहारी लेखन करत राहिले असते.
* मार्क्सवादाने पुरोगामी जाणीवा चेतवल्यात. परंतु त्या जाणिवांनी हिंदीपेक्षा उर्दू साहित्यिकांना अधिक प्रभावित केलं.
* हिंदीत प्रेमचंद हे याच प्रगतीशील जाणीवेचा परिपाक आहेत. म्हणूनच मी प्रेमचंद यांच्या आधीचे हिंदी साहित्य नाकारतो.
* परंतु दलित क्रांतीची वाङ्मयीन जाणीव त्याच वातावरणातून जन्माला आलेली आहे. दलितांनी जन्मापासूनच त्यांच्या सभोवताली अस्पृश्यता, भूक, गरिबी, अपमान, अज्ञान आणि तिरस्काराचे वातावरणच अनुभवले.
* एखादा दलित जेव्हाही आपल्या वस्तीतून बाहेर पडत असे, तेव्हा रस्ता ओलांडताच त्याच्यासाठी संस्कृती बदलत होती. दलितांमध्ये विद्रोहाची जाणीव याच वातावरणाने तयार केली.
* दलितांचा विद्रोह हा मौलिक आहे. एकोणिसाव्या शतकात डॉ. आंबेडकरांच्या क्रांतीने जेव्हा दरवाजावर दस्तक दिली तेव्हा त्याला एक नवीन धार लाभली.
* म्हणून हे लक्षात घ्यायला हवे की, हिंदीमध्ये दलित विद्रोह हाच वास्तविक विद्रोहाचा प्रथम आणि मूलभूत प्रवाह आहे.
* मित्रांनो ! या देशात दोन विचारधारा अस्तित्वात राहिलेल्या आहेत : एक श्रमण विचारधारा आणि दुसरी वैदिक विचारधारा. यामध्ये, पहिली विचारसरणी समतावादी आहे आणि दुसरी विषमतावादी आहे.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांना क्रांतीची आणि प्रतिक्रांतीची विचारसरणी संबोधलेले आहे.
* क्रांतीच्या प्रवाहाचे नेतृत्व कोणत्याही एका जाती आणि वर्गाच्या हाती नाही, तर प्रतिक्रांतीच्या प्रवाहाचे नेतृत्व, म्हणजेच विषमतेवर आधारित विचारसरणीचे नेतृत्व नेहमीच एका विशिष्ट जाती आणि वर्गाच्या, ब्राम्हणांच्या हातात राहिलेले आहे.
* आजही ते इतर कोणत्याही वर्गाच्या किंवा जातीच्या हातात गेलेले नाही आणि यापुढे भविष्यातही याची शक्यता नाही. म्हणून, विषमतेच्या विचारधारेला ब्राम्हणी किंवा ब्राम्हण्यवादी विचारसरणी असेही म्हटले जाते.
* या ब्राम्हण्यवादी विचारधारेला सामाजिक भेदभाव पसंत आहे, उच्च-नीच भाव पसंत आहे, अनेक देवी-देवता पसंत आहेत. वैदिक विचारसरणीला एक देव आवडत नाही. कारण एका देवाच्या नावाने वेगवेगळी मंदिरं उभारता येत नाहीत, अवडंबर माजवता येत नाही,
* एका देवाच्या नावाने भोग आणि शिक्षेची संस्कृती निर्माण करता येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एका देवाच्या नावाने लोकांना धमकावण्याचा उन्माद माजवता येत नाही.
* या ब्राम्हण्यवादी विचारसरणीला स्त्रिया आणि खालच्या वर्गाचं शिक्षित होणं पसंत नाही. कारण, निम्न वर्गाचं शिक्षित होणं ब्राम्हणांच्या वर्चस्वाला धोका निर्माण करते.
* तिला देशातील भौतिक शोध आणि नवीन तंत्रज्ञान पसंत नाही कारण यामुळे त्यांच्या बनावट ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
* तिला विज्ञान पसंत नाही कारण ते त्यांच्या धर्म-सत्तेला धोका निर्माण करते. ही विचारसरणी धर्मग्रंथांवर विश्वास ठेवते आणि सार्वत्रिक वास्तवाकडे दुर्लक्ष करते.
* वास्तविक, ही श्रमण विचारसरणीच्या विरुद्ध ब्राम्हणांची प्रतिक्रांती होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, ती आजीवक, लोकायत आणि बुद्ध यांच्या क्रांतीविरुद्धची प्रतिक्रांती होती.
* प्रतिक्रांतीचा एक काळ असतो, एक कालखंड असतो, पण तो कायम नसतो. भारतातील ब्राम्हणांच्या प्रतिक्रांतीचा कालखंड म्हणजे पुष्यमित्र शुंगाचा काळ होय. या कालखंडात ब्राम्हण ग्रंथ लिहिले गेले, मनुस्मृती लिहिली गेली, बौद्धांच्या विरुद्ध लोकांमध्ये द्वेष पसरवला गेला, बौद्ध विहारे ध्वस्त केली गेली आणि मोठ्या प्रमाणावर बौद्धांचा नरसंहार केला गेला.
* याच कालखंडात स्त्रिया आणि शूद्रांच्याविरुद्ध कठोर कायदे करण्यात आले, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आणि स्त्रियांना घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त करण्यात आले. आंतरजातीय विवाहांना सक्त मनाई होती.
* हे सर्व कडक नियम या पूर्वीच्या काळात अस्तित्वात नव्हते. ब्राम्हण्यवादाची ही प्रतिक्रांती सुमारे दोनशे वर्षे चालली. मग हर्षवर्धनाचा काळ आला आणि ब्राम्हण्यवादाच्या विरोधात मोठा उठाव झाला.
* या बंडाचा काळ हा चौथ्या-पाचव्या शतकातील आहे. हाच कालखंड भक्ती आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्याचा देखील काळ आहे. हे आंदोलन म्हणजे एक फार मोठा विद्रोह होता.
* ती केवळ बंडखोरीच नव्हती, तर विद्रोहाचा महापूर होता. या कालखंडात, शूद्र आणि स्त्री संतांनी ज्ञानाच्या क्षेत्रात एखाद्या झंझावाताप्रमाणे प्रवेश केला. ज्या स्त्रीला ब्राम्हण धर्माने घरात बंदिस्त केले होते, जिच्यासाठी मनूने आपल्या पतीची सेवा करणे हाच एकमेव धर्म ठरवला होता आणि जिला शिक्षणही नाकारले गेले होते.
* त्याच स्त्रीने या कालखंडात संत होऊन ब्राम्हण धर्माविरुद्ध असा काही विद्रोह केला की त्याला अडवण्याची ताकत आजही ब्राम्हणी नेतृत्वात नाही.
* याच शतकात, आजीवक तत्वज्ञानाने ब्राम्हणवादाच्या विरोधात असा काही विद्रोह केला की शंकराचार्यांचा देखील तीळपापड झाला. ‘ब्रम्हसूत्रा’वरील आपल्या भाष्यात त्यांनी आजीवकांना ‘प्राकृत लोक’ अर्थात असभ्य, म्हणजेच अशिक्षित म्हटले.
* यानंतर, आठव्या शतकात, विद्रोहाची दुसरी लाट सिद्धांच्या रूपाने आली, ज्यांचा बाराव्या शतकापर्यंत समाजावर अमिट प्रभाव राहिला. या सिद्धांमध्ये सर्व वर्णांचे लोक होते, ज्यात २८ शूद्र आणि ४ स्त्रिया देखील होत्या.
* यानंतर, दहाव्या शतकात गोरखनाथ झाले, ज्यांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली. नाथ हे शिवभक्त होते. परंतु ते ब्राम्हणवादी विचारसरणीचे विरोधक आणि समतावादी विचारसरणीचे प्रचारक होते.
* आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, नाथांच्या ज्ञान आणि तत्वज्ञानाने संपूर्ण भारताला आपल्या प्रभावाखाली आणलेलं होतं. केवळ संपूर्ण उत्तर भारतातच नव्हे तर काश्मीरपासून नेपाळपर्यंत नाथ तत्वज्ञानाचा प्रभाव होता.
* कल्पना करा की ज्या शूद्रांनी धार्मिक उपदेश दिल्यास त्यांच्या जिभा छाटण्याचा नियम मनूने तयार केलेला होता, ते शूद्र भक्ती आंदोलनाच्या काळात मोठ्या संख्येने संत होऊन धर्मगुरु झालेत.
• ब्राम्हण आणि ब्राम्हणी-धर्म या दोहोंसाठी देखील हे एक मोठे आव्हान होते, कारण मनूच्या नियमानुसार, केवळ ब्राम्हणच धर्मगुरू होऊ शकतो. परंतु या शूद्र संतांचा विद्रोहच इतका तीव्र होता की त्यांनी कुण्याही ब्राम्हणाला आपला गुरु म्हणून स्वीकारले नाही. एवढेच नाही तर, त्यांनी अत्यंत धार्मिक आणि उच्च कुलीन ब्राम्हण संतांना सुद्धा महत्त्व दिले नाही.
* कबीर अशा ब्राम्हण संतांची खिल्ली उडवत म्हणतात – ‘अति पुनीत ऊंचे कुल कहिए, सभा माहिं अधिकाई/ इनसे दिच्छा सब कोई मांगे, हंसी आवै मोहि भाई।’
* ब्राह्मण धर्मग्रंथ आणि कर्मकांडांना या शूद्र संतांनी केवळ नाकारलेच नाही तर त्याविरुद्ध लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी केवळ समता आणि मानव-प्रेम स्थापित करण्यावर भर दिला, ज्याचे अस्तित्व ब्राम्हणी धर्मात कालही नव्हते आणि आजही नाही.
* यासंदर्भात, कन्नप्पार नावाचे नयनार संत सगळ्यात प्रसिद्ध होते. ते निषाद जातीचे होते. त्यांनी ब्राम्हणाला गुरु म्हणून स्वीकारले नाही, तर एका शूद्राला गुरु म्हणून स्वीकारले.
* मीराबाईंनी कुण्या ब्राम्हणाला नव्हे तर, चांभार जातीतील महान संत रैदास साहेबांना आपले गुरु केले होते.
* १५वे शतक येईपर्यंत तर या स्त्री-शूद्र संतांनी वर्णव्यवस्थेचा असा काही गड उद्ध्वस्त केला की भारतातील ब्राम्हणी सत्तेने संतप्त होऊन त्यांचा काटा काढण्यासाठी ब्राम्हण विद्वानांची पूर्ण फौजच मैदानात उतरवली.
* स्त्री-शुद्रांच्या या विद्रोहाचा एक महत्त्वाचा परिणाम असा झाला की, या बंडात गैर-ब्राम्हण जाती सुद्धा सामील झाल्या. क्षत्रिय आणि वैश्य वर्णातील अनेक स्त्री-पुरुष सुद्धा संत झालेत, जे जनतेला धार्मिक उपदेश करून ब्राम्हणांना उघड-उघड आव्हान देत होते.
* पंधराव्या शतकात कबीर आणि रैदासांनी जी क्रांती घडवून आणली, तिने ब्राम्हणवाद आणि वैदिक संस्कृती विरुद्ध समाजात ज्ञान आणि सामाजिक संघर्षाची एक नवीन जाणीवच निर्माण केली नाही तर, अनेक नवीन धार्मिक क्रांत्यांना सुद्धा जन्म दिला. • यांत दोन क्रांत्या अतिशय महत्वाच्या आहेत : गुरु नानक यांची धार्मिक क्रांती आणि गुरु घासीदास यांची सतनामी क्रांती.
* कबीरांनी तर उघडपणे सांगितले की, ब्राम्हण त्यांचा गुरु होऊच शकत नाही, कारण ब्राम्हणाजवळ केवळ पोथिनिष्ठ ज्ञान आहे त्यांच्याकडे समाजाचं वास्तविक ज्ञान नाही. ते म्हणतात, —‘ब्राह्मण गुरू जगत का, साध का गुरू नाहीं/ उरझ-पुरझ कर मर रह्या, चारों वेदा माहिं।’ रैदास साहेब म्हणतात, ‘ब्राह्मण को मत पूजिए जो हो गुण से हीन / पूजिए चरण चंडाल के जो हो ज्ञान प्रवीन।’
* हे एक नवीन सौंदर्यशास्त्र होते, जे गुणांना आणि योग्यतेला महत्त्व देत होते. शंभर वर्षांनंतर, तुलसीदासांनी यावर प्रतिक्रांती घडवून आणताना म्हटले की, ‘पूजिए विप्र सील गुण हीना/ नाहिं न शूद्र गुण ज्ञान प्रवीना।’ म्हणजेच, अयोग्य आणि अज्ञानी ब्राम्हण सुद्धा पूजनीय आहे, तर योग्य आणि ज्ञानी शूद्र देखील आदरास पात्र नाही.
* इथं मी हे स्पष्ट करू इच्छितो की, विषमतावादाच्या विरुद्ध समतावादाची लढाई कधीही ब्राम्हणवाद्यांच्या नेतृत्वात लढता येऊ शकत नाही.
* कबीर आणि रैदास यांत सफल झालेत कारण त्यांनी ब्राम्हण रामानंद यांचे नेतृत्व स्वीकारले नव्हते. ज्यांनी कुणी समाज परिवर्तनाची लढाई ब्राम्हणवादी नेत्याच्या नेतृत्वात लढली त्यांना कधीही यश प्राप्त झाले नाही.
* ब्राम्हण्यवादी प्रवाहाविरुद्ध लढण्याच्या संपूर्ण परंपरेच्या इतिहास जर आपण बघितला तर, हा लढा केवळ तिथेच कमकुवत झालेला आहे, जिथे त्याचे नेतृत्व ब्राम्हणांनी केलेले आहे.
* म्हणूनच ज्योतिबा फुल्यांनी ब्राम्हणवादी टिळकांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणवादी गांधींचे नेतृत्व स्वीकारले नव्हते. याच कारणामुळे ते त्यांच्या क्रांतीत यशस्वी झालेत.
* पंधराव्या शतकात ब्राम्हणवादाच्या विरोधात जो विद्रोह झाला तो पुन्हा थांबला नाही, अखंड सुरू राहिला. सोळाव्या शतकातही तो थांबला नाही, जरी तुलसीदासांनी तेव्हा वर्णव्यवस्थेला पुनर्स्थापित करण्याचा जोरकस प्रयत्न केला.
* तुलसीच्या कालखंडात, ब्राम्हणांना धर्मोपदेश करणारे शूद्र जातीचे लोक इतकया मोठ्या संख्येने होते की, त्यामुळे चिडलेल्या तुलसींना मानसमध्ये लिहावे लागले-—‘बादहिं सूद्र द्विजन्ह सम, हम तुम्ह तें कछु घाटि/ जानइ ब्रह्म सो बिप्रवर आँखि देखाबहिं डाटि।’
* शूद्र द्विजांना म्हणायचे की आम्ही तुमच्यापेक्षा कुठेही कमी नाही, तुमच्यापेक्षा हीन सुद्धा नाही, कारण आम्हीही तुमच्याइतकेच ब्रम्हाला जाणतो, जितके तुम्ही जाणता.
* परंतु, दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर, भारताची सत्ता ब्राम्हणवादी नेत्यांच्या हाती आली. समतावादी समाज निर्माण करणे हा त्यांचा उद्देश अजिबात नव्हता.
* हे सत्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच कळलेले होते. त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या स्वातंत्र्य लढ्यासंबंधी भाष्य करताना म्हटले होते की, स्वातंत्र्याची लढाई केवळ दलित आणि आदिवासी वर्गातील लोकच लढत आहेत; बाकीचे राष्ट्रीय पुढारी हे स्वातंत्र्यासाठी लढत नसून फक्त देशाच्या संसाधनांवर आपला कब्जा करण्यासाठी लढत आहेत.
* हेच घडलं सुद्धा. इंग्रज भारत सोडून जाताच आणि ब्राम्हणांच्या हाती सत्ता येताच, देशातील सगळी संसाधने त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी लोकशाहीच्या नावाखाली ब्राम्हणवादी राज्य स्थापन केले आणि सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी ज्या चळवळी सुरू होत्या, त्या त्यांच्या दडपशाहीमुळे निष्प्रभ होत गेल्या.
* ना दलित-आदिवासींवरील अत्याचार कमी झालेत आणि ना गरिबीचा अंत झाला. समाजात यथास्थिती कायम राखण्यासाठी हिंदू धर्म व्यवस्थेला धारदार करण्यात आले, ज्यामुळे सत्तेच्या आश्रयाखाली ब्राम्हण्यवाद्यांची प्रति-क्रांती दिवसेंदिवस अधिक गतिमान होत गेली. आज ती अत्युच्च शिखरावर आहे.
* हा ह्याच प्रतिक्रांतीचा परिणाम आहे की, फॅसिस्ट शक्तींना सत्तेत येण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. त्याची भूमी स्वातंत्र्य मिळवल्या पासूनच तयार केली जात होती. या शक्तींनी राजकीय सत्तेबरोबरच धर्म आणि वैचारिक स्वातंत्र्यावरही नियंत्रण मिळवले.
* आज परिस्थिती अशी आहे की जो कोणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, त्याला देशद्रोही ठरवले जाते आणि पोलिस व न्यायपालिकेद्वारा त्याला वर्षानुवर्षे तुरुंगात सडवले जाते. एखादा न्यायाधीश जर न्यायप्रिय असेल तर त्याला जामीन मिळतो, अन्यथा तो तुरुंगातच पडून राहतो.
* अनेकांनी तर तुरुंगाच्या कोठडीतच आपला प्राण सोडला. याउलट, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर उघड-उघड हिंसाचार करणारे हिंदुत्ववादी सत्तेच्या छत्र-छायेखाली मुक्तपणे वावरतात. त्यांना कुठलाही उपद्रव करण्याचा, काहीही बोलण्याचा परवाना मिळालेला आहे.
* फॅसिझमच्या या अत्यंत मनुष्य-विरोधी वातावरणात, विद्रोही साहित्य लिहिणे पूर्वीपेक्षा अधिक गरजेचे झालेले आहे. हा काळ इतका गुंतागुंतीचा आहे की आपला बहुजन समाजही आरएसएस आणि हिंदू संघटनांच्या पालखीचा भोई झालेला आहे.
* आपले सध्याचे शंबुक आणि एकलव्य ब्राम्हणवादाच्या रंगात रंगलेले आहेत. ते गळ्यात भगवा गमछा अडकवून, हातात त्रिशूळ घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. ही आमच्या विद्रोहासाठी एक नवीन आघाडी आहे, जी या फॅसिझमने जन्मास घातलेली आहे. म्हणून, आपणास आपल्या समाजातील या भरकटलेल्या लोकांविरुद्ध आपला विद्रोह तीव्र करावा लागेल.
* विडंबना पहा, जगभरातील मागास वर्गांचे संघर्ष संपलेले आहेत, मात्र भारतात ना दलितांचे लढे संपले, ना मागास वर्गाचे लढे संपले, ना आदिवासी समुदायांचे लढे संपले, ना अल्पसंख्याकांचे लढे संपले. आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला, आपल्या मागील पिढ्यांनी संघर्ष केला आणि आपली सध्याची पिढी देखील संघर्ष करत आहे. यापुढे सुद्धा माहीत नाही हा संघर्ष कधी संपणार की नाही.
* हिंदीतील विद्रोही दलित कवी मोहन मुक्त, वसुधैव कुटुंबकम, यत्र नार्यस्तु पूज्जंते आणि सत्यमेव जयते यांना सांस्कृतिक विनोद म्हणतात. आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणू शकतो का? ‘यत्र नार्यस्तु पूज्जंते’ म्हणू शकतो का? ‘सत्यमेव जयते’ म्हणू शकतो का? ते आपण नाही म्हणू शकत. कारण, या पृथ्वीवर आपल्यासाठी प्रेमाचा लवलेश सुद्धा नाही.
* आमच्या स्त्रिया त्यांच्यासाठी आदराला पात्र नाहीत. आणि आमच्यासाठी सत्य, आजही न्यायाची अभिलाषा बाळगत मृत्यूमुखी पडते. म्हणून, मौन तोडणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे आणि लिहिणं देखील गरजेचं आहे.

अनुवाद : Arvind Surwade

0Shares

Related post

अहंकारी मोदी शरद पवारांशी राजकीय नेता म्हणून नव्हेतर मालकांचे मित्र म्हणून सौजन्याने वागतात…!

अहंकारी मोदी शरद पवारांशी राजकीय नेता म्हणून नव्हेतर मालकांचे मित्र म्हणून सौजन्याने वागतात…!

अहंकारी मोदी शरद पवारांशी राजकीय नेता म्हणून नव्हेतर मालकांचे मित्र म्हणून सौजन्याने वागतात…!      …
मराठी बाण्यांची “आत्मशाहीरी” तिचे “मी” पण तुमच्याही ओठी

मराठी बाण्यांची “आत्मशाहीरी” तिचे “मी” पण तुमच्याही ओठी

मराठी बाण्यांची “आत्मशाहीरी”तिचे “मी”पण तुमच्याही ओठी            शाहीर आत्माराम पाटील यांचे जन्मशताब्दी…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी सर्वच विभागाचा निधी वापरला जावा – अबू असीम आजमी यांची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी सर्वच विभागाचा निधी वापरला जावा – अबू असीम आजमी यांची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी सर्वच विभागाचा निधी वापरला जावा – अबू असीम आजमी यांची मागणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *