/ सध्याच्या अस्पृश्यांचे पूर्वज हे अस्पृश्य नव्हते, तर ते गावकऱ्यांच्या बरोबरीचे होते. त्यांच्यात व गावकऱ्यांमध्ये, “केवळ भिन्न टोळ्यातील”, असाच फरक होता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सध्याच्या अस्पृश्यांचे पूर्वज हे अस्पृश्य नव्हते, तर ते गावकऱ्यांच्या बरोबरीचे होते. त्यांच्यात व गावकऱ्यांमध्ये, “केवळ भिन्न टोळ्यातील”, असाच फरक होता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३४ (११ जुलै २०२४)
अस्पृश्य हे वाताहत झालेले लोकं होते, हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील महार या अस्पृश्य जमातीशी संबंधीत गोष्टीचा दूसरा पुरावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधनातून सादर करतात.
पूर्वाश्रमीची महार ही महाराष्ट्रातील एक प्रमुख जमात आहे. महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जमातींमधील ही सर्वात मोठी जमात आहे. स्पृश्य हिंदू व महार यांचे संबंध दर्शवणाऱ्या पुढील गोष्टी आहेत: १. महार लोकं प्रत्येक गावात आढळतात. २. महाराष्ट्रातील प्रत्येक खेडयाभोवती गावकूस असून महारांची वस्ती या गावकुसाबाहेर असते. ३. त्या त्या गावाच्यावतीने खेड्यांची निगरानी करण्याचे काम आळीपाळीने महार करतात. ४. हिंदू गावकऱ्यांकडून या महारांना ५२ प्रकारचे हक्क मिळालेले आहेत. या ५२ हक्कांपैकी काही अत्यंत महत्वाचे असे पुढील हक्क आहेत: अ. प्रत्येक हंगामाच्या वेळी प्रत्येक गावकऱ्यांकडून धान्य गोळा करण्याचा हक्क. ब. गावकऱ्यांच्या मालकीच्या मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा हक्क.
वाताहत झालेल्या लोकांविषयी भारतात जे घडले तेच अन्य देशामध्येही घडले आहे. आयर्लंड मधील फ्यूधिर आणि वेल्समधील आल्ट्रडयूट आणि भारतातील अस्पृश्य लोकांमध्ये पूर्णतः साम्य आहे. कालांतराने आयर्लंड आणि वेल्समधील वाताहत झालेल्या लोकांच्या वेगळ्या वसाहती नाहीशा झाल्या आणि ते त्या स्थायी टोळीचा भाग बनून तिच्यात समाविष्ट झाले. असे या देशात का घडले, या संबंधात बाबासाहेब म्हणतात की, उत्क्रांतीच्या काळात टोळीच्या संघटनेसाठी आवश्यक असलेल्या रक्ताच्या नाते संबंधाऐवजी सर्वांच्या मालकीचा एक भू-प्रदेश अशा नव्या बंधनाचा पर्याय दिला असल्याने वाताहत झालेल्या लोकांच्या स्वतंत्र वसाहती नाहीशा झाल्या. मात्र, तसे भारतात घडले नाही. कारण, अस्पृश्यतेची भावना प्रबळ ठरली आणि ‘आपले व परके’, जमातीतील व जमातबाह्य यातील भेद दुसऱ्या रूपाने म्हणजे स्पृश्य आणि अस्पृश्यांच्या रूपाने चिरस्थायी झाले. त्यामुळे, आयर्लंड आणि वेल्समध्ये ज्या प्रमाणे सळमिसळ झाली, तशी भारतात होण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामतः अस्पृश्यांसाठी विभक्त वसाहत असलेले भारतीय खेड्यांचे वैशिष्ट तसेच कायम व चिरंतन राहिले. अशा प्रकारे, बाबांसाहेबांनी अस्पृश्य मुळचे कोण याचा शोध आपल्या संशोधनातून घेतला आणि संशोधनाअंती असे स्पष्ट केले की, अस्पृश्य हे मुळचे वाताहत झालेले लोकं आहेत. बाबासाहेब आपल्या अध्ययनामधून पुढील दोन गोष्टी स्पष्ट करतात: १. अस्पृश्यांना, ‘अस्पृश्य”, म्हणून घोषित केल्यामुळे हद्दपार करून गावाबाहेर राहण्यास भाग पाडण्यात आलेले नाही. तर ते सुरवातीपासूनच बाहेर राहत होते. कारण, ते वाताहत झालेले लोकं होते. आणि, स्थायी झालेल्या टोळीपेक्षा ते लोकं वेगळ्या टोळीतील होते. २. सध्याच्या अस्पृश्यांचे पूर्वज हे अस्पृश्य नव्हते, तर ते गावकऱ्यांच्या तंतोतंत बरोबरीचे होते. त्यांच्यात व गावकऱ्यांमध्ये, “केवळ भिन्न टोळ्यातील”, असाच फरक होता. अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य हे कोण आहेत, यांकहे संशोधन करून ते मूळचे वाताहत झालेले लोकं होय, असा सिद्धांत मांडला.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)