- 44
- 2 minutes read
“हिंदू : एक चकवा” च्या तपपूर्ती निमित्ताने.
हिंदू ही निव्वळ डोमिसाईल संकल्पना आहे. त्यात "धर्म" या अर्थाचे काहीही नाही.
आज “हिंदू : एक चकवा” या पुस्तकाला बारा वर्षे पूर्ण होत आहेत. 11 एप्रिल 2011 रोजी, महात्मा फुले जयंतीदिनी पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. भालचंद्र नेमाडे यांच्या “हिंदू कादंबरीतील भोंगळ प्रतिपादनाचा तातडीचा प्रतिवाद” हे या पुस्तकाच्या जन्माचे तात्कालिक कारण होते. ती हिंदू कादंबरीवरची पुस्तकस्वरुपातली पहिली प्रतिक्रिया होती. नेमाडेंच्या हिंदूची वाड.मयीन समीक्षा असे तिचे स्वरुप नव्हते, तर त्यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या हिंदू शब्दाच्या प्रचंड उदात्तीकरणाच्या निमित्ताने एकूणच हिंदू जीवनपद्धतीचा शोध आणि परामर्श घेण्याचा तो एक छोटासा प्रयत्न होता. त्या प्रयत्नातून एक आशा आणि शक्यता प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे, हिंदू आयडेंटिटीचे उदात्तीकरण करण्याऐवजी जितक्या लवकर तिचे विसर्जन केले जाईल तितक्या लवकर हिंदू समाजाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. आज तर आजूबाजूला मेंदू गहाण टाकलेला बहुजन समाज बघितल्यानंतर आणि त्याच्या त्या अवस्थेचा बेमालूम वापर करून घेणाऱ्यांचे षडयंत्री राजकारण अनुभवल्यानंतर “हिंदू” शब्द झुगारून देऊन “अहिंदू” होण्यातच भारतीय जनतेचे खरे कल्याण आहे, हे स्पष्ट दिसू लागले आहे. ज्यांचे डोळे उघडे आहेत, ज्यांचा विवेक जागा आहे आणि ज्यांना बहुजनांची फरफट थांबविण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना ही अपरिहार्यता लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. ज्यांना “हिंदू वेगळे आणि हिंदुत्ववादी वेगळे” असले शब्दांचे खेळ करत कालापव्यय करायचा आहे, ज्यांचे पुस्तक प्रकाशन, संमेलन, चर्चासत्र असे छान चाललेले आहे, ज्यांची टुमदार घरं अँटीक पिसेसनी ओसंडून वाहत आहेत, ज्यांची मुलं देशविदेशात सेटल झाली आहेत, ज्यांना नेमाडेंच्या आडोशाने आणि देशीवादासारख्या भंपक-बेसलेस ईझमच्या आश्रयाने सांस्कृतिक- बौद्धिक आयुष्य जगायचे आहे, त्यांना ही तातडी आणि तीव्रता लक्षात येणार नाही. हिंदू बहुजन जनतेवर ज्यांचे प्रेम आहे आणि ब्राह्मणी गुलामीत जखडलेल्या लोकांच्या सुटकेसाठी, त्यांच्या उत्थानासाठी ज्यांचे काळीज तुटते आहे त्यांनाच ही अर्जन्सी समजण्याची शक्यता आहे.
हिंदू ही निव्वळ डोमिसाईल संकल्पना आहे. त्यात “धर्म” या अर्थाचे काहीही नाही. गंमत म्हणजे ही वस्तुस्थिती जवळजवळ सर्व पुरोगामी लोकांना माहीत आहे. तरीही तो शब्द टाळावा/त्यागावा असे त्यांना वाटत नाही. “हिंदू” शब्दाविषयी त्यांना इतके आकर्षण का आहे, हे अनाकलनीय कोडे आहे. आजकाल प्रागतिक वर्तुळात “हिंदू धर्म चांगला आहे पण हिंदुत्व चांगले नाही,” हे वाक्य नेहमी ऐकायला मिळते. या विधानाला माझ्या मते गेल्या अर्धशतकातला सामाजिक/वैचारिक क्षेत्रातला सर्वात मोठा विनोद मानायला हरकत नाही. खरं म्हणजे, हिंदू धर्म चांगला असेल तर हिंदुत्वही चांगले असायला पाहिजे. हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या टोकालाच हिंदुत्व म्हणतात ना ? या अर्थाने हिंदुत्व वाईट असेल तर हिंदू धर्मही वाईट असला पाहिजे. ख्रिश्चन हा धर्म आहे आणि ख्रिश्चनत्व हे त्या धर्माचे सारभूतपण आहे. या दोन्ही गोष्टींत विरोध नाही. मुस्लिम हा धर्म आहे आणि मुस्लिमत्व हे त्या धर्माचे अर्करूप आहे. याही दोन्हींत विसंगती नाही. बौद्ध हा धर्म आहे आणि बुद्धत्व हे त्या धर्माचे सारांशसत्व आहे. याही दोन बाबींत अंतर्विरोध नाही. याच धर्तीवर हिंदू हा धर्म असेल तर हिंदुत्व हे त्याचे सारतत्व असणार आणि या दोन्ही गोष्टी एकाच अर्थाच्या असणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदू असणे वेगळे आणि हिंदुत्ववादी असणे वेगळे, हे लॉजिक पटण्यासारखे नाही. फारतर एवढेच म्हणता येईल की, साधा हिंदू माणूस सहिष्णू असतो, आक्रमक नसतो, तर हिंदुत्ववादी माणूस आक्रमक-असहिष्णू असतो. परंतु हे समीकरण अन्यधर्मीय व्यक्तीच्या संदर्भात हिंदू माणूस कसा वागतो त्यानुसार ठरते. या ठिकाणी, इतरधर्मीय व्यक्तीशी वागण्याच्या पद्धतीच्या निकषावर हिंदू माणसाचा विचार न करता त्याचे स्वतःचे जीवनविषयक तत्त्वज्ञान कोणत्या स्वरुपाचे आहे, या दृष्टीने विचार केला पाहिजे. किंबहुना, प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात हाच खरा मूलगामी प्रश्न आहे आणि या बाबतीत सहिष्णू आणि असहिष्णू या दोन हिंदू माणसांपैकी कोणत्याही एकाची बाजू घ्यायला अजिबात वाव नाही. दोघांच्या वर्तनात फरक असला (म्हणजे, त्यातला एक चांगला, एक वाईट असला) तरी दोघांचे धर्मतत्वज्ञान एकसारखेच (म्हणजे वाईटच) आहे.
काही दिवसांपूर्वी राजू परुळेकर यांनी एका दिवाळी अंकात हिंदुत्वावर लेख लिहिला होता. तो लेख सगळीकडे व्हायरल झाला होता आणि त्याची बरीच चर्चा झाली होती. ब्राह्मणी हिंदुत्व वाईट आहे आणि पर्यायाने बहुजन हिंदुत्व चांगले आहे असा सूर असलेला तो लेख होता. अलीकडेच जितेंद्र आव्हाड यांनीही सनातन धर्मावर लेख लिहून धर्मांध हिंदुत्ववाद्यांवर जोरदार हल्ला चढवल्याचे बहुतेकांना विदीत आहे. हाही लेख खूप चर्चिला गेला. त्यात त्यांनी सनातन धर्म हा बहुजनविरोधी ब्राह्मणी धर्म असून बहुजनांनी तो नाकारला पाहिजे, ही भूमिका हिरीरीने मांडली आहे. हे दोन्ही लेख महत्त्वाचे आहेत आणि त्यातून सनातन ब्राह्मणी वैदिक धर्म शोषणकारी आणि बहुजनद्रोही आहे हे सिद्ध करण्याचा प्रभावी प्रयत्न झाला आहे. असे असले तरी त्यातून हिंदू बहुजनांना कोणतीही निश्चित दिशा आणि जगण्याचे कोणतेही फर्म पॅकेज मिळत नाही, ही वास्तवता उरतेच. असे लेख “लेख” म्हणून भारी वाटतात. परंतु ते वाचताना आपण हिंदूच असतो आणि वाचून झाल्यानंतरही हिंदूच राहिलेलो असतो आणि त्यामुळे गोंधळलेल्या दिशाहीन अवस्थेत उरलेलो असतो. कारण ज्या बहुजन हिंदुत्वाची तारीफ आणि भलावण या लेखांमध्ये करण्यात आलेली आहे ते बहुजन हिंदुत्व तत्त्वज्ञानात्मकदृष्ट्या नक्की काय/कसे आहे, याची यथार्थ स्पष्टता ते लेख लिहिणाऱ्यांनाही नसते आणि वाचणाऱ्यांनाही नसते. व्यवस्थित वाचल्यानंतर त्यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ब्राह्मणेतर जातीजमातींच्या वेगवेगळ्या जीवनपद्धती असे या बहुजन हिंदुत्वाचे साधारण स्वरुप आहे आणि त्यामुळे समान पाया लाभलेला एकजीव धर्म या अर्थाने तो धर्म ठरत नाही. धर्म म्हणजे अशी एक सामायिक सांस्कृतिक व्यवस्था, जी त्या धर्मातल्या सर्वांच्या जीवनाला दृश्य आणि अदृश्य स्वरुपात तत्त्व आणि तपशील पुरवत असते आणि सर्वांच्या मनात एकत्वाचा धागा गुंफत “आपण सारे एक आहोत” अशी समान आयडेंटिटी पेरत असते ! या प्रकारची एकत्वाची भावना आणि समान आयडेंटिटी बहुजन हिंदुत्वात आढळत नाही. आणि अवैदिक, अब्राह्मणी इत्यादी नावांनी ती एकजीव स्वरुपात विकसित होण्याची शक्यताही दिसत नाही. कारण स्पष्ट आहे. “आम्ही वैदिक नाही आहोत” या नकारात्मक धारणेवर ती उभी राहू पाहात असल्यामुळे तिच्यात स्वयंभूपण असणे (अथवा येणे) शक्य नाही. त्यामुळे बहुजन हिंदुत्व हे अखेर ब्राह्मणी हिंदुत्वाच्या धारेतच विलीन झाल्याशिवाय राहात नाही.
वास्तविक, बहुजनांच्या शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक वाटचालीत त्यांची स्वतःची बुद्धिझम नावाची स्वयंभू विचारधारा आणि आयडेंटिटी “अंडरकरंट”प्रमाणे त्यांच्यासोबत अव्याहतपणे वाहत-वावरत आलेली आहे, पण तिचा त्यांना पत्ताच नाही. प्रबोधनकार ठाकरे, शरद पाटील, आ. ह. साळुंखे, रा. चिं. ढेरे, गेल ऑमव्हेट, मा. म. देशमुख, रूपा कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या अनेकांनी बहुजन संस्कृतीचा मुख्य गाभा आणि महत्त्वाचा तपशील हा बौद्ध धम्माने व्यापलेला आहे आणि हीच तिची समृद्ध परंपरा आहे हे वारंवार सांगितले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आज बहुजन लोक बौद्ध धर्माऐवजी वैदिक संस्कृतीला पूज्य आणि प्रमाण मानत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. हे चित्र बदलून बहुजनांना त्यांची मूळ बौद्धसंस्कृती कशी प्रदान करता येईल, याचा विचार करण्याऐवजी पोकळ/विस्कळीत स्वरुप असलेले बहुजन हिंदुत्व त्यांच्या गळ्यात मारण्यात सगळ्यांनाच इतिकर्तव्यता वाटते आहे. “तिकडे वैदिकांचे सनातनी ब्राह्मणी हिंदुत्व, तर इकडे आमचे अब्राह्मणी बहुजन हिंदुत्व” अशी shadow identity उभी करून बहुजन समाज सांस्कृतिकदृष्ट्या उभा राहू शकणार नाही हे कुणी ध्यानात घेऊ इच्छित नाही. तो सतत वैदिकांच्याच संदर्भात विचार करेल, वैदिकांच्याच वळचणीला उभा राहील, अशीच ही सर्व रचना आहे.
ही रचना टिकवण्यात कळत-नकळत अनेकांचा हातभार लागला असला तरी ज्यांनी पुरोगामी चळवळींचे पुढारपण केले त्या गांधीवादी, समाजवादी, डाव्या चळवळींचा (ज्यातले बहुसंख्य नेते-विचारवंत हिंदू उच्चवर्णीय होते) वाटा मोठा आहे. त्यांनी इतर सर्व गोष्टी खूप जोमाने केल्या, परंतु सांस्कृतिक परिवर्तनाचा आणि पुनर्रचनेचा कधीही गांभीर्याने विचार केला नाही. उदा. नरेंद्र दाभोलकर हे समाजवादी चळवळीतील गेल्या पन्नास वर्षांतील सर्वाधिक लोकप्रिय नाव. गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट चळवळीतील गेल्या साठ वर्षांतील सर्वाधिक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व. दोघेही अतिशय अभ्यासू, उत्तम वक्ते आणि कुशल संघटक. दोघांचाही दांडगा जनसंपर्क. या दोघांबद्दल, त्यांनी दिलेल्या पुरोगामी योगदानाबद्दल व्यक्तिशः मला अतीव आदर आहे. त्यापोटीच अंधश्रद्धा निर्मूलनावरचे माझे एक पुस्तक मी दाभोलकरांना अर्पण केलेले आहे. पुढेमागे पानसरेंनाही एखादे पुस्तक अर्पण करीन. असे असले तरी एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे या दोघांनाही बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला या घटनेतले मर्म लक्षात आल्याचे किंवा आत्मीयतेने त्यांनी ते समजावून घेतल्याचे कधी दिसले नाही. त्यांनी धर्मांतरावर क्वचित कुठे लिहिले आहे ते अगदीच सुमार आहे. हे तर काहीच नाही. ज्यांची व्यासंग, संशोधन, चळवळ या क्षेत्रात खूप मोठी कामगिरी आहे त्या कॉम्रेड शरद पाटलांनाही बाबासाहेबांचे धर्मांतर समजले नाही. त्यांनी बुद्धाचा आणि धम्माचा व्यासंगपूर्ण अभ्यास केला, हे खरे आहे. पण तो अभ्यासच राहिला. त्याचा विशेष उपयोग झाला नाही. ते १९५६ ला जे बौद्ध झाले त्यांच्या चुका काढत राहिले. त्यांच्या कोणत्याही पुस्तकातले कोणतेही पान उघडा, तिथे बुद्ध सापडतोच सापडतो. प्रश्न हा आहे की, त्यांना बुद्ध इतका महत्त्वाचा वाटत होता तर मग त्यांनी तो का स्वीकारला नाही ? कोणती अडचण होती ? बुद्धाचा वारसा पुढे नेणे, “बौद्ध” म्हणून जगणे, ही त्यांना त्यांची स्वतःची जबाबदारी का वाटली नाही ? बुद्ध काय महाराष्ट्रातल्या महारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी होता काय ? बुद्ध आमचा आहे, तो आम्ही तुम्हाला देणारच नाही, अशी कुठल्या नवबौद्धाने गर्जना केली होती काय ? अशी कोणती प्रेरणा होती जी त्यांना बुद्घापासून दूर घेऊन गेली ? आयुष्यभर बुद्ध बुद्ध केले आणि शेवटी नेमाडेंच्या “हिंदू”वर भाळले, ही त्यांनी स्वतःच्याच तपस्येशी केलेली घोर प्रतारणा नव्हे काय ?
या पार्श्वभूमीवर मला लक्ष्मण माने, हनुमंत उपरे ही माणसं ग्रेट वाटतात. त्यांनी हाती घेतलेल्या विषयाचा नीट विचार केला आणि पटल्यानंतर शेवटपर्यंत तडीस नेला. मधेच टाकून दिला नाही. अनावश्यक शब्दच्छल न करता कृतीला प्राधान्य दिले. स्वतः तन-मन-धन अर्पून “चलो बुद्ध की ओर” ही चळवळ उभी केली. मला, माझ्या समाजाला बुद्धाची गरज आहे, त्यामुळे मलाच ती चळवळ संघटित करावी लागणार, हा जबाबदारयुक्त पवित्रा त्यांनी घेतला आणि त्या दिशेने जोरदार काम केले. व्यक्ती म्हणून त्यांना मर्यादा नव्हत्या का ? जरूर होत्या. त्यांच्यात कमतरता नव्हत्या का ? त्याही होत्या. मानवी स्वभावाचे अडसर नव्हते का ? होते. पण सांस्कृतिक परिवर्तनाच्या संदर्भात विचार करण्यात त्यांनी प्रांजळ प्रामाणिकपणा दाखविला. भूमिका घेण्यात बोटचेपेपणा केला नाही. बहुजनांपर्यंत धम्म नेण्यात पुढाकार घेतला. तो अमूक बौद्ध माणूस मला असं असं (वाईट) बोलला, अशी लहान मुलासारखी रडगाणी गायली नाहीत. कुणी बुद्धिस्ट समोर आला की “जयभीम” म्हणायची नाटकं केली नाहीत. “मानियले नाही बहुमता” हे तुकारामवचन प्रत्यक्ष जगण्याची धमक दाखविली.
आज प्रबोधनाच्या प्रक्रियेचा मुळातून पुनर्विचार करण्याची प्रचंड गरज आहे. “फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर” असल्या घोषणा देणाऱ्यांकडून विशेष काहीच होणार नाही. हे लोक मला सपक आणि उथळ वाटतात. मोर्च्यात जोश येण्यासाठी, कार्यक्रमाची वातावरणनिर्मिती म्हणून या घोषणा ठीक आहेत, पण प्रत्यक्ष कार्यक्रमाचा तपशील काय ? भूमिका काय ? विद्रोहीवाल्यांकडून तर आता कसलीच अपेक्षा उरलेली नाही. त्यांचे सगळे लक्ष अखिल भारतीयवाल्यांच्या तारखा कधी डिक्लेयर होताहेत, याकडे लागलेले असते. त्या तारखांना त्यांच्यासमोर यांचे संमेलन झोकात पार पडले की गंगेत घोडे न्हाले ! गाण्याचे एखादे सत्र कमी करून धर्मांतरावर परिसंवाद ठेवावा असं चुकूनही यापैकी कुणाला वाटत नाही. नुसत्या घोषणा देऊन आणि गाणी म्हणून कसली सांस्कृतिक क्रांती होणार आहे ? अधिष्ठान आणि आयडेंटिटी कधी बदलणार ? त्यासाठी आवश्यक असलेली भूमिका कधी घेणार ?
बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवल्यात पहिले विद्रोही संमेलन घेतले आणि 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी नागपूरात शेवटचे संमेलन घेतले. विद्रोही चळवळीचा लॉजिकल एंड केला. व्यक्तिजीवनात आयुष्यभर विद्रोह करायचा नसतो. नवरा महाभयंकर असेल तर त्याच्याशी आयुष्यभर भांडत बसायचे नसते. तो बदलण्याची/सुधारण्याची सुतराम शक्यता नाही हे सिद्ध झाले की एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून नवी उभारी घ्यायची असते आणि त्यानुसार नवी मांडणी करायची असते. बाबासाहेबांनी 56 ला ही नवी मांडणी केली. विद्रोहात शत्रूला महत्त्व मिळते. विद्रोहाचा तर्कशुद्ध शेवट करायचा असेल तर शत्रूला महत्त्व न देता स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. मी स्वतः कसा जगणार हे ठरवायचे असते. मी बुद्धिझमनुसार जगणार, हे बाबासाहेबांनी ठरविले आणि नंतर त्यांच्या लाखो अनुयायांनी ठरविले. जो पुढे नेतो तो नेता असतो. जो कोंडी फोडतो तो नेता असतो. नेत्याच्या भूमिका अनुयायांना प्रेरणा देत असतात. नेत्याचे धैर्य कार्यकर्त्यांना धैर्य देत असते. आजकालच्या बहुजन चळवळीत खुद्द नेतेच “बोलू का नको”, “भूमिका घेऊ का नको” अशा संभ्रमावस्थेत गुदमरून-घाबरून गेले आहेत. सांस्कृतिक राजकारण करत असल्याचा आव तर मोठा आणतात ! दसऱ्याला घट बसवायचे, आदिवासींचे नाचाचे कार्यक्रम ठेवायचे, हे यांचे मोठ्यात मोठे सांस्कृतिक राजकारण ! इयत्ता वाढायला तयार नाही अद्याप या मंडळींची !
विषय निघालाच आहे तर इथे हे सांगितले पाहिजे की, आदिवासींच्या जीवनाचे उदात्तीकरण करण्याची आवश्यकता नाही. त्यांची पारंपरिक संस्कृती, गाणी आणि चित्र-नृत्यादी कलाविष्कार यांचे प्रदर्शन मांडून कोणताही विद्रोह यशस्वी होणार नाही. उलट, त्यांना त्यांच्या जगण्याबद्दल पुनर्विचार करण्याची गरज लक्षात आणून दिली पाहिजे. त्यांना अवगत असलेल्या विविध कला हे मोठेच संस्कृतीसंचित आहे. पण त्यांचा जीवनस्तर (standard of life) अत्यंत खालावलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्या मूलभूत विकासाला चालना देण्यासाठी संपूर्ण ताकद लावली पाहिजे. आमची लाईफ स्टाईल खूप छान आहे, या आनंदात त्यांना मश्गूल ठेवता कामा नये. ब्राह्मोभांडवली व्यवस्थेकडून त्यांचे शोषण होत असले आणि त्याविरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता असली तरी हे शोषण होत नसतानाच्या काळात आदिवासींचे आयुष्य सुखाचे-आनंदाचे होते (वा सध्या आहे) असे कुणीही शहाणा माणूस म्हणू धजणार नाही. दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा अशा अनेकविध समस्यांनी त्यांना वेढलेले आहे. हा त्यांचा मूलभूत प्रश्न आहे. त्यांचे व्यवस्थेकडून होणारे शोषण हा वेगळा प्रश्न आहे. दोन्हींत फरक आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल असमाधान निर्माण केले पाहिजे. आदिवासी म्हणून जगण्यात काहीही सुंदरबिंदर नाही. या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन महारांच्या बाबत जशी भूमिका घेतली तशी भूमिका परिवर्तनवाद्यांनी आदिवासींच्या बाबत घेतली पाहिजे. जनजागृतीच्या पूर्वार्धात आंबेडकरांनी महारांचा देदीप्यमान इतिहास जागविला. महार जातीची अस्मिता तप्त अंगारासारखी फुलविली. त्यासाठी भूतकाळातील पराक्रमांची धगधगती साक्ष काढली. पण नंतर उत्तरार्धात महार असणे नाकारले. महारत्व फेकून दिले. एकाच वेळी दोन्ही पातळ्यांवर (पण विरुद्ध दिशेने) महार जात (आणि एकूणच अस्पृश्य समाज) चैतन्यमय केला आणि आधुनिकतेच्या वाटेवर आणून सोडला. त्या आधुनिकतेचे नाव धम्म होते. आदिवासींनी या टप्प्यांनी मार्गक्रमण केले पाहिजे. जल-जंगल-जमीन हा धर्म नसतो. ती जगण्याची साधने असतात. ती बदलतात, बदलू शकतात. या धामधुमीत प्रगल्भ तत्त्वविचार हाताशी असेल तर जगणे सुसह्य बनते, योग्य दिशा पकडते, नवी झेप घ्यायला प्रेरणादायी ठरते. तो प्रगल्भ तत्त्वविचार म्हणजे बुद्धिझम होय.
गेल्या दोन महिन्यांपासून राहुल गांधींनी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे आणला आहे. अदानीचे वीस हजार कोटी रुपये कुठून आले, हा तो प्रश्न. या प्रश्नाची खरोखर निःपक्षपाती चौकशी झाली तर केंद्र सरकार डळमळू शकते इतके potential त्यात आहे. पण त्यामुळेच त्या विषयाला बगल देण्यासाठी वेगळेच मुद्दे पुढे आणले जात आहेत आणि मूळ मुद्द्यावर चर्चाच होणार नाही याची पराकाष्ठा केली जाते आहे. बौद्ध धर्माच्या स्वीकाराच्या प्रश्नाचेही अगदी असेच होत आले आहे. लोक बुद्धिझमची चर्चा करतात पण बुद्धिझमच्या स्वीकाराची चर्चा करत नाहीत. तिथपर्यंत चर्चा पोहचूच देत नाहीत. तशी शक्यता दिसली की लगेच अवैदिक, अब्राह्मणी, बहुजन असली बुजगावणी उभी करतात आणि त्यावरच चर्चेचा फोकस राहील याची खबरदारी घेतात. वास्तविक वर म्हटल्याप्रमाणे अवैदिक, अब्राह्मणी या वैदिक, ब्राह्मणी या शब्दांच्या पडछाया (किंवा mirror images) आहेत. तर बहुजन ही केवळ संख्यात्मक संकल्पना आहे. ती तत्त्वात्मक संकल्पना नाही. त्यातून कोणतेही तत्त्व ध्वनित अथवा प्रक्षेपित होत नाही. बहुजन या संज्ञेत फक्त बहुसंख्यांकता अभिप्रेत आहे, कुठलेही तत्त्वज्ञान अभिप्रेत नाही. याचाच अर्थ असा की बहुजन हिंदुत्व ही स्वयंभू तत्वज्ञान नसलेली पोकळी आहे. याच वस्तुस्थितीचा वैदिकांनी अत्यंत हुशारीने कब्जा घेऊन ती पोकळी ब्राह्मणी संस्कृतीने भरून टाकली आहे. सनातन हिंदू संस्कृती म्हटली की त्यात उघडपणे (पुढच्या दाराने) ब्राह्मणी संस्कृती येतेच, पण बहुजन हिंदू संस्कृती म्हटली तरी तिथेही अप्रत्यक्षपणे (मागच्या दाराने) ब्राह्मणी संस्कृतीच दत्त म्हणून हजर होते. याचे कारणच मुळी, वैदिकांनी “हिंदू” बॅनरचे केलेले संपूर्ण अपहरण, हे आहे. आज या बॅनरवर वैदिकांचा एकहाती ताबा आहे. त्यामुळे जिथे हिंदू शब्द येतो तिथे वैदिक त्याच्या लव्याजम्यासह क्षणात उपस्थित होतो ! हिंदू शब्दाचा कितीही कीस पाडला, त्या शब्दाच्या मागेपुढे बहुजन, अब्राह्मणी अशी कोणतीही विशेषणे जोडली तरी त्यातून प्रतिगामी वैदिकता टाळून निखळ पुरोगामी स्वरुपाचे काहीही निष्पन्न होत नाही. ना आजपर्यंत झालेले आहे, ना यापुढे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदू शब्दाचा नाद कायमचा सोडणे हा वैदिकांच्या सापळ्यातून सुटण्याचा एकमेव पर्याय आहे. आणि नेमके याच ठिकाणी नेमाडेंनी (आणि त्यांच्या अर्धवट शिष्यांनी) केलेले हिंदू शब्दाचे उदात्तीकरण आडवे येते. हे आडवे आलेले उदात्तीकरण पूर्ण “आडवे” करून पुढे जाण्यातच खरा शहाणपणा आहे. त्यातच बहुजनांचे भविष्य प्रकाशमान होण्याची शक्यता आहे. बाकी नेमाडे थोर लेखक आहेत यात दुमत नाही. वाचनीय, लक्षणीय, रमणीय लिहिण्यात ते मास्टर आहेत, हे सत्यच आहे. पण समाजाला उन्नत-ऊर्ध्वगामी करू शकणारे सिद्धान्तन ते करू शकत नाहीत, हेही पहिल्या सत्याला समांतर असणारे दुसरे सत्य आहे आणि काळाच्या कसोटीवर ते सिद्धही झाले आहे. ही दोन्ही सत्ये त्यांच्या अंधभक्तांनी लक्षात घ्यावीत, असे आवाहन करतो आणि “हिंदू : एक चकवा”च्या तपपूर्तीच्या निमित्ताने लांबलेले हे निरुपण थांबवतो.
@ संदीप सारंग
——————————————————
हिंदू : एक चकवा (तिसरी आवृत्ती)
संपादन – अरुण विश्वंभर
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठे – 184
मूल्य – रुपये 180