- 34
- 1 minute read
माझ्या बाबांची एक आठवण !
साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साल असावं. बेकार होतो. एकमेव उद्योग म्हणजे कविता. जिथे कुठे कविसंमेलन असेल तिथे धावत जायचो. पैसे असले तर टिकिट काढायची. नसेल तर ठिकाण बघायचे. जवळपास असेल तर पायी चालत जायचं. दूर असेल तर विदाऊट ट्रेनचा प्रवास करायचा. पण कविसंमेलनाला हजेरी लावायचोच. क्वचितच नाव पुकारुन काव्यवाचनाची संधी मिळायची. जर नाव नाहीच पुकारले की आम्ही स्वतःच जाऊन माईक हातात घेऊन आमची कविता म्हणायचो. एकदा असाच विदाऊट प्रवास करताना टिसीने पकडले. मग त्याला एक कविता ऐकवली. कविता ऐकून टिसी एवढा खुष झाला की, त्याने मला स्वतःहून चहा पाजला आणि स्वतःच्या पैशाने भायखळ्यापर्यंतचे टिकिटही काढून दिले.
तर मी हे सांगत होतो की, याच वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने राज्यस्तरीय अप्रकाशित काव्यसंग्रहाची स्पर्धा आयोजित केल्याचे वाचनात आले. तोपर्यंत माझाही काव्यसंग्रह प्रकाशित झालेला नव्हता. दहा दिवसाची मुदत होती. म्हणून मग मी कामाला लागलो. आमच्या चाळीजवळचे एक हिंदू हाॅटेल दुपारचे रिकामेच असायचे आणि हाॅटेल मालकही ओळखीचा होता. मी त्याला विनंती केल्यावर त्याने मला वर पंखा नसलेला कोपर्यातला एक टेबल दाखविला. मी सलग पाच दिवस त्या टेबलावर दिवसभर बसून माझ्या हाताने माझ्या कविता लिहून काढल्या. इथे मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की, माझ्या वडिलांप्रमाणेच माझंही हस्ताक्षर खुप सुंदर आहे. असो. तर मी हे सांगत होतो की, सहाव्या दिवशी मी माझं हे हस्तलिखित दादरला जाऊन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात दिले.
यथावकाश मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पारितोषिक वितरणाचा दिवस उजाडला. या संस्थेचे हे पंचविसावे की पन्नासावे वर्ष असावे. सगळ्याच स्पर्धकांना या कार्यक्रमात बोलावले होते. या कार्यक्रमास कोणीतरी मोठे नाटककार आणि पद्मश्री दया पवार प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रास्ताविक, भाषणे झाल्यानंतर राज्यस्तरीय अप्रकाशित काव्यसंग्रहाचा रिझल्ट जाहीर करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथम पाच उत्तेजनार्थ मग तिसरा, दुसरा.. यात कुठेही माझे नांव आले नाही. म्हणून मग मी ही मनाची तयारी केली. मनातच म्हटलं, नाहीतर नाही. आपण निराश व्हायचं नाही. मन घट्ट केलं आणि पहिला क्रमांक कुणाचा आहे ते उत्सुकतेने ऐकू लागलो. आणि पहिल्या क्रमांकावर चक्क माझ्या नावाची घोषणा झाली. मी स्टेजवर गेलो. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयाचं पाकिट टाळ्यांच्या कडकडाटात दया पवारांच्या हस्ते स्विकारलं. स्टेजवरुन खाली उतरत असतानाच दया पवारांनी पुन्हा बोलावून घेतलं आणि मला त्यांच्या आवडीची ती कविता मला माईकवर बोलण्यास सांगीतले. मग मीही त्यांच्या आवडीची ‘ती’ कविता म्हणजेच माझी गाडगेबाबांची ‘देवकीनंदन गोपाला!’ दमदारपणे सादर केली आणि पुन्हा एकदा संपूर्ण हाॅल टाळ्यांच्या कडकडाटाने कडाडून गेला.
सगळ्यांचा निरोप घेऊन मी घरी आलो. आईकडे ते सगळं सोपवलं. घाईघाईत जेवलो आणि वडिल यायच्या आत मी माझी वळकटी घेऊन गच्चीवर झोपायला गेलो. इथे मला माझ्या बाबांविषयी थोडं सांगायचे आहे. माझ्या कवितेविषयी आमच्या वडिलांना प्रचंड राग असायचा. कित्येक वेळेस बाबा आईला म्हणायचे, ‘चांगला कामधंदा बघायचं सोडून कविता करत बसलाय. भिक्कारपणाचे डोहाळे लागलेत साल्याला.’ त्यामुळे मी ही बाबांना टाळायचो. बाबा सकाळी नऊ वाजता ऑफिसला जायचे. ऑफिस सुटले की ते परस्पर भोईवाड्याच्या बौध्दजन पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये जायचे. ते पंचायत समितीचे खजिनदार होते. आणि रात्री अकरा पर्यंत घरी यायचे. मग मी सुध्दा बाबा ऑफिसला गेले की गच्चीवरुन खाली यायचो आणि रात्री अकराच्या आधी बिछाना घेऊन गच्चीवर जायचो. उगाच वादावादी नको, म्हणून मी बाबांसमोर यायचे टाळायचो. आता मी जे काही सांगणार आहे ते मला आईकडून नंतर कळले.
तर मी सांगत होतो की, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कार्यक्रम आटोपून मी घरी पोहोचलो आणि दया पवार थेट भोईवाड्याच्या बौध्दजन पंचायत समितीच्या कार्यालयात पोहोचले. मला हे नंतर समजलं की, दादरला आलं की पंचायत समितीत जाऊन आर.जी.रुके साहेबांची भेट घेणं, हा दया पवारांचा नेहमीचा शिरस्ता होता. तिथे जाताच रुके साहेबांनी दया पवारांचं भरभरुन स्वागत केलं आणि विष्णू कदमला चहा आणण्यास सांगीतले. दया पवार स्थानापन्न झाले. इकडच्या, तिकडच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या. इतक्यात चहा आला. चहा पिता, पिता दया पवार म्हणाले, ‘रुके साहेब आज मी माझ्या हस्ते आपल्या समाजातल्या एका मोठ्या कविला पुरस्कार देऊन आलोय. त्याने आपल्या कवितेत जो गाडगे बाबा उभा केलाय तो खरच तुम्ही स्वतः ऐकायला हवा!’ त्यावर रुके साहेब म्हणाले, ‘कोण आहे तो कवी? त्याचे नाव काय?’ दया पवार म्हणाले, ‘विवेक मोरे असं नांव आहे त्याचं!’ त्यावर रुके साहेबांनी समोरच्या टेबलावर काम करत असलेल्या व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश केला आणि म्हणाले, हे काय, विवेक मोरेंचे वडिल, डी.आर.मोरे. हे ऐकताच दया पवार चटकन उठून माझ्या वडिलांकडे आले, जयभीम केला आणि पुढे ते काय, काय म्हणाले हे मी सांगत नाही. तुम्ही जाणकार आहात त्यामुळे तुम्ही याची कल्पना करू शकता.
रात्री बाबा घरी आले आणि जेवताना विवेकने काही आणलय का, म्हणून आईला विचारू लागले. आईने मी आणलेलं सगळं बाबांना दाखविलं. आईने बाबांना विचारलं की, हे तुम्हाला कसं काय कळलं? मग बाबा म्हणाले की, एक फार मोठा माणूस पंचायत समितीत आला होता आणि तो विवेकचं भरभरुन कौतुक करत होता. असं म्हणून बाबांनी पंचायत समितीमध्ये दया पवार काय म्हणत होते हे अगदी कौतुकाने साग्रसंगीत आईला सांगीतले आणि नंतर मग मला हे आईने सांगीतले.
बाबा माझ्यासमोर कधीच माझ्या कवितेचं कौतुक करीत नसत. कसल्या साल्या कविता करतोस? हा त्यांचा नेहमीचा डायलॉग माझ्या सवयीचा झाला होता. मात्र माझ्या पाठी ते माझ्या कवितांचे भरभरुन कौतुक करायचे हे मला नंतर कुणाकडून तरी कळायचे. यामुळे माझा फायदा हा झाला की, माझ्या डोक्यात कधीच गर्वाची हवा शिरली नाही. माझे पाय सतत जमिनीवर राहण्यासाठी मला माझ्या बाबांची खुप मदत झाली. आजही मी स्वतःला कधीच मोठा कवी मानत नाही, आजही माझ्यानंतर येणाऱ्या कवींचे मी भरभरुन स्वागत करू शकतो, त्यांच्याकडूनही नवं काही शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. याचे सर्व श्रेय हे माझ्या बाबांना जाते. बाबा मी तुमचा खरच आभारी आहे. काल परवाच बाप दिन झाला. त्या वेळेसच खरं तर ही आठवण शेअर करायला हवी होती. पण अनायासे ते राहुनच गेलं. मला घडविणारा माझा बाप आज नाही आहे. करोना काळात तो आम्हाला सोडून गेला. पण सतत तो माझ्या सोबत असतो. उशीरा का होईना माझ्या या बाबांना या बाप दिनाच्या शुभेच्छा देताना सहजच ही आठवण शेअर कराविशी वाटली. थँक यू बाबा !
– विवेक मोरे