हिंदू धर्म न्याय आणि उपयुक्तता या दोन कसोट्यांवर उतरत नाही. म्हणून डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म नाकारला आणि बौद्ध धम्म या दोन्ही कसोट्यांवर उतरत असल्याने त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

हिंदू धर्म न्याय आणि उपयुक्तता या दोन कसोट्यांवर उतरत नाही. म्हणून डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म नाकारला आणि बौद्ध धम्म या दोन्ही कसोट्यांवर उतरत असल्याने त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक विचारांचे अध्ययन करीत असतांना एक गोष्ट प्रामुख्याने आढळून येते, आणि ती म्हणजे, बुद्ध हे त्यांच्या सामाजिक विचारांचे तात्विक अधिष्ठान आहे. जाती, अस्पृश्यता, धर्म, सामाजिक परिवर्तन या संबंधीचे विचार असोत अथवा आर्थिक-राजकीय-धार्मिक विचार असोत, त्यांच्या या सर्व विचारांचे एक सूत्र आहे. हे विचारांचे सूत्र बुद्धाच्या विचारांमधूनच त्यांना गवसले आहे. बाबासाहेबांचे हे सूत्र म्हणजेच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवतावादी तत्वे होत. याच मानवतावादी तत्वांवर त्यांचे सामाजिक विचार आधारलेले आहेत. केवळ सामाजिकच नव्हे तर, आर्थिक आणि राजकीय विचारांची मांडणी देखील याच तत्वांवर केली आहे. त्यांनी आपल्या सामाजिक विचारांमधून सामाजिक मानवतावाद विकसित केला आहे.

बाबासाहेबांच्या सामाजिक मानवतावादाचे पहिले तीन आधार स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आहेत. मानव समाजाच्या दृढतेकरिता आणि एकतेकरिता ही मूल्ये आवश्यक आहेत. त्यांचे जीवन विषयक तत्वज्ञानही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारलेले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी धर्माच्या तत्वज्ञानाची चिकित्सा देखील न्याय आणि उपयुक्तता या दोन कसोट्यांवर केली आहे. हिंदू धर्म या कसोट्यांवर उतरत नाही, म्हणून त्यांनी हिंदू धर्म नाकारला. बौद्ध धम्म मात्र या दोन्ही कसोट्यांवर उतरतो. त्यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

अ. स्वातंत्र्य (Liberty): स्वातंत्र्य हे मानवतावादाचे एक मूलभूत तत्व आहे. तसेच, स्वातंत्र्याची संकल्पना ही नवीन समाजव्यवस्थेचा एक सिद्धांत आहे. स्वातंत्र्य हे आंतरिक आणि बाह्य अशा दोन प्रकारचे असते.
i. आंतरिक स्वातंत्र्य: हे बहुतांश व्यक्तीच्या भावनेवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीने संयम ठेवून कार्य केल्यास ते आंतरिक स्वरूपाचे स्वातंत्र्य होय. परंतु, आंतरिक स्वातंत्र्य परिस्थिती सापेक्ष असते. कारण ते बाह्य परिस्थितीवर निर्भर असते. समाजामध्ये आढळून येणारे आचार-विचार हे त्याचे सहाय्यक किंवा विरोधी सुद्धा सिद्ध होऊ शकतात. यावरुण हे स्पष्ट होते की, व्यक्तीला आंतरिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे बाह्य स्वातंत्र्य देखील मिळाले पाहिजे.
ii. बाह्य स्वातंत्र्य: व्यक्तीने दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे हा बाह्य स्वातंत्र्याचा अर्थ आहे. सामाजिक व्यवहारामध्ये ही गोष्ट सत्य आहे. कारण, प्रत्येक व्यक्ति दुसऱ्यावर अवलंबून आहे. समाजातील सर्व सदस्यांमध्ये आपसात सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे. व्यक्ति समाजावर जितकी निर्भर असते, तितकाच समाज देखील व्यक्तीवर निर्भर आहे. बाह्य स्वातंत्र्य ही अशी एक भावना आहे की, जी सामाजिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे कार्य करते की, एकीकडे दुसऱ्या लोकांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता त्याच्या स्वातंत्र्यावर काही नियंत्रण येते. तर दुसरीकडे त्याच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता अन्य व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर काही बंधने लावली जातात. अशा प्रकारचा पारस्पारिक सहयोग हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक असतो.

यावरुन हे स्पष्ट होते की, स्वातंत्र्य हे आंतरिक आणि बाह्य अशा दोन प्रकारचे असून ते एकमेकांशी परस्पर संबंधीत आहे. व्यक्तीच्या सहयोगातूनच सामाजिक स्वातंत्र्याची शक्यता निर्माण होते. सामाजिक स्वातंत्र्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा समावेश होतो.
१. एकाच समुदायात राहणाऱ्यांचे स्वातंत्र्य,
२. अन्य समुदायांपासून एका समुदायाचे स्वातंत्र्य.

समुदायात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अनेक दबाव येतात. कारण, त्यांच्या उद्देशाचे निर्धारण तो स्वत: करू शकत नाही. इतर लोकच त्याचे उद्देश निश्चित करतात. ज्यावेळी व्यक्तीस सामुदायिक नियंत्रण आणि अत्याचारांपासून मुक्ती मिळते आणि तो आपल्या उद्देशानुसार आपल्या ध्येयानुसार जीवन जगू लागतो, तेव्हा त्यास स्वातंत्र्य म्हणता येईल. याचाच अर्थ समाजातील सर्व व्यक्तिंकरिता समान नियम, कर्तव्य आणि अधिकार असले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला काम करण्याचे, विचार-विनिमय, संघटन आदीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. परंतु, या व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून अन्य व्यक्तीचे अहित होऊ नये, ही खबरदारी घेणे देखील अत्यंत महत्वाचे आहे.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *