ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही हवेत फेका, खाली आल्यावर आपल्या दोन पायावर उभा राहतो ?
सध्याचा काळ हा असा आपलेच म्हणणे खरे म्हणणारा आहे. तुम्ही कोणताही विषय काढा. ते जे करतात, जे सुरू आहे त्याचे ते समर्थनच करणार.
महिलांना निवडणुकीआधी दिले गेलेले पैसे मते मिळवण्यासाठी दिलेली लाच आहे असे म्हटले की
सरकारला जनतेसाठी कल्याणकारी योजना आखणे, त्याची केव्हा अंमलबजावणी करायची हे ठरवण्याचा घटनादत्त अधिकार आहे असे सांगतात
एवढ्या जागतिक अनिश्चितेमध्ये शेयर बाजारातील उलथापालथ वित्त निरक्षर, नव्याने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्याना नुकसान पोचवू शकते असे म्हटले की
मग काय सर्वानी सार्वजनिक बँकांच्या किंवा पोस्टाच्या ६ टक्के शून्य जोखीमवाल्या मुदत ठेवींमध्येच आयुष्यभर बचती घालाव्यात का असे विचारतात
इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी भाषेच्या मुळावर येऊन, काही पिढ्यानी मराठी बोली भाषा उरेल असे म्हटले
की जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे म्हणून, मराठीच्या भवितव्याचा विषयच काढत नाहीत
खाजगी इस्पितळे रुग्णांना प्रचन्ड लुटतात असे म्हटले कि विचारतात
म्हणजे त्या गंजलेल्या खाटा असणाऱ्या सरकारी इस्पितळात लोकांनी जावे कि काय?
रस्त्यावर खाजगी वाहनांची संख्या एव्हढी वाढलीय कि ट्रॅफिक जॅममुळे कोणीच वेळेत पोचू शकत नाही ,
त्यावर विचारणार मग काय तुम्हाला बजाज स्कुटर ला आठ वर्षाची वेटिंग लिस्ट वाले दिवस परत हवे आहेत कि काय ?
स्मार्टफोनमुळे कनेक्टिव्हीटी वाढलीय खरी पण सर्वचजण विशेषतः तरुण वर्ग नको तेव्हढा त्याच्या आहारी गेलाय असे म्हटले
कि विचारतात कि मग काय फक्त ट्रिंग ट्रिंग वाजणारा काळा लँड लाईन लोकांनी घरात ठेवायला हवा होता कि काय ?
शेकडो चॅनेल्स मुळे घरातील माणसे सारखे चॅनेल सर्फिंग करीत बसतात, ना धड बातम्या ना करमणूक अशी टीका केली
की विचारतात मग काय त्या सरकारी रतीब घालणाऱ्या दूरदर्शनाची मोनोपॉली कायम ठेवावयास हवी होती कि काय ?
बुद्धीभेद्यांच्या नादाला लागू नका ; त्यांचा अजेंडा बुद्धिभेद करणे हाच असतो. त्यांना तुमच्याशी एंगेज होण्यात, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे जाणून घेण्यात, आपली मते तपासून पाहण्यात काहीही रस नसतो..
संजीव चांदोरकर