- 104
- 1 minute read
मानवी कल्याणाचा धर्म देणारे वर्धमान महावीर !
वर्धमान महावीर हे इ.स.पू. 6 व्या शतकात होऊन गेलेले महापुरुष आहेत. ते बुद्धाच्या समकालीन पण बुद्धापेक्षा वयाने जेष्ठ होते. त्यांचा जन्म इ.स.पूर्व 599 ला वैशाली गणराज्यात कुंडलग्राम येथे राजघराण्यात झाला. योगायोगाची बाब म्हणजे ते 36 वर्षाचे असताना गौतम बुद्धांचा जन्म झाला, तर त्यांच्या निर्वाणसमयी बुद्ध 36 वर्षाचे होते. बुद्ध आणि महावीर समकालीन होते. त्याच्या प्रबोधनाचा आणि परिभ्रमणचा परीघ एकच होता, ते एकमेकांना चांगले ओळखत होते, परंतु ते एकमेकांना भेटले असल्याचा पुरावा नाही, पण त्यांचे अनुयायी एकमेकांना भेटत होते. राजा सिद्धार्थ हे त्यांचे पिता तर त्रिशला या त्यांच्या माता होत, आई त्रिशला ही लिच्छवी राजा चेटकाची बहीण होती. महाविरांचे आई-वडील हे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथाचे अनुयायी होते. पार्श्वनाथ हे महावीरपूर्व दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेले.
श्र्वेतांबर पंथानुसार यशोदा ही त्यांची राणी तर प्रियदर्शनी त्यांची कन्या होती. दिगंबर पंथानुसार ते अविवाहित आणि ब्रम्हचारी होते. लोककल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ते राजपुत्र होते, परंतु राजवैभवाचा आस्वाद त्यांनी नाकारला. स्वतःसाठी जगण्यापेक्षा लोककल्याणासाठी जगायचे हा निर्धार त्यांनी केला. बंधू नंदिवर्धन यांची अनुमती घेऊन ते संन्यस्त झाले.
ऐन तारुण्यात म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी लोककल्याणासाठी गृहत्याग केला. त्यांनी 12 वर्षे ज्ञानसाधना केली. त्यांना रुजुपालिका नदीकाठावर असणाऱ्या जुंभिक गावात ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी काम, क्रोध, अहंकार, मद, मोह, दंभ इत्यादी विकारांवर विजय मिळवला म्हणून त्यांना जिन अर्थात जैन म्हणतात. इतरांना जिंकणे सोपे, पण स्वतः ला जिंकणे खूप कठीण असते. त्यांनी स्वतः ला जिंकले म्हणून ते वर्धामानाचे महावीर झाले. ते ज्ञातृवंशात जन्मले म्हणून त्यांना नात्तपुत्त असेही म्हटले जाते. तसेच त्यांना अर्हत, वैशालिक, सन्मती असेही म्हटले जाते. त्यांनी वस्त्रांचा त्याग केला म्हणून त्यांना निर्ग्रंथ म्हटले जाते. त्यांनी केवलज्ञान प्राप्त केले म्हणून त्यांना केवलिन असेही म्हटले जाते. म्हणजे त्यांची महावीर, नातपुत्त, अर्हत, वैशालीक, सन्मती, निर्ग्रँथ, केवलिन ही नावे आहेत.
महाविरांनी कठोर ज्ञानसाधना केली. या काळात आजीवक संप्रदायाचा संस्थापक मखलीपुत्र गोशाल हा त्यांचा सहकारी मित्र होता. पुढे दोहोंचे मतभेद झाले. त्यांचे लाखो अनुयायी होते. त्यांनी चातूर्यामी असणारा धर्म ब्रह्मचर्याचा अंतर्भाव करून पंचयामी बनविला. चंपा राज्याची राजकन्या चंदना त्यांची पहिली महिला अनुयायी, तर जमाली हा पहिला पुरुष अनुयायी होता. तोच पुढे त्यांचा जावई झाला. चेटक राजा जो त्यांचा मामा होता तोही त्यांचा अनुयायी झाला. त्यांनी अर्धमागधी तथा प्राकृत भाषेतून ज्ञानदान केले. सिंह हे त्यांचे प्रतीक आहे. त्यांनी महिलांना ज्ञानार्जनाचा अधिकार दिला. पुढे स्थूलभद्र आणि भद्रबाहू यांच्या काळात जैन धर्मात वैचारिक मतभेद होऊन श्र्वेतांबर आणि दिगंबर हे पंथ निर्माण झाले. राजा चंद्रगुप्त मौर्य हा भद्रबाहुचा अनुयायी होता
त्यांनी वेदप्रामाण्य नाकारून समतेचा पुरस्कार केला. त्यांनी वर्णव्यवस्था नाकारली. त्यांनी ईश्वर, आत्मा, स्वर्ग नाकारून स्यादवाद/अनेकांतवाद मांडला, म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना ईश्वराच्या कृपेने किंवा चमत्काराने नव्हे तर नैसर्गिक कारणाने घडत असतात, हा विचार म्हणजेच बुद्धिप्रामाण्य होय. त्यांनी स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता महिलांना अधिकार दिले. सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही त्रिरत्ने आणि पंचमहाव्रत्ये ही त्यांनी सांगितलेली मूल्ये मानवी विकासासाठी महत्वपूर्ण आहेत.
वर्धमान महावीर हे राजपुत्र असूनदेखील सर्व ऐश्वर्याचा त्याग करून प्रबोधनासाठी गावोगावी गेले. अहिंसा हे त्यांनी जगाला दिलेले महान असे वरदान आहे. आज शस्त्र आणि जैविक युद्धाला रोखायचे असेल तर महावीर व बुद्ध यांच्या अहिंसेची जगाला नितांत गरज आहे. अहिंसा हाच खरा धर्म आहे, असा विचार त्यांनी दिला. कितीही कठीण काळ आला तरी सत्यापासून दूर जावू नका, अशी त्यांची शिकवण आहे. कोणत्याही स्वरूपाची चोरी करू नये, असा नियम त्यांनी केला. गरजेपेक्षा अधिक संग्रह करणे, हा सामाजिक अपराध आहे, ही त्यांची भूमिका होती. आपल्यामध्ये असणारी घमेंड, अहंकार, राग, लालच, द्वेषभावना यावर विजय मिळवणे, हेच खरे शौर्य आहे, असे प्रतिपादन वर्धमान महावीर यांनी केले.
एखाद्या व्यक्तीला, समुदायाला किंवा देशाला जिंकणे सोपे असते, परंतु अंधविश्वास, अहंकार, राग, मोह, काम इत्यादी रिपूंना जिंकणे महाकठीण असते. वर्धमांनानी त्या रिपूवर विजय मिळविला, म्हणून त्यांना महावीर म्हणतात. ते जिंकले म्हणून जैन म्हणतात. वर्धमान महावीर हे 24 वे तीर्थनकर होते. त्यांचे संपूर्ण कार्य आणि जीवन क्रांतिकारक आहे. त्यांच्या विचाराने सर्वसामान्य लोक वैदिक परंपरेविरुद्ध ठामपणे उभे राहिले. त्यांचा विचार विषमता नाकारतो. त्यांचा विचार आत्मा, ईश्वर नाकारतो. त्यांचा विचार अंधश्रद्धा नाकारतो. त्यांचा धर्म ईश्वरी नाही तर मानवी कल्याणचा धर्म आहे.
महावीरांचा धर्म दया सांगतो, त्यांचा धर्म विनयशीलता शिकवितो, त्यांचा धर्म प्रेम शिकवितो, त्यांचा धर्म क्षमाशीलता शिकवितो. क्षमा करायला विशाल अंतकरण लागते. त्यांचा धर्म चिकित्सेला वाव देतो. म्हणून तो प्राचीन काळात राजधर्म आणि लोकधर्म झाला. बुद्ध आणि महावीर यांच्या अहिंसावादी तत्वामुळे मांसभक्षक द्विजांना शाकाहारी व्हावे लागले. दुसरे नागरीकिकरण गंगेच्या खोऱ्यात झाले. इसपूर्व दहाव्या शतकापासून जगभरात लोखंडाचा वापर सुरू झाला, साहजिकच गंगेच्या खोऱ्यात लोखंडी अवजारामुळे जंगल साफ होऊन मुबलक शेती पेरणीसाठी उपलब्ध झाली, परंतु मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे शेती कसण्यासाठी गायी बैलाशिवाय पर्याय नव्हता, बुद्ध-महावीर कृषक समाजातून आल्यामुळे त्यांनी शेतीसाठी गाय उपयुक्त आहे, त्यांचा यज्ञात बळी देऊ नका, असे आवाहन केले, त्यामुळे पशुहत्या बंद झाली. बुद्ध आणि महावीर धार्मिक कारणाने नव्हे, तर भौतिक कारणामुळे गोहत्येच्या विरोधात होते, असे महान इतिहासतज्ञ डॉ. रोमिला थापर सांगतात.
मानवांचे प्रश्न शस्त्राने नव्हे, तर मानवतावादी शास्त्राने सुटू शकतात, असा विचार महाविरांनी दिला, त्यांचे निर्वाण इ.स.पूर्व 527 ला पावापुरी येथे झाले. त्यांना 72 वर्षाचे आयुष्य लाभले. अशा या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र वंदन !
– डॉ.श्रीमंत कोकाटे