- 49
- 1 minute read
लोककल्याणकारी राज्यकर्ते – राजर्षी शाहू महाराज
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 87
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1894 मध्ये संस्थानचा राज्यकारभार स्वीकारला. राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती, गरजा व त्यांची दुःखे जाणून घेतली. सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांचे दुःख निवारण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. अज्ञान, अंधश्रद्धा नि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याखेरीज आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली. गावोगावी शाळा काढल्या, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, पुरोहित शाळा सुरू केल्या. त्याकाळी अस्पृश्यांना विद्येचा अधिकार तर नव्हताच; पण देवालये, चावड्या, सार्वजनिक पाणवठे आदी ठिकाणीही प्रवेश करण्यास त्यांना मनाई होती. महाराजांनी अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न स्वतःपासून केला. अस्पृश्य तरुणांना मोटार ड्रायव्हिंगच्या कोर्सला पाठवून आपल्या, महाराणी साहेबांच्या, चिरंजीव आक्कासाहेब व युवराज यांच्या गाडीवर नेमले. पट्टेवाले, शिपाई, डगलेवाले पोलीस, स्वतःचे शरीर-रक्षक अस्पृश्य नेमले. थोडेसे शिक्षण झालेल्यांना त्या मानाने कारकून, रजिस्ट्रारच्या जागा दिल्या. महात्मा फुले यांचा अस्पृश्योद्धाराचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरविला.
खुद्द महाराजांच्या राजवाड्यातही ही सुधारणा अप्रिय वाटत होती. आपल्या राजवाड्यातील खासगी देवालयातील ब्राह्मण पुजाऱ्यास महाराजांनी काढून टाकले. पूजा-अर्चा, धार्मिक विधी प्रत्येक ठिकाणी मराठा पुरोहितांकडून चालू केले. राजवाड्यातही सर्वांना मराठा पुरोहितांकडून विधी करवून घ्यावेत, अशी सूचना केली. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही’ असेच प्रजेला वाटते.शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
राजर्षी शाहूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे.
अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919 मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारले. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये “दलितांचा नेता” व “भारतीय अग्रणी नेता” म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.
कुशाग्र बुध्दिमत्ता, प्रभावित करणारं व्यक्तिमत्व, कलेविषयी अगाध प्रेम, थोर समाज सुधारक, बहुजन समाजाचा उध्दारकर्ता, कुशल प्रशासक, स्वच्छ प्रतिमा असलेला राज्यकर्ता म्हणुन कोल्हापूर संस्थानांचे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी दैदिप्यमान राज्य कारभार केला. ज्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद घेवूनच देशभर त्यांची 150 वी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
0Shares