- 25
- 1 minute read
जो पर्यंत हिंदूंची प्रस्थापित व्यवस्था अस्तित्वात आहे, तोपर्यंत पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना (दलितांना) सापत्नभावाची वागणूक मिळत राहणार. हे त्रिकालाबाधित सत्य असून, काळ्या दगडावरची रेघ आहे.
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३०
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, अस्पृश्यांचे अध:पतन होण्याचे कारण म्हणजे हिंदू समाजाने अस्पृश्यांना माणूस म्हणून वागविले नाही. अस्पृश्य म्हणजे अस्वच्छ आहे, जो मैत्रीस अपात्र आहे, व्यवहारास अपात्र आहे, अशी त्याला वागणूक देण्यात आली. परकीय गुलामांच्या बाजूने त्या देशातील धर्म होता. परंतु, अस्पृश्यांच्या संदर्भात असे घडू शकले नाही. धर्म नि:पक्षपाती राहिला तर तो कायद्याने केलेल्या अन्यायाचा पराभव करू शकतो. भारतातील अस्पृश्यांच्या संदर्भात हिंदू धर्माने पक्षपात करून अस्पृश्यता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्य हे हिंदू संस्थेचे घटक नाहीत आणि हिंदूंनाही असे वाटत नाही की, अस्पृश्य व हिंदू एकाच समाजाचे घटक आहेत. हिंदूंमध्ये सदसद्विवेक बुद्धी नसल्यामुळे अस्पृश्यांना जो अन्याय आणि असमान वागणुकीचा हिंदूंकडून त्रास होतो त्याबद्दल हिंदूंना आपण काही अनैतिक करत आहोत, पाप करत आहोत असे वाटत नाही. अशा अन्यायात, असमानतेत काही चुकीचे आहे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे ते अस्पृश्यांना तशी वागणूक देतात.
अस्पृश्यतेची समस्या ही केवळ आर्थिक वा कायद्याने निर्माण झाली नसून ती धार्मिक आधारावर निर्माण झाली. इतकेच नव्हे तर, अस्पृश्यता पाळणे हा हिंदूंच्या दैनंदिन सामाजिक जीवनातील एक भाग बनला आहे. त्यामुळे, अस्पृश्यतेची समस्या सहजासहजी भारतीय समाजातून नष्ट होणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. परंतु, अन्य सुधारकांच्या मते, जातीव्यवस्थेवर हल्ला न करता, त्याला धक्का न लावता अस्पृश्यता नष्ट करता येवू शकते. अन्य सुधारकांच्या या विचाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. मानस शास्त्रीयदृष्ट्या जात व अस्पृश्यता ही अविभाज्य असून एकाच तत्वावर अधिष्ठित आहे. हिंदूंची जातींवर श्रद्धा असल्यामुळेच ते अस्पृश्यता पाळत आहेत. भारतीय समाजावर धर्माचा प्रभाव फार खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे, अस्पृश्यता केवळ कायदे करून सुटणार नाही, यांची जाणीव बाबासाहेबांना होती. त्यामुळेच, भारतीय संविधानात अस्पृश्यता पाळणे गुन्हा ठरविला असून देखील अस्पृश्यता नष्ट झाली नाही. या बाबींचा विचार करता, जातीव्यवस्था नष्ट केल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट करण्याची कल्पना किती निरर्थक आहे यांची कल्पना येते.
जीवनशक्ति देणारे तीन प्रकारचे निर्बंध आहेत. ते म्हणजे, कायदेशीर, सामाजिक आणि धार्मिक होय. जातीव्यवस्थेमागे असणारे निर्बंध धार्मिक निर्बंध आहेत. कारण, जात म्हणजे वर्णपद्धतीचे नवे रूप असल्यामुळे हे निर्बंध हिंदूंच्या पवित्र धर्मग्रंथ असलेल्या वेदातून आले आहेत आणि ते निर्बंध अटळ स्वरूपाचे आहेत. म्हणूनच, बाबासाहेब म्हणतात की, धार्मिक निर्बंध पवित्र व अटळ ठरतात. हिंदूंच्या दृष्टीने जात ही पवित्र असल्याने जात ही अटळ बनली आहे. जर जात नष्ट झाली नाही तर अस्पृश्यता नष्ट होईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अस्पृश्यांना सतत दुर्बलतेशी व सापत्नभावाच्या वागणुकीशी तोंड द्यावे लागते. हा सापत्नभाव अस्पृश्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे बाबासाहेब म्हणतात. अशा प्रकारच्या सापत्नभावाच्या वागणुकीमुळे अस्पृश्य स्वतःची प्रगती करू शकत नाहीत. नोकरीत छळ, हल्ला, मारहाण इत्यादि भीतीप्रद भावनांनी त्यांचे जीवन व्यापले गेले आहे. सततच्या या भीतीमुळे त्यांचे जीवन असुरक्षित बनले आहे. गुणवत्ता असलेल्या अस्पृश्यांचे पद्धतशीरपणे अवमूल्यन करून, त्यांना हीन लेखण्यात येते. सापत्नभावाच्या वागणुकीला स्वातंत्र्याचा अभाव असे दुसरे नाव आहे. अशा प्रकारे अस्पृश्यांना हिंदूंकडून मिळणाऱ्या सापत्नभावाच्या वागणुकीचे विश्लेषण करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा निष्कर्ष काढतात की, जो पर्यंत हिंदूंची प्रस्थापित व्यवस्था अस्तित्वात आहे, तोपर्यंत अस्पृश्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत राहणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ती काळ्या दगडावरची रेघ आहे.
माझे मत: पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना ज्यांना हल्ली दलित म्हणून संबोधण्यात येते, त्यांच्यावर आजही होत असलेले अन्याय अत्याचार बघता बाबांसाहेबांचा निष्कर्ष अर्थात त्यांनी दिलेला इशारा आजही तितकाच खरा ठरत आहे. त्यामुळेच, बाबांसाहेबांनी हिंदूंची जात-धर्म व्यवस्था त्यागून जात विरहित स्वातंत्र, समता, बंधुता व न्यायावर आधारित तथागत बुद्धाचा धम्म आपणास दिला. या धम्माचे पालन करून, एक आदर्श व मानवतावादी समाज घडविणे बाबासाहेबांना अपेक्षित होते. आपण यात कोठे बसतो, हे प्रत्येक बौद्धाने शोधून, काही उणिवा असल्यास त्यात दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)