- 44
- 1 minute read
अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा सिद्धांत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३५
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, The Untouchables, who are they and why they became Untouchables?” या ग्रंथातील पहिल्या आणि दुसऱ्या भागात अस्पृश्य कोण आहेत, याचे सविस्तर विश्लेषण केले असून, चौथ्या व पाचव्या भागात अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा नवीन सिद्धांत मांडला. आपला सिद्धांत मांडण्यापूर्वी अस्पृश्यतेच्या उत्पत्तीच्या जुन्या सिद्धांताचे त्यांनी खंडन केले.
बाबासाहेबांच्या संशोधनानुसार अस्पृश्यता कशी निर्माण झाली या प्रश्नाचे स्पष्टीकरण करणारा स्टॅनले राईस हा एकच लेखक आढळला. Hindu Customs and Their Origins या ग्रंथात राईस यांनी अस्पृश्यतेच्या उत्पत्तीबद्दल आपला सिद्धांत मांडला आहे. वंश आणि व्यवसाय या आधारावर राईस यांनी अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचे दोन भाग पाडले आहेत.
अ. वंशभेदावर आधारीत अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा सिद्धांत: या सिद्धांतात अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचे दोन तत्वे आहेत.
१. अस्पृश्य हे अनार्य, अद्रविड असे आदिवासी लोकं आहेत.
२. द्रविड जातीच्या लोकांनी त्यांना जिंकून दास बनविले.
राईस यांच्या मते, भारतावर दोन वेळा आक्रमण झाले. पहिले आक्रमण द्रविडांनी केले. त्यांनी भारतातील अद्रविड अशा आदिवासी लोकांना म्हणजेच आजच्या अस्पृश्य लोकांच्या पूर्वजांना जिंकले आणि अस्पृश्य बनविले. तर, दुसरे आक्रमण हे आर्यांनी केले आणि आर्यांनी द्रविडांना जिंकले. आर्यांनी द्रविडांना कसे वागविले याबाबत राईस यांनी काहीच लिहिले नाही. सुरवातीच्या काळात द्रविडांनी अद्रविडांना जिंकले. नंतर, आर्यांनी द्रविडांना शूद्र बनविले. अशा प्रकारचा राईसचा सिद्धांत आहे.
बाबासाहेबांच्या मते, राईस यांची ही मांडणी अत्यंत यांत्रिक स्वरूपाची असून, पायाशून्य तर्क आहे. तरी देखील या सिद्धांतामुळे शूद्र व अस्पृश्यांच्या उत्पत्ती संबंधीच्या गुंतागुंतीच्या घटना अतिशय सोप्या होतात. आर्य, द्रविड, दास आणि नाग लोक या चार नावांचा उल्लेख भारतीय इतिहासात वारंवार आढळतो. ही नावे वेगवेगळ्या वंशाची नाहीत, तर ते वेगवेगळे वंश आहेत, अशी सर्वसाधारण समजूत आहे. या समजुतीवरच हिंदू समाजाचे, विशेषतः त्यांच्या वर्णपद्धतीचे स्पष्टीकरण करणाऱ्या राईससारख्यांची उत्पत्ती आधारलेली आहे. भारतातील दास म्हणजेच नाग लोक होत आणि नाग लोक म्हणजे द्रविड लोक होत. बाबासाहेब पुढे स्पष्ट करतात की, भारतामध्ये जास्तीत जास्त दोनच वंशाचे लोकं राहत आलेले आहेत, ते वंश म्हणजे आर्य व नाग हे होत. या विश्लेषणावरून राईसच्या अस्पृश्यांच्या उत्पत्तीबाबत वंशावर आधारलेला सिद्धांत कोलमडून पडतो. कारण, येथे तीन वंश अस्तित्वात असल्याचे राईस गृहीत धरून आपला सिद्धांत मांडतो. परंतु, भारतात दोनच वंशाचे लोकं आहेत.
ब. व्यवसायावर आधारित अस्पृश्यतेचा उत्पत्तीचा सिद्धांत: गलीच्छ व घाणेरड्या व्यवसाय/धंद्यामधून अस्पृश्यतेचा उगम झाला असा निष्कर्ष राईस काढतो. यावर बाबासाहेब काही प्रश्न उपस्थित करतात. भारतातील अस्पृश्य जे गलीच्छ व घाणेरडे काम करतात ते, जगातील प्रत्येक मानवी समाजामध्ये आहे. तेव्हा जगाच्या इतर भागात या लोकांना अस्पृश्यांसारखी वागणूक का देण्यात येत नाही? आर्य म्हणून मान्यता असलेले ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य सुद्धा अत्यंत गलीच्छ समजले जाणारे संडास साफ करण्याचे काम करत होते. संडास साफ करण्याचे काम जर आर्यांना घृणास्पद वाटत नव्हते, तर अस्पृश्यतेचे मूळ कारण गलीच्छ धंदे हे आहेत, असे म्हणत येणार नाही. त्यामुळे या आधारावर अस्पृश्यतेची निर्मिती झाली असे म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राईस यांच्या वंशभेद व व्यवसायामुळे अस्पृश्यतेची निर्मिती झाली या सिद्धांताचे खंडन केले आणि अस्पृश्यतेच्या उत्पत्तीसंबंधीचा नवीन सिद्धांत मांडला. (क्रमशः..बाबांसाहेबांचा सिद्धांत पुढील भागात)
– संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)