सुशोभीकरणाच्या नावाखालील नदीच्या मूळ प्रवाहामध्ये केलेले अतिक्रमण त्वरित दूर करावे.
नदी वाचवा शहर वाचवा
पुणे : आजच पावसाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी नदी परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी केली असता अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत.
सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीच्या मूळ नैसर्गिक प्रवाहामध्ये अतिक्रमण करून सुमारे दोन हजार स्क्वेअर फुटांचे अतिक्रमण करून नदीचा मूळ प्रवाह बंदिस्त करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. सुमारे दोन हजार स्क्वेअर फुट मूळ नदीपात्रात अतिक्रमण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे व याचे गंभीर परिणाम पुणे शहराला आगामी काळात भोगावे लागतील हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
हजारो कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या या नदी सुधार प्रकल्पामधील नदीकाठचा परिसर सुशोभित करून नागरिकांसाठी तो उपलब्ध करून देणे अभिप्रेत होते व आहे , परंतु नदीकाठ उपलब्ध नसल्याने नदीच्या मूळ प्रवाहातच अतिक्रमण करून अनैसर्गिक व कृत्रिम स्वरूपाचा नदीकाठ तयार करण्यात आलेला आहे आणि तो सुशोभित करून आम्ही नदी सुधार प्रकल्प राबवत आहोत असे भासवले जात आहे.
नदीचा नैसर्गिक मूळ प्रवाह कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बंदिस्त करता येणार नाही अडवता येणार नाही हे सर्वत्र सर्वमान्य आहे. असे असताना सुद्धा केवळ राजकीय चमकोगिरीसाठी नदीच्या मूळ प्रवाहामध्ये अतिक्रमण करून सुशोभीकरण का केले जात आहे ? हा प्रश्न आपण पुणेकरांनी विचारायलाच हवा. नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीच्या मूळपात्रामध्ये केलेल्या अतिक्रमणामुळे नदीची नैसर्गिक पूररेषा बदलली गेली आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकरणावर याचा दुष्परिणाम होणार आहे. तसेच नदीपात्राच्या मध्ये हजारो फुटांचे अतिक्रमण करून नदीबंदिस्त केल्यामुळे भविष्यामध्ये याचा मोठा धोका निर्माण होणार आहे.
आम्ही आजच्या निमित्ताने राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की मूळ नदीच्या प्रवाहामध्ये अतिक्रमण करून सुरू असलेले सुशोभीकरणाचे सर्व तर्हेचे कामकाज बंद करून मूळ प्रवाहामध्ये केलेले सुशोभीकरणाच्या नावाखालील अतिक्रमण त्वरित दूर करावे.
– राहुल डंबाळे , अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र