• 221
  • 2 minutes read

आंबेडकरी जनतेचे व मतांचे मालक समजणाऱ्या नेत्यांना, आंबेडकरी जनतेने धडा शिकविल्याने नेते वैफल्यग्रस्त…!

आंबेडकरी जनतेचे व मतांचे मालक समजणाऱ्या नेत्यांना, आंबेडकरी जनतेने धडा शिकविल्याने नेते वैफल्यग्रस्त…!

       आंबेडकरी विचारांच्या पक्ष व संघटनांना संपविण्याचा प्रयत्न इंडिया/ महा विकास आघाडी करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर व अन्य आंबेडकरी पक्षाचे नेते करीत आहेत. अन हे आरोप ते आत्म चिंतनातून नव्हे तर वैफल्यग्रस्त अवस्थेतून करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. संघ व भाजप मोदीच्या माध्यमातून संविधान अन लोकशाही विरोधी अजेंडा राबवित असल्याचे हा देश गेली दहा वर्ष पाहत आहे. याच्या झळा , परिणाम ही देश भोगत आहे. संवैधानिक चौकटी अन् परंपरा संघाचा अजेंडा राबवून मोदीने मोडीत काढल्या होत्या व आहेत. देशातील सर्व सार्वजनिक उद्योग आपल्या मर्जीतील उद्योगपतींच्या घशात घालून या देशातील बहुजन वर्गाला भागीदारी देणारी आरक्षण व्यवस्थाच संघाने मोडीत काढली आहे. हे सर्व स्पष्ट दिसत असताना आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटना व नेत्यांना या विरोधात ठाम भूमिका घेता आली नाही. ही फारच दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा वेळी संघ, भाजप व मोदीला रोखणे अत्यंत गरजेचे व देश हिताचे होते. ते काम देशात स्थापन झालेली इंडिया आघाडी करीत असताना तिच्या सोबत उभे राहणे, ही काळाची गरज असताना याच आघाडीला फटका बसेल अशी राजकीय भुमिका घेणे म्हणजे संघ, भाजपलाच मदत करण्यासारखे होते व आहे. अन नेमके हेच प्रकाश आंबेडकर व अन्य नेत्यांनी केले. हे आंबेडकरी जनतेच्या लक्षात आल्याने तिनेच या तथाकथीत नेत्यांना चांगलाच धडा शिकविल्यामुळे आता ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर दुकानदारी करणाऱ्या सर्व नेत्यांना केवळ आंबेडकरी जनतेनेच नव्हेतर लोकशाही व संविधानावर निष्ठा असलेल्या जनतेने नाकारले आहे. ही गोष्ट खरी आहे की, १८ व्या लोकसभेत आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाचा एक ही प्रतिनिधी पोहचला नाही. पण इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे जे २३४ व अन्य १६ असे २५० प्रतिनिधी निवडून गेले आहेत, त्या सर्वांनी लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी जनतेकडे कौल मागितला होता व जनतेने त्यांना मतं देवून लोकसभेत पाठविले आहे. हे सर्वच्या सर्व प्रतिनिधी हे आंबेडकरी विचारांचेच आहेत. हे स्पष्ट आहे. त्यामुळे भावनिक विधाने करून आंबेडकरी समाजाला संविधान व लोकशाहीवर निष्ठा असलेल्या इंडिया आघाडी व तिच्या घटक पक्षांच्या विरोधात उभा करण्याचा खोडसाळपणा प्रकाश आंबेडकर व अन्य आंबेडकरी नेत्यांनी करू नये. स्वतःला आंबेडकरी नेते म्हणणाऱ्या नेत्यांनी वेळीच योग्य ती भूमिका घेण्याची गरज आहे. आत्म चिंतन करण्याची ही तितकीच गरज आहे. सध्याच्या वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. हे या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
         मोदींच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात संविधान, लोकशाही, संविधानाच्या चौकटी, परंपरा, आरक्षण या सर्व गोष्टींना पायंदळी तुडण्याचे काम मोदी सत्तेने केले. अन् या साऱ्या गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या आहेत म्हणून केले. डॉ. आंबेडकर यांच्या विरोधात विष पेरण्याचे काम ही केले गेले. मात्र स्वतःला आंबेडकरी नेते म्हणणारे याचा विरोध करताना कुठेच दिसले नाहीत. दिसत नाहीत. ते फक्त निवडणुकीत मतं विभाजनाचे राजकरण करून भाजपसारख्या धर्मांध शक्तीला मदत करताना दिसतात.
        इंडिया व महा विकास आघाडीत मिळणारा मान सन्मान व ४ ते ५ जागा घेवून प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी सोबत युती करायला हवी होती. ही युती झाली असती तर इंडिया आघाडीच्या आणखी १० ते १२ जागा वाढल्या असत्या. पण ती युती न करता भाजपच्या विरोधातील आंबेडकरी मतं कुजविण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ही केले. हे सांगण्यासाठी आता काही राजकीय तज्ञांची गरज नाही. हे शेंबड्या पोराला ही कळते. अन हे सांगण्याचा प्रयत्न राज्यातील आंबेडकरी अनुयायी करतात, तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या सारखे नेते या अनुयायांच्या आया – बहिणींचा उद्धार करताना दिसतात. ही खरे तर वैफल्यग्रस्त अवस्था आहे.

                                         आंबेडकरी मतांचे विभाजन झाले नसते तर
                                                एनडीए सत्तेच्या बाहेर असती….

        आंबेडकरी समाज हा सुज्ञ, प्रगल्भ व प्रबुद्ध आहे. ” मी प्रथम भारतीय व नंतर ही भारतीयच आहे,” हा डॉ. आंबेडकर यांनी दिलेला मंत्र या समाजाच्या मनावर कोरला गेलेला आहे, याचे भान प्रकाश आंबेडकर व अन्य आंबेडकरी नेत्यांना असते तर भाजपसोबत जाणे व मतं कूजवून भाजपला मदत करण्याची भूमिका या नेत्यांनी नक्कीच घेतली नसती. पण आजचे आंबेडकरी नेतृत्व हे भान हरपलेले नेतृत्व आहे. हे त्यांनी का केले याच्या अनेक सुरस कहाण्या आता सर्वत्र चर्चेत आहेत. लाज – इज्जत काढणाऱ्या आहेत. आंबेडकरी समाज जितका सुज्ञ, प्रगल्भ आहे, तितकेच सुज्ञ व प्रगल्भ नेतृत्व असते, तर ही बेअब्रू वाट्याला आली नसती. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील आंबेडकरी विचारांच्या नेत्यांनी व पक्षांनी मतं कुजविण्याचा निर्णय घेतला नसता तर, भारतीय संसदीय राजकारणातील चित्र वेगळे असते. भाजप सत्तेच्या बाहेर असता. संविधान व लोकशाही व्यवस्थे विरुध्द असणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातील व उत्तर प्रदेशातील नेतृत्वाने पुन्हा सत्तेवर बसविले आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
         आंबेडकरी विचारांचे पक्ष व नेते आंबेडकरी जनतेचे मालक अन आंबेडकरी मतांचे ठेकेदार झाले आहेत. हे त्यांची भुमिका व व्यवहारावरून स्पष्ट दिसत आहे. उत्तर प्रदेशात मायावती व महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, गवई व कवाडे तसेच वागत आहे. आंबेडकरी समाज व कार्यकर्ते आपले गुलाम आहेत, अशाच प्रकारे ते त्यांच्याशी वागत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी तर २०१९ व २०२४ मध्ये निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून, विश्वासात न घेता चरित्र व चारित्र्य नसलेले बाहेरचे उमेदवार उभे करून त्यांना कार्यकर्त्यांच्या बोकांडी बसविले आहे. अन् या उमेदवारांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून वंचितने नरसिंहराव उदगीरकर यांना उमेदवारी दिली. उदगीरकर हे राष्ट्रवादी ( शरद पवार) यांच्याकडून उमेदवारी मागत होते. ती मिळाली नाही. त्यामुळे ते वंचितचे उमेदवार झाले. २०१९ मध्ये याच मतदारसंघात वंचितचे राम गावकर यांना १ लाख १२ हजार मतदान झाल्यामुळे यावेळी वंचितचा फॅक्टर काम करेल व मविआचा उमेदवार पडेल, असेच चित्र होते. त्यामुळे व्यवहार ही मोठाच झाला असणार ? पण तसे घडले नाही. मविआ निवडणूक जिंकली. मात्र निवडणूक संपताच वंचितचे येथील उमेदवार नरसिंहराव उदगीरकर यांनी लैड रोवर, रेंज रोवर व फॉरच्युर या दोन गाड्या विकत घेतल्या. त्या काही अशाच घेतल्या नाहीत. उमेदवारांच्या दारात हे वैभव येत असेल तर नेत्यांची किती चंगळ व सुवर्णकाळ असेल. ही बाब आंबेडकरी मतदारांनी आधीच हेरली होती म्हणून शिक्षित, अल्प शिक्षित व निरक्षर अशा सर्व प्रकारच्या मतदारांनी वंचितला 2024 च्या निवडणुकीत पूर्णपणे नाकारले. याचा याचा विचार आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी करायला हवा.
          प्रकाश आंबेडकर यांना २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतुन अनेक गोष्टी शिकता आल्या असत्या. पण काहीच शिकायचे नाही, हे त्यांनी ठरविले आहे. उलट झालेल्या चुकांचीच पुन्हा पुनरावृत्ती करीत जुनेच धोरण अधिकृत धोरण म्हणून स्वीकारायचे हिच भूमिका त्यांची यावेळी ही राहिली होती. या धोरणांतर्गत त्यांनी मतं विभाजन करण्याची सुपारी घेतली व जुनाच प्रयोग नव्याने सादर केला. थेट भाजपकडून ही काही उमेदवार त्यांनी घेतले व मतं विभाजन करून संविधान विरोधी भाजपला मदत केली . प्रकाश आंबेडकर यांची सुपारी घेण्या इतकी लायकी आज ही आहे. मात्र जे लायक नव्हते, ते सरळ भाजपसोबत उभे राहिले. हे समाजाने पाहिले व अशा नेत्यांना आंबेडकरी समाजाने त्यांची जागा दाखवून दिली.
         देशात इंडिया आघाडी उभी राहिल्यानंतर भाजप व मोदींच्या सत्तेला आव्हान उभे राहिले. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) हे या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष. याच घटक पक्षात मतभेद निर्माण करून त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युतीचे नाटक करून केला होता. उद्धव ठाकरेंना मविआच्या युतीतून बाहेर काढण्याचा हा कट होता व या कटाचे सुत्रधार ही संघ अन भाजपच होती. पण उद्धव ठाकरे यांच्या समजस्यपणामुळे प्रकाश आंबेडकर यांना त्यात यश मिळाले नाही. त्या शिवाय संविधान व लोकशाही विरोधी भाजपला अशा प्रकारे मदत करण्या मागची प्रकाश आंबेडकर यांची भूमिका नक्कीच आंबेडकरी विचारांना व चळवळीला पोषक नाही. याचा विचार या पुढील काळात झाला पाहिजे. तो झाला तरच प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीची केलेली कोंडी फुटेल…!

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *