पुरस्कार सन्माननीय असतात, पण देणाऱ्यांची मानसिकता, विचारधारा पाहून ते स्विकारले गेले पाहिजेत
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देवून सन्मान केला जातो. यंदा 51 व्यक्ती व 10 संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. राज्यात मतांची चोरी करून स्थापन झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ज्यांना गद्दार म्हणून उभा महाराष्ट्र ओळखतो. संदर्भ ग्रोक ) व ज्यांच्या चिरंजीवावर एका महिलेने शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत, ते समजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या हिंदुत्ववादी सरकारकडून ज्या आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांना व संस्थांना पुरस्कार मिळाले, त्या सर्वांचे ही जाहीर अभिनंदन…! खरे तर अनुसूचित जातीच्या विकास व कल्याणासाठी असणारा सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनांसाठी वापरणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून पुरस्कार विजेते व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यावरच बहिष्कार टाकला असता तर पुरस्कार विजेते आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला असता. पण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, असा हा सारा प्रकार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जातात. या विभागाचा कोटी रुपयांचा निधी अनुसूचित जातींच्या विकासा ऐवजी अन्य कामासाठी वापरणाऱ्या हिंदुत्ववादी फडणवीस – शिंदे सरकारला ज्या 51 महान व्यक्तींच्या सामाजिक कार्याची दखल घ्यावी वाटली, ते खरेच महान असावेत. तसेच ज्या संस्थांना हे पुरस्कार मिळाले त्या संस्था व त्यांचे पदाधिकारी ही महान असावेत. या सर्व महानुभावांचे पुन्हा एकदा अभिनंदन. तसेच आपले सामाजिक कार्य या हिंदुत्ववादी सरकारच्या नजरेत पुन्हा पुन्हा येवून या पेक्षाही मोठा सन्मान या सरकारकडून आपला होवो, ही अपेक्षा.
ज्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी ते मागितले आहेत. मागण्यासाठी व मिळविण्यासाठी काय काय करावे लागले असेल, ते या सामाजिक कार्य करणाऱ्यांनाच माहित. पण एक नक्की पुरस्कार मागून मिळत नाहीत. मागितल्याने फक्त भीक मिळते.
पुरस्कार हे पुरस्कार असतात. पुरस्कार सन्माननीय असतात. पण ते कुणाकडून ही स्विकारायचे नसतात. देणाऱ्यांची मानसिकता, विचारधारा पाहून ते स्विकारले गेले पाहिजेत. चांगले व कर्तृत्ववान लोक हे पाहतात. त्यामुळे हे असे पुरस्कार जाहीर होऊन ही ते नाकारले आपल्या समाजात आहेत. हे असे घडते तेव्हा नाकारणारे पुरस्कारापेक्षा मोठे होतात.