- 26
- 1 minute read
“ह्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काय कमावले ?”
शिवसेना उबाठा पक्ष फुटल्यानंतर काहीच दिवसांनी ऊध्दव ठाकरे यांच्या हाकेला ओ देत बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यासोबत युती केली होती. वास्तविक २५ वर्ष बिजेपीसोबत युती केलेल्या शिवसेनेसोबत युती करून बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड धोखा पत्करला होता..पण राजकारणात सामाजिक राजकीय परिस्थितीत वेगवेगळे प्रयोग करत पुढे जावे लागते व बाळासाहेब आंबेडकर यांनी आतापर्यंत खुप प्रयोग केले व काही अंशी समाजात घुसळण सुध्दा झालेली. ऊध्दव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक परीवर्तनाच्या लढाईतील सहकारी व शिलेदार. डॉ बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे परीवर्तनाचे विचार घेऊन वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ह्या दोन्ही पक्षांची आघाडी वाटचाल करेल व संघ परिवाराने पेरलेले विषारी पिक साफ व्हायला मदत होईल तसेच महाराष्ट्रातील जनतेला बुलंद पर्याय मिळेल अशी अपेक्षा होती. पण…. रामदास आठवले यांच्या सोबत ऊध्दव ठाकरे यांनी जो अवसानघातकीपणा व विश्वासघाताचे राजकारण केले होते अगदी तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत केले आहे. त्यातच “बाबरी मशीद आमच्या शिवसैनिकांनी पाडली त्याचा आम्हाला अभिमान आहे” असं ऊध्दव ठाकरे हे बिजेपीला खिजवण्यासाठी व हिंदू व्होट बँकेवर डल्ला मारण्यासाठी विधाने करत राहिले… परीणामी वंचित बहुजन आघाडी सोबत जुळलेला मुस्लिम समाज नक्कीच नाराज झाला असता. मविआत सामावेश करण्याची जबाबदारी ठाकरेनी घेऊन शेवटपर्यंत निभावून नेली नाही व संजय राऊत यांच्याकडून मीडीयामध्ये वंचितची सतत बदनामी केली गेल्याने युती आपोआप तुटली…
याच्याही आधी ऊध्दव ठाकरे हे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामाऊन घेण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा होती पण… तथाकथित इंडिया आघाडीने “मुस्लिम व दलित” विशेषतः “आंबेडकरी नेतृत्वाला” खड्यासारखे बाजूला ठेवण्याचे धोरण अवलंबले होते.. फक्त मिडिया मध्ये दोन जागा देतो तिन जागा देऊ चार जागा देऊ… अशा पुड्या सोडुन जनतेमध्ये संभ्रम व बदनामीकारक बातम्या पेरत अतिशय निंदनीय कटकारस्थाने रचली. आंबेडकरी समाजातील विकाऊ भाडोत्री सुपारीबाज तसेच कांग्रेसचे लाभार्थी समाजद्रोही लोकांकडून पध्दतीशिरपणे सोशल मीडियात वंचित बहुजन आघाडी विषयी आंबेडकरी समाजामध्ये बदनामीकारक बातम्या लिखाणांची मालिकाच कांग्रेस व राकांच्या आशिर्वादाने सुरू केली होती.. तसेच तथाकथित महाविकास आघाडीकडून “संविधान धोक्यात आले आहे ते वाचवायचे व दगडापेक्षा विट मऊ” ह्या प्रत्येक निवडणुकीत पेरलेल्या अफवेचासुध्दा मारा सुरुच ठेवल्या गेलेला. ह्या “अफुच्या गोळीला” आंबेडकरी समाजातील काही मंडळी आपोआप बळी पडली व त्या नशेतच गुंग झाली…
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दुरदृष्टी व दुरगामी विचार करणारे द्रष्टे महापुरुष होते त्यांना माहीत होते की त्यांच्या पश्चात त्यांच्या भोळ्याभाबड्या आंबेडकरी समाजाची “कांग्रेस व त्यांचे चेलेचपाटे” हे त्यांचे समाजातील काही “विकाऊ, अल्पसंतुष्ट, कांग्रेसने दिलेल्या पुरस्काराने वाकलेले, लाळघोटे, व सुपारी बहाद्दर ज्यांच्या हातात लेखणी आहे अशांना विकत घेऊन किंवा काही पदे देऊन “भोळ्याभाबड्या आंबेडकरी जनतेला” काँग्रेसच्या गोठ्यात नेउन बांधतील म्हणून त्यांनी आधीच “गांधी व कांग्रेसने अस्पृश्यांप्रती काय धोखेबाजी काय केली ?” ह्या ऐतिहासिक ग्रंथांचे लिखाण करुन “भाऊराव बोरकरी” मनुवादी गांधीवादी कॉंग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून पोलखोल केलीय……
वंचित बहुजन आघाडी हा फाटक्या समाजातील लोकांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शोषित पिडीत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी चालवलेला पक्ष आहे.वंचितकडे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सारखी मिडिया किंवा इतर यंत्रणा नाही..जे काही संसाधने असतील त्या संसाधनाचा वापर करून निःस्वार्थ व तळमळीने झिजणारे कार्यकर्ते यांच्या जिवावर प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने ताकदीने मुकाबला केला. वंचित बहुजन आघाडीकडे गमावण्यासारखे काहीही नाही.
ह्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तथाकथित महाविकास आघाडीचे नेते गुळमुळीत भुमिका घेत प्रचार करत होते पण बाळासाहेब आंबेडकर हे मोदींवर सडकून रोखठोक टीका करत एकाकीपणे मैदान गाजवत होते.. एकिकडे दोन आघाड्या म्हणजे महायुती मधील बिजेपी शिंदे सेना व राकां अजित पवार गट व महाविकास आघाडीचे कांग्रेस राकां शरद पवार गट व उबाठा शिवसेना ह्या सहा पक्षांविरोधात वंचित बहुजन आघाडी हा एकटाच पक्ष लढत होता. महाविकास आघाडीचे नेते वर्तमान केंद्र सरकार व मोदींविरोधात अतिशय गुळगुळीत भुमिका घेत होते पण वंचित बहुजन आघाडीला मात्र ठरवून लक्ष करीत होते.. तरीही वंचित बहुजन आघाडी कोणालाही न जुमानता निवडणूकीच्या मैदानावर लढत राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात कॉंग्रेसचा हरीजन सेल कार्यरत होता व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड प्रमाणात विरोध करत त्यांची बदनामी करत समाजात संभ्रम निर्माण करत त्यांच्या चळवळीत अडथळे आणायचा…काळ वेळ व परीस्थिती बदलली पण प्रवृत्ती मात्र तिच आहे.. ह्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर जहरी टीका करण्यासाठी काही मोजक्या लोकांना हे काम तथाकथित महाविकास आघाडीने दिले होते..व हे विकाऊ भाडोत्री लोक इमानेइतबारे मालकाने दिलेल्या मिठाला जागून बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर बिटीम सारखे आरोप लावत अतिशय हिणकस व बदनामीकारक मजकूर, बातम्या व लिखाण करत होते. असल्या समाजद्रोही सालगडी लोकांचे नाव आंबेडकरी इतिहासात काळ्या अक्षराने लिहिले जाईल.
बिजेपी आघाडी व कांग्रेस आघाडी ह्या दोन्ही आघाड्यांचे सत्तासंघर्षाच्या साठमारीत फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व राहायला पाहिजे जेणेकरून हे पक्ष एक वेगळा दबावगट निर्माण करेल व शोषित पिडीत वंचित समाजाचे न्याय हक्कासाठी आवाज उठवेल. वंचित बहुजन आघाडी हा फक्त पाच सहा वर्षांचा पक्ष आहे. अल्पावधीतच ह्या पक्षाची प्रस्थापित राजकीय पक्ष व प्रस्थापित मिडिया दखल घेत आहे व राजकारणात प्रचंड दबदबा निर्माण केला आहे हीच जमेची बाजू आहे. हा पक्ष येणाऱ्या भविष्यात आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करुन सत्तेच्या दिशेने निश्चितच झेप घेईल…
– धनराज मोहोड (नवी मुंबई)