वर्षभरात कोठडीत मृत्यू झालेल्यांची संख्या जवळपास १८००, शिक्षा मात्र तीनच प्रकरणात - ऍड. प्रकाश आंबेडकर
पुणे : पोलिसांच्या कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे नव्या आणि जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याची सरकारला संधी मिळाली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निकालामुळे कोठडीत असताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. सोमनाथ यांची आई आणि कुटुंबीयांनी दाखविलेल्या धैर्यामुळे या प्रकरणातील दोषी पोलिसांना निश्चितपणे शिक्षा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
परभणीतील नवा मोंढा पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटंबीयांना न्याय मिळवून देणाऱ्या ॲड. आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील समस्त वडार समाजातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ॲड. आंबेडकर बोलत होते.
वडार समाजाचे नेते डॉ. अनिल नारायण जाधव यांनी या सत्काराचे आयोजन केले होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी, भाऊ शिवकुमार सूर्यवंशी मंचावर होते. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागातून वडार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, गेल्या वर्षाचा विचार केला तर कोठडीत अटकेत असताना मृत्यू झालेल्यांची संख्या 1800च्या आसपास आहे. या प्रकरणात केवळ तीन घटनांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे. सूर्यवंशी कुटुंबीयांनी दाखविलेल्या धैर्यामुळे कायद्यातील त्रुटी दूर होण्यास मदत होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर कोर्ट या बाबतीत नियमावली तयार करणार आहे. यामुळे देशातील न्यायालयीन कोठडीत मृत्यू कमी होण्याची शक्यता आहे. ही नियमावली देशभर लागू होईल. यापुढे न्यायालयीन कोठडी प्रकरणी पीडितांना न्याय मिळण्याची प्रकिया सुरू होईल. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांच्या बाजूने राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले. यावरून हे सरकार पीडितांपेक्षा पोलिसांच्या बाजूने उभे राहिले, हे स्पष्ट झाले.
जे पोलीस या हत्येत दोषी आहेत, त्यांना अत्यंत कडक शिक्षा कशी होईल, हाच आमचा प्रयत्न असणार आहे. न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी कोर्टाने नियमावली तयार केल्यानंतर इतर पीडितांनाही न्याय मिळण्याची प्रकिया सुरू होईल.
या प्रकरणात उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात कशा पद्धतीने बाजू मांडली याविषयीही त्यांनी माहिती दिली. या प्रकरणात एसआयटी दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एसआयटीने योग्य तऱ्हेने तपास केला नाही तर त्याविषयी तक्रार करण्याची मुभाही मिळाली आहे. समाज व्यक्त व्हायला लागला आहे. समाजातील उर्जेला वाट करून देण्यासाठी संधी मिळावी यासाठी सत्काराचा स्वीकार केल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.