पुणे : शहरातील सामाजिक सोलोख्याचे वातावरण बिघडून धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटकास सोडणार नसून , त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट आश्वासन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळात दिले.
पुण्यातीस येरवडा , मुंढवा लोहियानगर , काशेवाडी , पर्वती इत्यादी भागातील वस्त्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जाणीवपूर्वक हिंदू – मुस्लिम ध्रुवीकरणाचे वातावरण तयार केले जात आहे. किरकोळ भांडणांनाना धार्मिक दंग्यांचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व बाबी शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब असल्याने यासंदर्भामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या माध्यमातून पुणे शहरात कार्यरत असलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील कार्यकर्त्यांची बैठक माननीय पोलीस आयुक्त यांच्या समवेत पार पडली. यावेळी सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव , राहुल डंबाळे , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जमीत उलमाचे कारि मोहम्मद इद्रीस , वंचित बहुजन आघाडीचे मुनव्वर कुरेशी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वसीम पहिलवान , माजी नगरसेवक मुक्तार शेख , जुबेर मेमण , सुफियान कुरैशी , युसुफ शेख , रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीत पुणे शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या धार्मिक तणावांच्या बाबींची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्तांना देण्यात आली असून त्याबाबत पोलीस आयुक्तांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेला कोणीही गालबोट लावलेले आपण खपवून घेणार नाही व धार्मिक आधारावर कोणी कोणाला जर त्रास देत असेल तर अशांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले.