महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१४ (१८ जुन २०२४)
धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी सामाजिक भेद किंवा विषमतेने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत, असे बुध्दांचे मत होते. त्यासाठी बुध्दांनी पुढील गोष्टी आपल्या शिष्यांना सांगितल्या:
१. धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हायला माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढायला पाहिजेत. वेद प्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुवर्ण समाज होय. ही व्यवस्था क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेली आहे. बुध्दांचा या समाज व्यवस्थेला आमूलाग्र विरोध होता. बुद्ध जातिसंस्थेचे सर्वश्रेष्ठ विरोधक असून, समतेचे पहिले व अत्यंत खंबीर असे समर्थक होते. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की, ज्याचे बुध्दांनी खंडन केले नाही. उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे महत्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कानिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत, असा बुध्दांचा उपदेश होता. २. धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी बुध्दांनी माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नाहीतर कर्मावरून ठरवावे. चातुवर्णामध्ये व्यक्तीचे मोठेपण किंवा कनिष्ठपण त्याच्या जन्मावरून ठरते. बुध्दांनी या गोष्टीस विरोध केला. आणि, माणसाचे मोठेपण किंवा कनिष्ठपण त्याच्या जन्मावरून नाहीतर कर्मावरून ठरवावे अशी शिकवण दिली. ३. धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी माणसामाणसांमधील समतेच्या भावनेची अभिवृद्धि केली पाहिजे. जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिति आहे असे मानले, तर दुबळ्यांची स्थिति असहाय्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालणे योग्य नाही. जो धर्म समता शिकवीत नाही, तो धर्म स्वीकारणीय नाही, असे बुध्दांचे म्हणणे होते. जो धर्म स्वतःच्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याचा आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो, तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून, बुध्दांनी समतेचा पुरस्कार करणाऱ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. बुध्दांनी आपल्या धम्माद्वारे सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा सतत पुरस्कार केला. ४. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा सखोल अभ्यास केला होता. बुध्दांच्या धम्माबद्दल बाबासाहेब म्हणतात की, “बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सतप्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धम्म आहे”.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)