• 45
  • 1 minute read

‘हे’ काय चाललंय?

‘हे’ काय चाललंय?

या बातम्या मती सुन्न करतात. हे काय चाललंय .. ? असा प्रश्न पडतोय. संपूर्ण व्यवस्था हतबल झाली की केली गेली .. ? राग यावा असेच सारे घडतेय !

          वाचनात आले की , भारताने भगोडा घोषित केलेला , ६६ वर्षीय मेहुल चिनुभाई चोकसी भारतात आणला जात आहे. त्याचेवर १२,६३६ कोटी रुपयांनी पंजाब नॅशनल बॅंकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने देशातून पळ काढला. २०१७ ला चोकसीने कॅरेबियन द्विप एंटिगुआ आणि बारगुडा येथे आश्रय घेतला. या द्विपांचे नागरिकत्व घेतले. त्याची अशी फरारी सुरु होती.
मधल्या काळात बऱ्याच पटकथा घडल्या. आता तो बेल्जियम सरकारच्या ताब्यात आहे.

आता ताजी माहिती अशी की , भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने बेल्जियमला, मेहुल चोकसीला ताब्यात दिल्यास चांगली वागणूक देऊ असे आश्वासन दिल्याचे समजते. त्याला मेडिकल सह १४ सुविधा पुरवल्या जातील असेही त्यात कळविले आहे.

सुविधांचे विवरण देताना गृह मंत्रालय सांगतेय , चोकसीला मुंबई आर्थर रोड जेलमध्ये ठेवले जाईल. कोठडी स्वतंत्र असेल. हवेशीर असेल. कोठडीत अटॅच टाॅयलेट व बाथरुम राहील. प्यायला स्वच्छ पाणी दिले जाईल. घरचे जेवण तिनदा आणता येईल. झोपायला कापसाची उशी व आरामशीर अंथरुण असेल. पंखा , लाईट , टी. व्ही. सोयी असतील.खुले अंगण असेल. बॅडमिंटन , कॅरम खेळता येईल. लायब्ररी ची सोय असेल. शिवाय आपात्कालीन जे जे हास्पिटलची सुविधा २४ तास उपलब्ध असेल.

ही मेहुल चोकसीची प्रस्तावित ‘जेल’ आहे. लवकरच ते या जेलमध्ये येत आहेत.

दूसरे वृत्त असे की , एका महिला पोलिस अधिकाऱ्यावरुन आधीच नकारार्थी चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा घोर चर्चेत आले आहेत. ही चर्चा चहूबाजूंनी घेरणारी आहे.
चर्चेचा मध्यबिंदू असा की , कथित सिंचन घोटाळ्यातून महाराष्ट्र सरकारने जरी अजित पवारांना ‘क्लिनचिट’ असेल पण न्यायालयाने ते अद्याप स्वीकारलेले नाही. संबंधित केस सुरू आहे. मुद्दा एव्हढाच की , सुनावणीच्या पटलावर ती येत नाहीय.

काल समाज माध्यमावर एक पोस्ट आली. तिथून हे कळतेय. पोस्ट टाकणारे महत्त्वाचे गृहस्थ असल्याने या सांगाव्याला राजकीय महत्त्व आले आहे. ते गृहस्थ महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे हे आहेत.

पांढरे थेट आरोप करताना कथित सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार अजित पवार हेच असल्याचे सांगतात. या सिंचन घोटाळ्याची प्रामाणिकपणे उच्च स्तरीय चौकशी झाली असती तर अजित पवार आज तुरुंगात दिसले असते. अजित पवारांना वाचविण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कामाला प्रधानमंत्री यांनी साथ दिली. या बदल्यात तत्कालीन सरकार पाडण्यात आल्याकडे पांढरे लक्ष वेधतात.

तेव्हा सिंचन घोटाळा व ७० हजार कोटी हा आकडा सर्वत्र पसरला होता. शे दोनशे नाही. सत्तर हजार कोटी असा फुगलेला आकडा होता. मेहुल चोकसी चा आकडा बारा हजार कोटी आहे. किती लवकर सत्तर हजार कोटी विस्मरणात गेलेय.
स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथे जाहीर भाषणातून सिंचन घोटाळा व या आकड्याचा उल्लेख केला होता.

सत्तापालट नंतर ‘क्लिन चिट’ शब्द पूढे आलाय. विजय पांढरे यांनी थेट आरोप करुन नव्याने सिंचनच्या या ओलेपणा कडे लक्ष वेधले आहे. बेरजेचे राजकारण करणारे अजित पवार यांची राजकारण करण्याची ही ‘स्टाईल’ आहे असेही सांगण्यात येईल. अलीकडे प्रतिमा निर्माण वर भारी भर आहे. कावेबाज माणसाला ‘भाऊ’ करण्याकडे कोटींचा खर्च होतोय. एक दमडी खर्च न करता जांबुवंतराव धोटे ‘भाऊ’ झाले होते. अत्यंत आदराने अनेक मान्यवरांना ‘भाई’ म्हटले जाई. भाऊ वा भाई लादत नसत.
सध्या अजब ‘भाऊगिरी’ सुरू आहे.

सत्तेच्या राजकारणाची अशी वाट लागलीय. किमान आपल्या चर्चेच्या अजेंड्यावर या बाबी असायला हव्यात. उद्या कृती वा निर्णयाच्या वेळी मदतीला येतील.

० रणजित मेश्राम

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *