- 43
- 1 minute read
इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता !
इसवी सन पहिल्या शतकातील सम्राट कनिष्क हा शक होता ! परंतु तो बौद्ध होता.
हूण हे गुप्त काळाच्या अखेरीस आले. इसवी सन ३१९ ते ४६७ या काळातील गुप्त साम्राज्य हूण टोळ्यांनी नष्ट केले. कालिदास हा गुप्त काळातील साहित्यिक आहे. त्याच्या साहित्यात ब्राह्मण आहेत , क्षत्रिय आहेत , गणिका आहेत !
त्यापूर्वीच्या सुमारे हजार वर्षाआधीच्या बौद्ध साहित्यात देखील ब्राह्मण आहेत , खत्तिय आहेत , दास आहेत , मोठेमोठे श्रेष्ठी आहेत. संघगण कदाचित व्यापार देखील करीत असावा. “शाह ॲंड संघी” हे आजच्या काळातील सुप्रसिद्ध मोटारगाड्या वितरक आहेत. त्यांतील “संघी” म्हणजे या संघगणाच्या व्यापार प्रथेचे अवशेष असावेत. जैन समाज देखील व्यापारात आहे. संघगण संपल्यावर किंवा तो संपण्याच्या संक्रमणाच्या काळात तो व्यापाराकडे वळला असावा. सम्राट अशोकाने ज्या अनेक प्रांतांत – देशात भिक्खू पाठवल्याचा उल्लेख आहे त्यांत “महारठ्ठ” आहे ! मग त्याकाळी महाराष्ट्राची समाजरचना कशी होती ?
शक – हूण हे आजचे राजपुत असू शकतात. मध्ययुगाच्या आरंभी किंवा प्राचीन युगाच्या अखेरीस —— साधारणपणे सहाव्या – सातव्या शतकानंतर “सुवर्णगर्भ विधी” वगैरे करून ब्राह्मणांनी त्यांना “आजचे क्षत्रिय” बनवले असावे. शंकराचार्यांनी याचे सार्वत्रिकीकरण केले असेल का ? दक्षिणेतील सातवाहन (इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३०) व वाकाटक (इसवी सन २५० ते ५००) ही घराणी तर शक – हूण आक्रमकांपासून सुरक्षित राहिली असावीत. अगदी सम्राट हर्षवर्धन (इसवी सन ५९० ते ६४७) देखील पुलकेशी (इसवी सन ६०९ ते ६४२) या चालुक्य घराण्यातील दाक्षिणात्य सम्राटाचा आब राखीत असे. म्हणजे महाराष्ट्रात राज्य करणाऱ्यांचा उत्तर भारतातील क्षत्रियांशी काही वांशिक वा तत्सम संबंध आढळत नाही. वस्तुतः सम्राट अशोकानंतर महाराष्ट्रावर उत्तर भारतीयांनी राज्य केलेले नाही. मग येथील क्षत्रिय परंपरा दाक्षिणात्य आहे काय ?
हर्षवर्धन हा गुप्त घराण्यातील होता. तोपर्यंत — म्हणजे सातव्या शतकाच्या मध्यान्हापर्यंत — तरी दक्षिणेत शक – हूण आले नसावेत, हे स्पष्ट आहे. सुवर्णगर्भ विधी ही बहुधा सातव्या शतकाच्या उत्तरार्धाची फलश्रुती असावी. आठव्या शतकाच्या प्रारंभी महंमद बिन कासीम याने आक्रमण केले. येथून व यानंतरच्या काळात स्वतःला क्षत्रिय समजणारे राजपुत राजे दिसतात.
याचा अर्थ असा होऊ शकतो कि , समुद्रगुप्त वगैरेंचे पहिले गुप्त साम्राज्य स्थापन होईपर्यंत शक हे उत्तर भारतीय समाजात निदान “माजी राज्यकर्ते” म्हणून रिचवले गेले असावेत. हूणांनी हेच गुप्त साम्राज्य बुडवले , हे सर्वज्ञात आहे. या हुणांच्या टोळ्यांना ब्राह्मणांनी राजपुत घराणी म्हणून सुवर्णगर्भ विधी द्वारे “क्षत्रिय” केले गेले असावे. सम्राट हर्षवर्धनाच्या साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर जागोजागच्या सरदारांनी देखील आपली छोटी छोटी राज्ये स्थापन केली असावीत. आजचे उत्तर भारतातील ‘क्षत्रिय’ (?) म्हणजे कनिष्क साम्राज्याचे वारसदार व प्रांतीय सरदार , सम्राट हर्षवर्धनच्या साम्राज्याचे वारसदार व प्रांतीय सरदार आणि रानटी हूण टोळ्यांतून राजपुत बनलेले अशा या सर्वांचे मिश्रण असावे.
शक – हूण या शस्त्रधारी टोळ्या असल्यामुळे त्यांच्यातून ब्राह्मण निर्माण होऊ शकत नाहीत. मात्र बौद्ध भिक्खू – भिक्खूणी , जैन भिक्खू – भिक्खूणी , तत्कालिन समाजातील निकषांप्रमाणे विद्वान – सुशिक्षित म्हणून नावाजलेले , वेगवेगळ्या आध्यात्मिक मार्गातील मुमुक्षू यांचा (अथवा यांच्या जवळच्या नातेवाईकांचा देखील) विविध कारणांमुळे ब्राह्मण जातीत समावेश झाला असावा , अशी शक्यता आहे. ब्राह्मणांतील दीक्षित हे आडनाव ब्राह्मणी परंपरेत नाही. दीक्षित म्हणजे दीक्षा घेतलेला ! हा नक्कीच बौद्ध – जैन धर्मीयांच्या प्रभाव आहे. ‘गौड सारस्वत ब्राह्मण हे मूळचे बंगालमधील बौद्ध आहेत’ , असेही सांगितले जाते. गौड म्हणजे बंगाल हे सर्वविदित आहे. त्यामुळे हे खरे असावे. आजचे कायस्थ व सारस्वत यांचा उगम देखील मध्ययुगीन बौद्ध परंपरेत असावा. म्हणून ब्राह्मण देखील शुद्ध रक्ताचे वगैरे वगैरे नाहीत. हा देखील अनेकांच्या मिश्रणाने तयार झालेला समूह आहे.
वस्तुतः साठ लाख वर्षांच्या मानवी समाजाच्या इतिहासांत ‘शुद्ध रक्त’ ही संकल्पनाच हास्यास्पद ठरते. मागील साठ लाख वर्षांच्या काळात सगळ्या मानवी समूहांचा सगळ्याच मानवी समूहांशी रक्तसंबंध झाला आहे. टोळी म्हणून अथवा वैयक्तिकरित्या देखील सर्व मानवांनी एकमेकांशी मुक्तपणे शरीरसंबंध केले आहेत. त्यामुळे शुद्ध वंश , शुद्ध रक्त अशा कल्पना केवळ वेडगळांच्या डोक्यात येऊ शकतात.
सम्राट अशोकाची पहिली पत्नी कुमारी देवी ही विदिशा नगरीची होती. आजच्या मध्य प्रदेशात विदिशा या नावाचा जिल्हा आहे. कुमारी देवीचे पिता हे तत्कालिन विदिशातील मोठे व्यापारी होते. म्हणजे ते वैश्य होते. बौद्धकालीन समाजाचे विघटन झाल्यानंतर तेथील गृहश्रेष्ठी हे वैश्य झाले असावेत. मोठ्या मोठ्या कस्सक गहपतींनी कालौघात शेती सोडून दिल्यामुळे त्यांचा वैश्य समूहात प्रवेश झाला असावा. कुलाचे विघटन होऊन कुटुंब झाले , याचाही हा परिणाम असावा.
शूद्र (आजचे ओबीसी) आणि अतिशूद्र (आजचे पूर्वास्पृश्य , आदिवासी व भटके) यांचा इतिहास देखील असाच मिश्रणपर आहे. घाटावर मुरळी प्रथा आहे. तिथे खंडोबाच्या नावे मुरळी सोडली जाते. गोव्यात मंगेशाला मुरळी वाहण्याची प्रथा होती. या मुरळ्यांना भाविण असा शब्दप्रयोग वापरला जात असे. गायन कलेत नावाजले गेलेले मंगेशकर कुटुंबिय यांपैकीच एक समजले जाते. हल्ली या समाजाने स्वतःला गोमंतक मराठा म्हणवून घेत प्रांतिक- भाषिक आवरणाचे पांघरूण घेतले आहे. ‘देवाला मुलगी अर्पण करणे’ ही प्रथा उच्च जातीयांत नाही. ‘पुरुष देवाला स्त्री अर्पण करणे’ हा मुळात मातृसत्तेचा पराभवदर्शक विधी आहे.
आणखी निरीक्षण म्हणजे उर्मिला धनगर या भीमबौद्ध गीते गाणाऱ्या गायिका आहेत. आश्चर्य म्हणजे त्यांचे आडनाव धनगर असले तरी त्या बौद्ध आहेत. मग धनगर जातीतील एखाद्याला शिक्षा म्हणून भूतकाळात अस्पृश्य बनवले असेल का ? अशा पद्धतीने भूतकाळात शूद्र व अतिशूद्र समाजात असंख्य स्थानांतरे घडली असावीत. कोळी समाजात मेहेर आडनाव आहे. या आडनावाचे महार नावाशी साधर्म्य आहे. मिहिर , मेहरा ही उत्तर भारतातील प्रतिष्ठित आडनावे — बहुधा पदनामे — आहेत. त्यांचा महार नावाशी काही संबंध आहे का ? वाघ , गायकवाड , जाधव – चव्हाण अशी आडनावे चर्मकार – महार – कुणबी – बंजारा तसेच ओबीसी समाजात सर्रास आढळतात. साठे , बर्वे , पण्डित ही आडनावे मातंग , ब्राह्मण , बौद्ध समाजात आहेत. ढोबळे आडनाव मातंग , तेली , बौद्ध समाजात आढळते. मग वाघ , चव्हाण , साठे , बर्वे , ढोबळे या कुळांचे अनेक जातींत वर्गीकरण झाले काय ? ते कसे झाले ? त्यामागील कारणे काय असावीत ?
ब्राह्मणी धर्मशास्त्रात ज्यांना शूद्र व अतिशूद्र म्हटले आहे त्यांना आज सामायिकरित्या महाशूद्र म्हणायला हवे. भारताचे उज्ज्वल भवितव्य याच महाशूद्रांच्या उत्थानावर अवलंबून आहे.
ब्राह्मणी हितसंबंधांत बरबटून गेल्यामुळे आजच्या तथाकथित व स्वयंघोषित ब्राह्मणांना स्वतःचा इतिहास देखील नीट सांगता येत नाही. उदाहरणार्थ , पेशवाईपूर्वी आजच्या कोंकणस्थ ब्राह्मणांचा इतिहास काय आहे ? भल्या मोठ्या शून्याखेरीज या प्रश्नाचे उत्तर आढळत नाही.
आपल्याला इतिहासाचे पुनर्लेखन करायला हवे. असे पुनर्लेखन करताना आजच्या ब्राह्मण – क्षत्रिय , वैश्य – महाशूद्र या सर्वांचा इतिहास लिहावा लागणार आहे !
काम तर मोठे आहे, परंतु ते अंगावर घ्यावे लागणार आहे.