• 40
  • 1 minute read

*॥आंतरराष्ट्रीय आयात निर्यात अभ्यासवर्ग॥*

*॥आंतरराष्ट्रीय आयात निर्यात अभ्यासवर्ग॥*

डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र (“वेपनायझेशन ऑफ टेरीफ”) !

“मला शरण या”, “मी म्हणतो तसेच करा” हा डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टाग्रह आहे. टेबलवर होणाऱ्या वाटाघाटी या औपचारिकता आहेत.  
_______________
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील राष्ट्रांना (स्वतःला पाहिजे तशाच !) व्यापार करारावर सह्या करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत 1 ऑगस्ट रोजी संपली. 
 
अमेरिका भारत व्यापार कराराच्या वाटाघाटींच्या पाच फेऱ्या झाल्या , सहावी फेरी या महिन्याच्या मध्यावर सुरू होईल. त्यांवर कधी सह्या होणार, माहीत नाही ! 
 
          अशा वेळी दोन दिवसापूर्वी “माय फ्रेंड” डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के ‘आयात कर’ आणि त्याशिवाय काही पेनल्टीचा बॉम्ब टाकला ! 
 
         याचा भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिकल मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हिरे आणि सोन्याचे दागिने, तयार कपडे अशा वस्तूंच्या मागणीवर नक्कीच गंभीर परिणाम होऊ शकतो. याचे भारताच्या निर्यातीवर, भारताच्या जीडीपी वर, परकीय चलन मिळकतीवर, रुपया डॉलर विनिमय दरावर काय परिणाम होतील ? 
 
           याबद्दल जी विविध मते व्यक्त होत आहेत ती खचितच भारतासाठी चिंता वाढवणारी आहेत. 
________________
 
या पोस्टमध्ये दोन वेगळे मुद्दे मांडले आहेत. 
 
1. गेल्या काही आठवड्यात एकामागून एक राष्ट्रे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकवीत आहेत , असे चित्र उभे राहत आहे. आतापर्यंत ब्रिटन, जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाईन्स यांनी करारावर सह्या केल्या आहेत. सर्वात मोठा मासा गळाला लागला आहे तो युरोपियन युनियनचा ! दक्षिण कोरिया आणि तैवान व्यापार करार फायनल करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. बाकी छोटी राष्ट्रे बरीच आहेत.  
 
        एखाद्या राष्ट्रावर अमेरिकेने किती आयात कर बसवला यापेक्षा तो आयात कर त्या राष्ट्राच्या स्पर्धक राष्ट्रांवर लावलेल्या आयात करापेक्षा जास्त आहे की कमी , हा महत्त्वाचा मुद्दा असतो. साहजिकच अमेरिकेबरोबर व्यापार वाटाघाटी सुरू असताना, भारतासह अनेक राष्ट्रे अमेरीकेने इतर राष्ट्रांवर लावलेल्या आयात करांचा मागोवा सतत ठेवत आहेत ! 
 
           याचा अर्थ , असा एखाद्या राष्ट्राने अमेरिकेबरोबर व्यापार करार फायनल केल्यानंतर त्या राष्ट्राच्या स्पर्धक राष्ट्रांवर प्रचंड दडपण वाढते. 
 
            काल तर पाकिस्तानने अमेरिकेबरोबर व्यापार करार फायनल केल्याची बातमी आली आहे. आपल्यासाठी याचे परिणाम फक्त व्यापारीक नाहीत तर  भू राजनैतिक असणार आहेत. 
 
2. दुसरा मुद्दा आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात कराचा ! हे आयात कराचे ‘अस्त्र’ ते बिगर व्यापारी, बिगर आर्थिक राजकीय उद्दिष्टांसाठी वापरत आहेत. 
 
उदाहरणार्थ , भारताची केस घ्या. डोनाल्ड ट्रम्प यांना धडा शिकवायचा आहे रशियाला , पण त्यांनी लक्ष्य केले आहे भारताला ! रशियाला धडा शिकवण्यासाठी रशियाबरोबर मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या भारताला थप्पड लगावली जात आहे. भारत रशियाकडून संरक्षण सामग्री आणि मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो , हे कारण दिले गेले आहे. ‘भारताने रशियाकडून नाही तर अमेरिकेकडून संरक्षण सामुग्री आणि ऊर्जा विकत घ्यावी’ हा मेसेज आहे ! 
 
याच प्रकारचे दुसरे उदाहरण आहे ब्राझीलचे. ब्राझीलचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष लुल्ला हे ब्राझीलचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बोलसनारो यांना त्रास देतात , असा आरोप ट्रम्प करतात. बोलसानारो हे फॅसिस्ट प्रवृत्तीचे आणि ट्रम्प यांचे भक्त आहेत.  म्हणून ट्रम्प ब्राझीलवर अधिक आयात कर लावू इच्छितात ! 
________________________
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्की किती आयात कर लावले हा मुद्दा महत्वाचा आहेच , त्यापेक्षा गंभीर मुद्दा आहे डोनाल्ड ट्रम्प सोकावणार आहेत. त्यांना रक्ताची चटक लागली आहे ! आपल्या हात पिरगाळण्याच्या ‘टॅक्टीज’ मुळे समोरचा वाकतो , असे म्हटल्यावर भविष्यात ते सतत हा मार्ग अवलंबणार आहेत. 
 
          भारतावर लावलेले ‘25 टक्के प्लस पेनल्टी’ ही चालू असलेल्या वाटाघाटीपैकी एक चाल आहे. त्या दडपणाला बळी पडून भारत अमेरिकेककडून शेती आणि डेअरी माल आयात करू लागला तर कोट्यवधी शेती / डेअरी उद्योगाशी संबंधित कुटुंबावर गंभीर परिणाम होणार आहेत. 
 
‘दोस्त दोस्त ना रहा’ असा हा प्रकार नाहीये. दोस्त कभी दोस्त था ही नही ! मुळात असे गळे पडके आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कभी दोस्त बनते भी नही’ ! 
 
संजीव चांदोरकर (१ ऑगस्ट २०२५)
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *