महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१७
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु संत कबीर: तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे संत कबीर हे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तिसरे गुरु होत. बाबासाहेबांचे घराने हे कबीरपंथी असल्यामुळे भजनाद्वारे लहानपणीच त्यांना संत कबीर माहिती झालेत. बाबासाहेब म्हणतात, “माझे दुसरे गुरु कबीर होत. माझे वडील कबीर पंथी होते. त्यामुळे कबीरांच्या जीवनाचा आणि तत्वांचा फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीरांना बुद्धाच्या तत्वज्ञानाचे खरे रहस्य कळले होते. कबीरांनी जाती, पंथ, धर्म, आदीबाबत कधीच भेदाभेद मानला नव्हता. सर्व माणसे समान आहेत. या तत्वाचा त्यांनी आपल्या विचारातून, सतत प्रचार केलेल्या आढळून येतो.” या गोष्टींमुळेच बाबासाहेब कबीरांच्या विचारांपूढे नतमस्तक झाले होते.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले: हिंदू समाजावर हजारो वर्षे असलेल्या ब्राम्हणी विचारांच्या संस्थांचे आणि ब्राह्मण जातीचे वर्चस्व कसे स्थापन झाले? याचा शोध लावण्याचा प्रयत्न ज्योतिबा फुलेंनी केला. कारण, त्यांच्या मते, “हिंदू मनुष्याच्या जीवनावरील सामाजिक बंधने निर्माण करणारे अज्ञान व अंधश्रद्धा ब्राह्मणनिर्मित आहेत. भ्रामक, थोतांडी अतिशयोक्तिपूर्ण थापेबाज, अद्भभूत, चमत्कारपूर्ण कल्पनांचे मायाजाल उत्पन्न करून, ब्राम्हणांनी हिंदू मनुष्यास जखडून टाकले आहे. ब्राह्मण धर्माचा म्हणजे वर्णाश्रम, जातिभेद, श्रुती, स्मृति, पुराणे आणि भागवत धर्म यांचा अंमल जो पर्यंत देशातील जनतेच्या मनावर आहे, तो पर्यंत नागरी समता किंवा मानवी समता या देशात स्थापित होणार नाही”. म्हणूनच त्यांनी चतुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, ब्राम्हणशाही, धार्मिक ग्रंथ यांचे वर्चस्व झुगारून दिले होते. या सर्व गोष्टींचे वर्चस्व झुगारून दिल्याशिवाय भारतीय माणूस आपली प्रगती करू शकत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
तथागत बुद्ध, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे तौलनिक अध्ययन केले असता बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या विचारांमध्ये पूर्णपणे साम्य आढळून येते. ज्योतिबा फुलेंचे काही गोष्टींबाबतचे विचार हे थोडे वेगळे आहेत. कारण, ज्योतिबा फुलेंनी निर्मिकाची कल्पना मांडली आहे. आपल्या विश्वाचा कोणीतरी निर्माता असून त्यालाच फुलेंनी निर्मिक म्हटले आहे.
३. जॉन ड्यूई, कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राध्यापक: जॉन ड्यूई यांनी जुन्या आदर्शवादाच्या तत्वज्ञाचे टिकात्मक परीक्षण केले. त्याच प्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भारतातील धार्मिक तत्वज्ञानावर टीका केली. शिक्षण हे जागतिक परिवर्तनाचे साधन आहे, असे जॉन ड्यूई यांचे मत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ड्यूई हे मत स्वीकारले होते.
४. मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: या दोहोंच्या विचारांत एका मूलभूत गोष्टीबाबत फरक होता. तो म्हणजे, शोषण हे केवळ आर्थिकच नाही तर, सामाजिक देखील होत असते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. तर, मार्क्सने फक्त आर्थिक शोषणालाच प्राधान्य दिले होते.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)