आज महाराष्ट्र दिन. पण मित्रहो या भूमीला आठवण आहे का, हुतात्मा चौकापासून ते मंत्रालयांपर्यंतचा रस्ता आपल्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाच्या पवित्र व लाल रक्ताने रंगला आहे !
18 नोव्हेंबर व 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या मराठी जनतेने चार चार लाखांचे मोर्चे काढले होते. मुख्यतः गिरणी कामगार, विद्यार्थी आणि महाराष्ट्र वेडी मराठी जनता “महाराष्ट्र” “माझा महाराष्ट्र” अशा गगनभेदी गर्जना देत मोर्चाने पुढे चालली होती.
सेनापती बापटां सारखा वृद्ध, त्यागी नेता सर्वांना काव्यातून सांगत होता
“महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठाविना राष्ट्र गाडा न चाले’.
याच मोर्चावर तेव्हाचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी बेछूट लाठीमार आणि गोळीबारांच्या फैरी झाडल्या. 106 हुतात्म्यांचा बळी घेतला. एवढेच नव्हे तर मोरारजीचे बदमाश पोलीस परळ आणि लालबागेतील चाळीचाळीत घुसून लाठीमार करत होते.
आता त्या गोष्टीला जवळपास 65 वर्षे होत आली आहेत. परंतु या महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या कोणाही मुख्यमंत्र्यांना व राजकीय पक्षांना या हुतात्म्यांची कुर्बानीची कधीच याद झाली नाही. त्यांची नावे मंत्रालयाच्या भिंतीवर कधी कोरली गेली नाहीत. कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे “स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात” अशी परिस्थिती झाली. हुतात्मा स्मारक सुद्धा सत्ताधारी मंडळींनी नव्हे तर तेव्हाच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्याने उभे राहिले . त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे आणि अहिल्या रांगणेकर यांच्या हस्ते झाले होते. तेव्हाच्या शासनाने हे कम्युनिस्टांचे स्मारक आहे अशी त्याची संभावना केली होती.
तेव्हा मोरारजी आणि मंडळी म्हणत असत की, “मुंबईमध्ये मोठमोठ्या उद्योगांचा पाया हा गुजराती व्यापाऱ्यांनी घातला”. तेव्हा मार्च 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यसभेमध्ये ठणकावून सांगितले होते की, “मुंबईतील उद्योगाची सुरुवात व वाढ ही युरोपातील उद्योगपतींनी व कंपन्यांनी केली हे मी तुम्हाला सह उदाहरण व यादीसह पटवून देईन.”
जेव्हा सिताराम पवार या विद्यार्थ्याच्या डोक्यात डमडमच्या बंदुकीच्या गोळ्या घेतल्या गेल्या. तो ठार झाला. त्याच रात्री अण्णाभाऊंनी “माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली” ही रणलावणी लिहिली होती. अत्रे, कोठारी, एस.एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, माडखोलकर, लालजी पेंडसे ना.ग.गोरे, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यासह शाहीर आत्माराम पाटील, अण्णाभाऊ, शाहीर गव्हाणकर यांच्यासह अनेक लेखककवींनाही आपण विसरून गेलेलो आहोत.
खंबाटकी घाट ओलांडल्यावर उजव्या हाताला “आराम” नावाचे हॉटेल लागते. त्या हॉटेलचे मालक बापू यादव यांनी काही वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी धारातीर्थी पतन पावलेल्या 106 हुतात्म्यांच्या नावांची यादी आपल्या हॉटेलच्या भिंतीवर कोरून लावली होती. एका सामान्य हॉटेल मालकाच्या मेंदूत उतरणारी या मातीवरची भक्ती आणि प्रीती आमच्या मंत्रालयातील साहित्य संस्कृतीला ठाऊक नसावी याचे मला खूप वाईट वाटते.
शेवटी त्या काळात पंडित नेहरूंच्या विरोधात पेटलेल्या मराठी जनतेने दिल्लीमध्ये जो विराट मोर्चा काढला होता. नेहरूंना समजण्यासाठी कवी शैलेंद्र यांनी जे काव्य लिहिले होते. त्यातील काही ओळी या निमित्ताने मला आठवतात.
“जागा मराठा
आम जमाना बदलेगा
दो कवडी के मोल
मराठा बिकता नही. !!”
आता मालमत्ता पत्रकाला प्रत्येकाच्या आईचे नाव लावायचे शासनाने ठरविले आहे ही गोष्ट चांगली आहे. पण ज्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला आणि आमची मायमराठी टिकली. त्या आमच्या निर्माणकरत्या बापांचे नाव मंत्रालयाच्या असंवेदनशील भिंतीवर कधी लागणार ?
– विश्वास पाटील.