दीक्षाभूमी ट्रस्टी लोकांच्या भावनांशी का खेळत आहे ?
पुणे : दीक्षाभूमीवर पार्किंग होणार असे जेव्हा जाहीर झाले, तेव्हापासून लोकांनी त्याला विरोध केला. लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टींनी हे कामकाज करायला नको होते. पण लोकांनी विरोध करूनही ट्रस्टींनी कामकाज सुरू केले. दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, हे कामकाज बंद व्हावे यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ट्रस्टींना विचारले पाहिजे की, तुम्ही लोकांच्या भावनांशी का खेळत आहात? दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली म्हणून शासनाने तिथे स्मारक उभे केले आहे.
विजयादशमीला लाखो लोक येतात यामध्ये दुमत नाही, पण आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी कुणीही तक्रार केली नाही. पार्किंगच्या नावावर जे व्यावसायीकरण (कमर्शियल) केले जात आहे ते थांबवण्यासाठी नागपूरची जनता आंदोलन करत आहे. आम्ही ट्रस्टींना आवाहन करतो की, हे तातडीने थांबवावे. पार्किंगची काहीच आवश्यकता नाही. आपण थांबवलं नाही, तर लोक विरोधात जातील एवढे लक्षात घ्या, असेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.