- 25
- 1 minute read
प्रजाहितदक्ष राजमाता : अहिल्याई होळकर
जगात अनेकजण जन्माला येतात आणि मृत्यूला सामोरे जात असतात. जन्मानंतर जी माणसं स्वतः आणि स्वतःपुरतेच जगतात त्यांना मृत्यूनंतर तर नाहीच नाही परंतु जिवंतपणी सुद्धा कोणी विचारत नसतात. परंतु जी माणसं स्वतःचं आयुष्य झिजवून दुसऱ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करतात. इतिहास अशा त्यागी माणसांची महामानव म्हणून नोंद करतो. अशा महामानवांमध्ये राजमाता अहिल्याई होळकरांचे नाव घेतल्याशिवाय इतिहासाचे लेखन पूर्ण होऊ शकत नाही. अहिल्याई होळकरांचा जन्म 31 मे 1725 ला झाला. वडिलांचे नाव माणकोजी शिंदे आणि आईचे नाव सुशीलाबाई होते. अहिल्याईचा विवाह इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांच्या खंडेराव या मुलासोबत 20 मे 1733 ला झाला. महाराष्ट्राची लेक मध्यप्रदेशची सून झाली. 17 मार्च 1754 ला कुंभहेरीच्या लढाईत खंडेरावाला विरमरण आलं. 20 मे 1766 ला गुरुस्थानी असणारे सासरे मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला आणि होळकरशाहीचे रक्षण करण्याची आणि प्रजेला सांभाळण्याची जवाबदारी अहिल्याईवर आली. पुराणात दगड झालेल्या अहिल्येचा रामाने उद्धार केल्याचे आपणास माहित आहे. परंतु अठराव्या शतकातील दगडालाही पाझर फुटावे असे संघर्षमय खडतर आयुष्य जगण्याचा आणि प्रजेला मातृत्व प्रेम देणाऱ्या अहिल्याईने कित्येक उध्वस्त झालेल्या रामाचे आपल्या शासन व्यवस्थेत जीवन फुलवून जात – धर्माच्या पलीकडे जावून राज्य कारभार करणाऱ्या अहिल्यामातेच्या देशात मात्र रामाला इतर धार्मियांच्या विरोधात वापरून धर्मा – धर्मात दंगली माजवून रामाला बदनाम करण्याचे षडयंत्र सूरू आहे. परंतु इतिहासातील आमचे प्रेरणास्थान असणाऱ्या अहिल्याई होळकरांचे शासन, प्रशासन, आजच्या अत्यंत प्रगत असलेल्या जगातील अभ्यासकांना, समाजसुधारकांना इतिहासकारांना, शासनाला तसेच तरुणांना नवविचारांची चालना देत आहे.
समाजाला नव विचारांची चालना देणाऱ्या अहिल्याई होळकरांनी प्रजाहिताच्या दृष्टीने कोणते लोकोपयोगी कार्य केले त्याची चर्चा करून आमच्या मायबाप सरकारांनी प्रेरणा घेण्याच्या दृष्टीने हा लेख प्रपंच.
लोकोपयोगी कार्य :- 20 मे 1766 ला सासरे मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर होळकर संस्थांनाच्या कारभाराची सर्व जबाबदारी अहिल्याराणीकडे आली होती. त्याच संस्थांनाच्या राजमाता म्हणून कारभार पाहू लागल्या. अहिल्याईने आपल्या बुद्धीने चाणाक्षपणे प्रजाहित साधणारे धोरण आखून त्यांची उत्तम अंमलबजावणी केल्यामुळे, त्या उत्तम प्रशासका बरोबर प्रजाहितदक्ष लोकमाता ठरल्या.
दया तिचे नाव | भुताचे पालन |
आणिक निर्दलन, कंटकाचे |
या विचारांनुसार पुढीलप्रमाणे लोकोपयोगी राज्यकारभार केला.
1) पर्यावरण विषयक :- अहिल्यादेवीने प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी 20 झाडे लावण्याची शक्ती केली होती. 20 झाडांपैकी नऊ झाडे शेतकऱ्यांची तर 11 झाडे सरकारचे असे नियोजन करुन निसर्गाचा समतोल राखन्यासाठी प्रयत्न केला. आज सुद्धा रस्त्याच्या दोन्हीं बाजूंना जी खूप जूनी झाडे दिसतात ती अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याची साक्ष देतात. आता लोकशाही काळातील वनमंत्री दोन कोटी झाडे लावल्याचा दावा करतात परंतु दोन हजार झाडे सुद्धा लावलेली दिसत नाही.
2) तंटामुक्त समितीची पायाभरणी :- त्या काळातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे अहिल्याई होळकर. गावा-गावात जर तंटे निर्माण झाले तर ते गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त समित्याची स्थापना करण्यात आली होती. तीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने तंटा मुक्त गाव समित्यांची स्थापना केली.
3) हुंडा प्रथा बंद :- त्या काळात अहिल्यादेवीने हुंडा विरोधी आदेश काढला होता. त्यात त्या म्हणतात, “श्रीशंकर आज्ञावरून हुकूम जारी करण्यात येतो की, विवाह समयी कन्येकडून कोणी द्रव्य घेईल ते द्रव्य सरकारी दप्तरी जमा करुन दंड करण्यात येईल.” आज श्रीमंतीच्या नावावर विवाहात प्रचंड खर्च बघितला की विचार येतो, हा पैसा खरचं श्रमाचा – मेहनतीचा आहे की मेहनत करणाऱ्या श्रमिकांना लुबाडून जमविलेला आहे. विवाहावर होणाऱ्या अवाजवी खर्चाचा शासनाला कुठलाही हिशेब दिल्या जात नाही किंवा शासनाकडून मागितल्या जात नाही. सरकारने विवाहात अवाजवी होणाऱ्या खर्चावर कर लावून त्या करातून जमा होणाऱ्या पैशातून गरिबांना दर्जेदार आरोग्य व शिक्षणाच्या सोयी पुरवाव्यात. आशा करू या अहिल्याईच्या या आदेशाची प्रेरणा घेवून सरकार असा आदेश काढेल.
4) आंतरजातीय विवाह :- संस्थानातील दक्षिण भागात चोर – डाकुंचा जनतेला प्रचंड त्रास होता. त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अहिल्यादेवीने एक घोषणा केली की, “जो कोणी विर राज्यातील डाकू लोकांचा बंदोबस्त करेल त्या विराशी माझ्या एकुलत्या एक मुक्ता या कन्येचा विवाह लावून देईल.” अहिल्यादेवीच्या या आव्हानाला यशवंत फणसे या आदिवासी समाजातील तरुणाने प्रतिसाद देवून डाकू आणि चोरांचा बंदोबस्त केला. पुढे मुक्ता या त्यांच्या मुलीचा विवाह यशवंताशी लावून दिला. प्रजेच्या कल्याणाकरिता आपल्या एकुलत्या एका लेकीला राज्याच्या भल्याकरिता डावावर लावणाऱ्या जगातील एकमेव राज्यकर्त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर. स्वतःच्या स्वार्थ पुत्रप्रेमापोटी राज्यपणाला लावणाऱ्या सध्याच्या राज्याकर्त्यांनी थोडा तरी धडा घ्यावा हिच अपेक्षा.
5) टपाल सेवा :- सन 1785 मध्ये अहिल्याईने माहेश्वर ते पुणे अशी पहिली भारतातील टपाल सेवा सुरु केली.
6) 6) अन्नछत्रांची स्थापना :- गरीब अपंग, गरजू लोकांवर उपाशी जगण्याची पाळी येऊ नये म्हणून मोफत अन्नदान करणाऱ्या अन्नछत्राची स्थापना केली होती. अहिल्यांच्या याच कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा जोतिराव – सावित्री फुलेनी “अहिल्या आश्रमांची” स्थापना करून त्यांना अभिवादन केले. तर वर्तमानात लोकांनीच स्थापन केलेले सरकार लोकं उपाशी मेले तरी चालेले हा हेतू ठेवून सरकारी तिजोरी भरण्याकरिता वस्तूंवर वेगवेगळे कर लादून महागाईचा उच्चांक गाठण्यात धन्यता मानत आहे. आणि आम्ही मतदार ते मुकाट्याने सहन करीत आहोत. कान असून बहिरे झालोत आणि बोलता येत असून मुके झालोत.
7) जमिनी वाटप :- संस्थानात भूमिहीन असणाऱ्यांना जमिनी दान केल्या आणि पडीक असलेल्या जमिनी मोठया प्रमाणात लागवडीखाली आणून अन्नधान्याचे उत्पादन वाढवून अन्नधान्या बाबतीत संस्थांनाला स्वयंपूर्ण केले. आज मात्र लोकशाही शासन असताना, विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी कारखानदाराना देवून शेतकऱ्याला भूमिहीन केल्या जात आहे. हक्काकरिता लढणाऱ्या शेतकरी कष्टकऱ्यांना आंदोलनं करू दिल्या जात नाही. केलंच आंदोलन तर त्यांना गाड्याखाली चिरडल्या जातात. शेतकरी विरोधी कायदे करुन शेतकऱ्यांना लुटण्याचे धोरण मात्र सरकार गॅरंटीने राबवत आहे.
8) बाजारपेठांची निर्मिती :- संस्थानात उत्तम गुणवतेच्या शेती माल, हस्तकला साहित्य, कुटीरोद्योगाच्या वस्तू निर्मितीला चालना देऊन शेतकरी, हस्तकलांचे कारागीर, कलाकार यांना प्रेरणा मिळावी म्हणून बाजारपेठांची स्थापना केली. लोकर, खाद्यपदार्थ, भाजीपाला यांची निर्यात होत असे. त्या काळात होळकर संस्थान अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘सरपल्स इकोनॉमि’ असणारे एकमेव राज्य होते. स्वतःला विश्वगुरु म्हणवणाऱ्यां आणि त्यांच्या विचारहीन भक्तांनी खोटया विकासाचा डंका पिटणाऱ्यांनी काही प्रेरणा घ्यावी.
9) भूमिहीन बेरोजगारांना रोजगार :- ज्यांच्याकडे शेती नाही परंतु श्रम करण्याची ज्यांची तयारी आहे अशा तरुण – तरुणीना सैन्यात भरती होण्याची संधी दिली जाण्याबरोबर ज्यांच्या त्यांच्या कौशल्यानुसार काम दिल्या जात असे. बेरोजगारीला थारा नव्हती. आज आम्हीच प्रजेने निवडून दिलेल्या लोकशाही शासन व्यवस्थेत मात्र रोजगार असणाऱ्यांना कसे बेरोजगार केल्या जाईल असे धोरण आखून जनतेला भिखारी बनवून उपाशी मारण्याचे डावपेच आखल्या जात आहेत. रोजगार मागणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फी वसूल करुन उद्द्योपत्यांच्या तिजोऱ्या भरल्या जात असतांना मात्र आम्ही लोकशातील मतदार मात्र डोळे बंद करून हॆ सहन करत आहोत.
10) निराधार, विधवा, परीत्याक्त्या स्त्रियांसाठी महिलाश्रम, अनाथाश्रम, कुटीरोउद्योग उभारून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.
या व्यतिरिक्त प्रचंड मोठया प्रमाणात अहिल्याई होळकरांनी महान असे कार्य केले आहेत. कारण अहिल्यादेवीला फक्त प्रजा सुखी हवी होती. यासंदर्भात मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर साहेब रवींद्रनाथ टागोरांच्या वचनाचा आधार घेत म्हणतात, “शिवरायांचे प्रजावात्सल्य व बुध्दाची करुणा ज्या व्यक्तीत एकत्रित सामावलेल्या होत्या त्या अहिल्याई होळकर ह्याच भारतीय दर्शनाची सर्वांगीण ओळख आहे”. एवढे अफाट व चिरस्थायी काम अहिल्याईच्या हातून झालेले आहे. म्हणूनच त्यांचा राजमाता म्हणून गौरव केल्या जातो. अशा राजमातेस जयंतीदिनी विनम्र अभिवादन…!
– अनिल कुलपतराव भुसारी, तुमसर, जि. भंडारा