• 28
  • 1 minute read

साधारण नव्वदीच्या दशकातली गोष्ट. कामाठीपुरा ऐन भरात असावा.

साधारण नव्वदीच्या दशकातली गोष्ट. कामाठीपुरा ऐन भरात असावा.

विक्रोळी पार्क साईट,घाटकोपर मधील पंधरा वीस पोरं त्या गल्ल्यांमधून चालली होती.बहुतेक सगळी काळीकुट्ट.कडकी शिडशिडीत पोरं आणि पोरी.त्या गल्ल्यांच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या बायका बघून एका पोरीने तर विचारलेच,या बायका अशा का उभ्या आहेत ? असो.त्या रेड लाईट एरिया मधील गल्यांच्या मधोमध एक साधासा स्टेज उभारण्यात आला होता.आणि आलेल्या पोरांनी त्या स्टेजवर,त्या वस्तीतल्या मुलांसाठी बालनाट्य सादर केलं,रत्नाकर मतकरी लिखित निम्मा शिम्मा राक्षस ! विशेष म्हणजे या झोपडपट्टीतल्या युवा कलाकारांमधील आईची भूमिका करणारी एक कलाकार त्या दिवशी येऊ शकली नव्हती म्हणून तिची भूमिका ऐनवेळी सादर केली,रंगभूमीवरील एका पन्नाशीच्या निष्णात अभिनेत्रीने. तिचं नाव होतं,प्रतिभा रत्नाकर मतकरी !
होय,प्रतिभा मतकरी.पंच्याऐंशी नव्वदीच्या काळात विक्रोळी पार्क साईट परिसरात कास्प प्लॅन नावाची संस्था कार्यरत होती.गोर गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणे,वह्या पुस्तके,कपडे देणे हे संस्थेचे मुख्य काम.पण संस्थेत कार्यरत असलेल्या समाजसेवकांनी आपला परीघ ओलांडत वस्तीतल्या मुलांसाठी पुढचं पाऊल टाकलं आणि १९८५ च्या आंतरराष्ट्रीय युवा वर्षानिमित्त त्या मुलांना सर्वार्थाने घडवायला सूरवात केली.शिबिरे,मेळावे,स्पर्धा,प्रशिक्षण… असं बरंच काही सुरू झालं.संस्थेच्या डायरेक्टर म्हणून मेधा पाटकर रुजू झाल्या होत्या तर रिक्रिएशनल को-ऑर्डीनेटर म्हणून प्रतिभा मतकरी काम पाहू लागल्या होत्या.आजचे अनेक नामांकित कार्यकर्तेही तिथे संस्थेत राहून तर काही संस्थे बाहेरून नव्या वाटा शोधत होते तर काही नव्या पिढीला त्या वाटा दावत होते.तो एक स्वतंत्र विषय म्हणून लिहावा लागेल.पण आज प्रकर्षाने सांगायचंय ते प्रतिभा मतकरी यांच्याबद्दल.
प्रतिभा मतकरी म्हणजे ख्यातनाम समीक्षक लेखक माधव मनोहर यांच्या कन्या आणि सुप्रसिद्ध लेखक,नाटककार,दिग्दर्शक आणि निर्भय बनो आंदोलनाचे एक खमके समर्थक रत्नाकर मतकरी यांच्या पत्नी.पण त्यांची ही ओळख खूप म्हणजे खूपच अपुरी ठरावी.रत्नाकर मतकरी यांच्या लेखन,दिग्दर्शन,नाट्य प्रयोग,सामाजिक कार्य अशा बहुविध कार्य कृतीमागे जी शक्ती कार्यरत होती ती म्हणजे त्यांची जैव प्रतिभा.आणि सोबत ही जिती जागती प्रतिभा. खरं तर प्रतिभा मतकरी यांनी सूत्रधार,महाद्वार अशा घरच्या नाट्य संस्था सांभाळत, श्रीराम लागू यांच्या सारख्या कसलेल्या नटासोबत दुभंग सारख्या नाटकांमधून काम करत, आपल्या अभिनयाची क्षमताही सिद्ध केलेलीच होती.पण का कोणास ठाऊक ती मळलेली वाट चालायचं सोडून,त्यांनी वाट वाकडी केली आणि त्या पार्क साईट सारख्या कामगार वस्तीत,झोपडपट्टीत येऊन पोहोचल्या.गोर गरीब मुलांच्या आयुष्याच्या रंगमंचावर नव्या स्वप्नांचे प्रकशझोत टाकत राहिल्या.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा,दिल्लीचे निवृत्त निर्देशक,पद्मश्री वामन केंद्रे है स्वतः जेव्हा त्या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले होते तेव्हा पहिल्यांदा प्रतिभाताई त्यांना पार्क साईटला घेऊन आल्या आणि पार्क साईट मध्येच त्यांचं पहिलं एक महिन्याचं नाट्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं.चर्चगेट येथील हुतात्मा चौक जवळचे गरदुल्ल्यांच्या कब्जातील मैदान हतात घेऊन त्याचे गार्डन मध्ये रुपांतर करणारे आणि तिथे ओपन स्टेज बांधून नाट्य चळवळीला एक खुला मंच उपलब्ध करून देणारे प्रसिद्ध आर्किटेक्ट शशांक वैद्य,अभिनेत्री गौरी केंद्रे,अभिनेत्री आणि नृत्यांगना चारुशीला साबळे वाच्छानी,विनय पांडे,अभिनेते दिलीप प्रभावळकर,विनय पांडे,मीनल परांजपे आणि यासारखे अनेक रथी महारथी कलावंत प्रतिभा ताईंच्या माध्यमातून पार्क साईट ,भटवाडी,भीमनगर,घाटकोपर,भांडुप मधल्या वस्त्यांमध्ये येत राहिले. झोपड पट्ट्यातील पोरं पोरी म्हटलं तर नाटक, म्हटलं तर जीवन जगण्याची कला शिकत राहिले.त्यापैकी कोणी नटसम्राट नाही झाले,पण चांगले माणूस नक्की झाले.यातील अनेक लोक आज पुरोगामी,परिवर्तनवादी चळवळीत आपला ठसा उमटवत आहेत.अनेक जण किमान एक संवेदनशील व्यक्ती म्हणून जगत आहेत.
प्रतिभा ताईंना म्हटलं,आज तुमच्यामुळे आम्ही स्टेजवर उभं राहून बिनधास्त पणे आपल्या भूमिका मांडत आहोत.तेव्हा त्या म्हणाल्या…उगाच मला काहीतरी क्रेडिट थोपवू नकोस.
मॅडम काहीही म्हणोत,पण हे खरंच आहे.निशा शिवूरकर यांनी परित्यक्ता मुक्ती यात्रा काढून नवऱ्याने सोडलेल्या बायकांचा प्रश्न चव्हाट्यावर मांडला होता,तेव्हा त्यांच्या पदयात्रेतील एक सभा आम्ही सकाळी नऊ वाजता पार्क साईटला घेतली होती.तिथे मतकरी कुटुंबीय हजर होते.आणि त्याच काळात पार्क साइटच्या मुलांना घेऊन मतकरी यांनी एक टेली फिल्म बनवली.परित्यक्ता,एक टाकलेली बाई ! लेखक दिग्दर्शक रत्नाकर मतकरी असले तरी प्रत्यक्ष शूटिंग आणि इतर सोपस्कार,आमच्यावरचे स्त्री प्रश्नाबाबतचे संस्कार प्रतिभा मतकरी यांनीच केले.चेतन दातार लिखित आणि प्रतिभा मतकरी दिग्दर्शित विळखा या एकांकिकेेचे असंख्य प्रयोग आम्ही केले.झोपडपट्ट्या मधून गर्दचा विळखा सैल करण्यात आमचा हातभार लागला.निम्मा शिम्म्मा राक्षस चे पन्नासच्या वर प्रयोग,लोककथा ७८ चे प्रयोग आणि त्यातून आदिवासींचे शोषण समजून घेणे अशा बऱ्याच गोष्टी करता आल्या.माझ्यासारख्या सामान्य मुलाला भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र द्वारे चार राज्यांच्या संस्कृतिक कार्यक्रमात सूत्रधार,निवेदक म्हणून संधी मिळवून देणं असो नाहीतर आमच्या संविधान एकांकिकेसाठी व्हॅल्यू ॲडिशन असो,प्रत्येक पावलावर मॅडमनी आम्हाला बोट धरून पुढे चालतं केलं.दरम्यान कास्प प्लॅन संस्थेचं काम संपुष्टात आलं पण आम्ही चालायला बोलायला शिकलो होतो.है सगळं घडलं ते कोणामुळे मॅडम ?
प्रतिभा मतकरी इथेच थांबल्या नाहीत.रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून ठाण्यात जगदीश खैरालिया,संजय मंगला गोपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वंचितांचा रंगमंच उभा केला आणि चालवला आहे.वस्तीतल्या एकलव्याना रंगमंचावर उभं करण्याचं काम इथे चालतंय.आणि प्रतिभा मतकरी तिथेही सावली बनून उभ्याच आहेत.आणि त्याचवेळी वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी आरण्यक सारख्या ऐतिहासिक पौराणिक नाटकात प्रमुख भूमिका साकारून रंगमंच आणि वास्तव जीवनातही एखाद्या दिप स्तंभासारख्या ठामपणे उभ्या आहेत.
कास्प प्लॅन ने आम्हाला प्रतिभा मतकरी,मेधा पाटकर,पूर्णिमा मेहेर,भिमसिंग गिरासे,प्रकाश कांबळे,नंदिनी दातार,रश्मी चोपडा,के.के. झमान,अनिल सावंत,सुजाता शिर्के,अलका डे,देवकर,विवेक पंडित असे अनेक सर मॅडम दिले.या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने माणूस बनायला शिकवलं.प्रतिभा मतकरी आणि अनेकांची आमच्याबद्दल एक तक्रार असायची,तुम्ही मॅडम का म्हणता? ताई,दादा,काकी असं का म्हणत नाही ?
खर सांगू,आम्हला तेव्हढा कॉन्फिडन्स नव्हता.तुमचं गोरं असणं,अधिकारी असणं,उच्च शिक्षित असणं,तुम्ही कोणीतरी खूप मोठे आणि आम्ही गरीब असणं आपल्यातल्या अंतराची नकळत जाणीव करून देत राहायचं.पण आता तुमच्यामुळेच, तुमच्या प्रेम आणि शिकवणीमुळेच आज ती दरी आम्ही पार करू शकलोय.पण तरी तुम्हाला मॅडमच म्हणणार.सवय झालीय ना.
पण आम्ही जेव्हा मॅडम म्हणतो,तेव्हा त्यात तुम्हाला माय, माता,मावशी असं ऐकू येतं ना ?

– रवि भिलाणे

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *