औरंगाबाद खंडपीठाचे 8 दिवसांत SIT स्थापन करण्याचे राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश!
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद!
औरंगाबाद – सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नव्याने स्थापन होणाऱ्या विशेष तपास पथकाकडे सोपवली जातील. तसेच, जर याचिकाकर्त्या विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना SIT सदस्यांबाबत काही आक्षेप असतील, तर त्या न्यायालयात तो नोंदवू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी विजयाबाई सूर्यवंशी यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत SIT चौकशीचे आदेश दिले असून, पुढील तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे.