हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अंतर्गत एकजूट अधिक मजबूत करण्याची आवश्यकता: माकप

हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अंतर्गत एकजूट अधिक मजबूत करण्याची आवश्यकता: माकप

हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अंतर्गत एकजूट अधिक मजबूत करण्याची आवश्यकता: माकप

१४ ऑक्टोबर २०२४
 
बहुतांशी पूर्वानुमान व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फोल ठरवत हरियाणामध्ये काँग्रेस व मित्रपक्षांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि मित्रपक्षांचा झालेला पराजय ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. 
 
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संविधानविरोधी, लोकशाहीविरोधी व जनताविरोधी धोरणे रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करून समविचारी पक्ष काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या सर्व पक्षांमध्ये समन्वय साधला गेल्यामुळे व इंडिया आघाडीतील या सर्व घटक पक्षांच्या मागे डाव्या विचाराच्या विविध शेतकरी, कामगार, शेतमजूर संघटना, समविचारी विद्यार्थी, युवक व महिलांच्या संघटना, डावे विचारवंत, डावे व लोकशाहीवादी पक्ष तसेच अनेक स्वयंसेवी संघटना ठामपणाने उभ्या राहिल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश प्राप्त झाले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीबरोबर उभे राहात असताना या सर्व पक्ष, संघटना, व विचारवंतांनी नैतिक भूमिका घेत हा पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सर्व शक्तींना इंडिया आघाडीच्या बरोबर ठामपणाने उभे राहण्याची व भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशविघातक वाटचाल रोखण्याची इच्छा आहे. मात्र असे व्हावे यासाठी राजकीय नैतिकतेची नितांत आवश्यकता आहे.
 
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून आयात केलेले किंवा पूर्वी धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी पक्षांना स्वार्थासाठी सोडून गेलेले उमेदवार दिले, तर या संपूर्ण लढाईची नैतिकता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. 
 
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशविरोधी व जनताविरोधी धोरणांच्या विरोधात शेतकरी, कामगार व सामान्य जनतेच्या मनात तीव्र असंतोष आहे. महाराष्ट्रात भाजपने ज्या प्रकारे विविध पक्ष फोडले व त्यासाठी कारस्थाने केली याबद्दल सुद्धा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र असंतोष आहे. या कारस्थानामध्ये सामील असलेल्या अनेक नेत्यांबद्दल सुद्धा जनतेच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. या अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्या कुणालाही महाविकास आघाडीने पुन्हा सामावून घेऊन विधानसभेत उमेदवारी दिली तर ती गोष्ट नैतिकतेला धरून होणार नाही. शिवाय जनतेच्या मनात जे आहे त्यालाही धरून होणार नाही.
 
महाविकास आघाडीच्या शिरस्त नेतृत्वाने ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष व त्याच्या मित्रपक्षांमधून आयात केलेल्या कुणालाही उमेदवारी देऊ नये अशी मागणी या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
 
हरियाणा निवडणुकीमध्ये पराभवाच्या अनेक कारणांपैकी मित्र पक्षांना जागा वाटपाच्या प्रक्रियेत योग्य प्रकारे न्याय दिला गेला नाही हेही एक प्रमुख कारण आहे हे नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये असे होऊ नये यासाठी डाव्या व लोकशाहीवादी पक्षांना सन्मानजनक जागा देऊन सामावून घ्यावे अशी पुन्हा एकदा मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये माकप व डाव्या पक्षांना एकही जागा देण्यात आली नाही, त्यामुळे या पक्षांमध्ये असलेली भावना दुरुस्त करण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे.
 
डावे व लोकशाहीवादी पक्ष आणि संघटना तसेच राज्यातील अनेक स्वयंसेवी संघटना श्रमिक जनतेसाठी अनेक प्रश्नांवर संघर्ष करत आले आहेत. विकासाची पर्यायी नीती व धोरणे मांडत आले आहेत. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर श्रमिकांच्या या प्रश्नांची सोडवणुक कशाप्रकारे केली जाईल व कोणत्या प्रकारची धोरणे घेतली जातील याबद्दल महाविकास आघाडी कडून स्पष्टता असण्याची आवश्यकता आहे. किमान समान कार्यक्रम तयार करून यामध्ये श्रमिकांच्या हिताचे मुद्दे प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. मागणी करूनही महाविकास आघाडी कडून याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे मागणी करत असून किमान समान कार्यक्रमाच्या आखणीमध्ये माकप सर्व डाव्या शक्ती व सामाजिक संघटनांना सामावून घ्यावे व त्यांचे आग्रह किमान समान कार्यक्रमात प्रतिबिंबित होतील या प्रकारे पावले टाकावीत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
 
डॉ. उदय नारकर
राज्य सेक्रेटरी
माकप महाराष्ट्र राज्य कमिटी
0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *