कुर्डुवाडीचे शाहीर बापू जाधव यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी. हा कबीराच्या कुळातील माणूस होता.
कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाठी हाथ जो घर फूंके आपनौ चले हमारे साथ।
रस्त्यावर बसून आपल्या एकतारी शैलीत सुमधुर व खणखणीत आवाजात फक्त प्रबोधनपर गाणी गायची हा त्यांचा शिरस्ता. त्यांची स्वतःची गाणी होतीच. व्यसनांपासून दूर राहण्याचा. नेकीने वागण्याचा साधा सरळ संदेश देणारी. संसारी माणसांसाठी. ती देखील लोकप्रिय झाली. पण वामनदादा कर्डक यांचे शिवरायांच्या आयुष्याचे सार सांगणारे गाणेही शाहीर बापू यांनी जनमानसात सर्वदूर पोहचवले. यूट्यूबवरून ते जास्त लोकांपर्यंत लोकांनीच पोहचवले.
शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण आनंदाने नांदत होते हिंदू आणि मुसलमान …
त्यांची जगण्याची रीत अवलियाला साजेशी. पदपथावर बसून गाणारा हा पथदर्शी आवाज आता थांबला असला तरीही त्याचा अनाहत नाद प्रबोधनाच्या इतिहासातील पानांमधून चिरंतन व्हायला हवा. त्यासाठी त्यांचे जीवनचरित्र लिहिले गेले पाहिजे. बापू जाधव नावाच्या या अवलियाला भावपूर्ण आदरांजली …