• 321
  • 1 minute read

समाजवादी, आंबेडकरवादी व डाव्या पक्ष, संघटनांचा पूर्व इतिहास, विचारधारा पाहता तेच महाराष्ट्राला सावरतील !

समाजवादी, आंबेडकरवादी व डाव्या पक्ष, संघटनांचा पूर्व इतिहास, विचारधारा पाहता तेच महाराष्ट्राला सावरतील !

समाजवादी, आंबेडकरवादी व डाव्या पक्ष, संघटनांचा पूर्व इतिहास, विचारधारा पाहता तेच, महाराष्ट्राला सावरतील !

15 व्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय विश्लेषकांच्या जबान व लेखण्या स्तब्ध झाल्या आहेत. या निकालाला शब्दबद्ध करण्यासाठी कुणालाच काही शब्द सुचत नाहीत, अशी परिस्थिती गेल्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच निर्माण झाली आहे.  या पराभवाला काही नावच देता येत नसल्याने घिसापिटा झालेल्या शब्दात अनपेक्षित निकाल म्हणून अनेकांनी आपली जबाबदारी झटकली असली, तरी त्यांची बैचैनी कायम आहे. सरळ व्यक्त होताना कुणीच दिसत नाही, इतकी गंभीर अवस्था सर्वांचीच झालेली आहे. अन अशा सर्व परिस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांची विधानसभा अस्थित्वात येईल व  सरकार ही बनेल. पण राज्यातील जनतेच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी ” बनेलच ” असतील. हे मात्र नक्की.
     महाराष्ट्राला खड्ड्यात घालून, उध्वस्त करून गुजरातच्या विकासासाठी घडपड करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तींचा विजय झालाय, असे पक्के मत आता राज्यातील जनतेचे झाले आहे. आपण ज्यांना मतेच दिली नाहीत, ते निवडून कसे आले ? या प्रश्नाच्या चक्रात सामान्य जनता अडकली असून राज्यातील विरोधी पक्ष जोपर्यंत काही पर्याय उभा करीत नाहीत, अथवा देत नाहीत, तोपर्यंत ही जनता या चक्रातून बाहेर पडू शकणार नाही हे खरे पण असा पर्याय देण्याच्या मानसिकतेत प्रस्थापित म्हणजे महाविकास आघाडीतील तीन ही पक्ष आहेत, असे वाटत नाही. नजिकच्या काळात तरी ते हा पर्याय देतील, असे ही वाटत नाही, इतके हातबल या निकालाने या पक्षांना व या पक्षांच्या नेत्यांना केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होणार आहे. कुणी किती ही अन काहीही प्रयत्न केले तरी मोदींने आपले बगलबच्चे फडणवीस व शिंदेला हाताशी धरून महाराष्ट्राच्या अग्रेसरपणावर, संस्कृतीवर, औद्योगिक क्षेत्रावर व पुरोगामीत्वावर केलेले हमले परतवून लावणे अशक्यच आहे. या उलट ते अधिक तीव्र होतील व महाराष्ट्र रोजच घायाळ होताना आपणाला दिसेल. अन आपण हतबला असू. इतकी अगतिकता या निकालाने राज्यातील जनतेच्या माथी मारलेली आहे.
       या निकालानंतर ईडी, सीबीआयच्या नोटीसांची भिती दाखवून विरोधी राजकीय पक्षांना फोडण्याची गरजच आता भाजपला राहिलेली नाही. वॉशिंग मशीनची ही गरज आता राहिलेली नाही. कारण येणारे सरकार पूर्ण बहुमतातील आहे. शिवसेना उबाठा वगळता मविआमधील काँग्रेस व राष्ट्रवादी- एसपी या पक्षात सरकारच्या विरोधात उभे राहण्याची हिंमतच राहिलेली नाही. विधिमंडळ अथवा रस्त्यावरची लढाई लढण्याची हिंमतच या दोन्ही पक्षामध्ये राहिलेली नाही. तसे ही जनतेच्या प्रश्नांवर हे पक्ष कधीच लढताना दिसले नाहीत. शिंदे – फडणीसाच्या गेल्या अडीज वर्षांच्या सत्ताकाळात राज्यातील उद्योग गुजरातला नेले, या पक्षांनी त्या विरोधात आवाज उठविला नाही की विरोधी पक्षाची भुमिका पार पाडली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेती मालाला हमी भाव, वाढती महागाई, बेरोजगारी, महापुरुषांचा अवमान, अपमान, अल्पसंख्यांकांवरील हल्ले, हमले अन राज्याच्या तिजोरीची लूट आदी कुठल्याच प्रश्नांवर विधिमंडळ अथवा रस्त्यावर लढताना काँग्रेस व राष्ट्रवादी- एसपी या पक्षांना पाहिले नाही. यावेळी तर यांची अतिशय वाईट परिस्थिती असल्याने ते या पलझडीनंतर आपल्याकडे जे काही शिल्लक आहे, ते वाचविण्याचाच प्रयत्न करतील. सरकारशी पंगा घेणार नाहीत. हे त्यांच्या आजपर्यँतच्या राजकीय भूमिकेवरून स्पष्ट होतेय. अशा वेळी महाराष्ट्राला सावरण्याची, आधार देण्याची जबाबदारी समाजवादी, आंबेडकरवादी व डाव्या पक्ष, संघटनांवर आली आहे. अन या पक्षांचा पूर्व इतिहास व विचारधारा पाहता तेच ही जबाबदारी पेलू शकतील, यात काही शंका नाही.
       आपल्या 65 वर्षांच्या राजकीय जीवनात शरद पवारांनी राज्यातील समाजवादी व आंबेडकरी चळवळ खिळखिळी केली. अनेक पक्ष फोडले. या सर्वांची परतफेड त्यांना करावी लागली आहे. महाराष्ट्र वाचविण्याचे सोडा, ते आपला पक्ष व कुटुंब ही वाचवू शकले नाहीत. अन आता जो पराभव त्यांचा झाला आहे, तो त्यांच्या या राजकीय कार्यकीर्दीवर पाणी फिरवणारा आहे. आपल्या राजकीय जीवनात शरद पवारा इतका अपयशी नेता अन्य दुसरा कुठलाच झालेला नसेल. खरं तर त्यांनी गेल्या 5- 10 वर्षांपूर्वीच राजकीय संन्यास घ्यायला हवा होता. तसा त्यांचा विचार ही होता. पण त्यांनी पोसलेल्या विविध क्षेत्रातील तथाकथितांनी त्यांना ते करू दिले नाही. पावसात भिजत दिलेल्या भाषणाची एखाद्या क्रांती लढ्याशी तुलना करीत व 85 वर्षांचा तरुण अशी काही विशेषणे देवून त्यांना संन्यास घेऊ दिला नाही.
       288 सदस्य असलेल्या विधानसभेत 230 पेक्षा अधिक आमदार भाजप व मित्र पक्षांचे निवडून आले आहेत. त्यामुळे मनमानी पद्धतीने राज्य चालविले जाईल. शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी – एसपीचे जे आमदार निवडून आले आहेत, त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवणे ही चूक ठरेल, अशा पद्धतीची त्यांच्या पक्षाची धोरणे राहिली आहेत. त्यामुळे आता समाजवादी, डाव्या व आंबेडकरी पक्ष, संघटनांनी विरोधी पक्षाची भुमिका बजावण्यासाठी सक्रिय होण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिले, त्याच पक्ष, संघटनांवर महाराष्ट्र वाचविण्यासाठी जबाबदारी आली आहे. या पक्षांची विधानसभेत नगण्य ताकद आहे. किंबहुना नसल्यातच जमा आहे. मात्र संसदीय मार्गाने व रस्त्यावरील आंदोलने करून ते राज्याला वाचविण्याचा प्रयत्न जरुर करतील. कारण तोच त्यांचा धर्म आहे.
         भाजपला एक विचारधारा आहे. राष्ट्र निर्माण करण्याचा त्यांचा एक खास अजेंडा आहे. मात्र त्या निर्मितीत माणूस केंद्र बिंदू नाही. उलट त्या माणसाच्या सर्व प्रकारच्या शोषणाला केंद्र बिंदू केले आहे. शोषणावर आधारितच संघ, भाजपचे नव राष्ट्र असेल. पण याचा विरोध करण्याचा कुठलाच कार्यक्रम काँग्रेसकडे नाही,  ना कधी नव्हता. उलट असाच काहीसा लपूनछपून काँग्रेसचा ही हाच कार्यक्रम राहिलेला आहे. अन तेच कल्चर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. पण डावे , समाजवादी व आंबेडकरीवादी विचार हा मानवी विकास व सर्व प्रकारच्या शोषण मुक्तीचा असल्याने येणाऱ्या काळात सर्व प्रकारच्या फॅसिस्ट संकटांना परतवून लावण्यासाठी याच विचारधारेंच्या पक्ष, संघटनांना उभे राहावे लागणार आहे. अन त्यात ही विशेष म्हणजे आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटनांना महत्वाची भूमिका निभावी लागणार आहे.
     मानवी समाजाच्या हिताचे, कल्याणाचे, विकासाचे जे जे काही असेल, त्यास संघ व भाजपची मनुस्मृती अनुमती देत नाही. विरोध करते. त्याच मनुस्मृतीचे दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. आता पुन्हा तीच मनुस्मृती डोके वर काढून देशाच्या लोकशाही व संविधानाला आव्हान देत असेल तर आंबेडकरवादी म्हणून त्या मनुस्मृतीला पुन्हा गाडण्यासाठी उभे राहिले पाहिजे. अन भाजपला गाडण्यातच मनुस्मृतीचा अंत आहे.
……………………………… 
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
 
 
0Shares

Related post

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले जळगांव दि.२२(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)       जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ रेल्वे…
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !        महाराजा शहाजीराजे – जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक…
अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकी व्हाइट हाऊस मध्ये दक्षिण भारतीय महिलांचा उष:काल !       डोनाल्ड ट्रम्प 47 वे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *