- 77
- 1 minute read
जयंत पाटील यांचा ठरवून ‘गेम’ केलाय का ?
जयंत पाटील यांचा ठरवून ‘गेम’ केलाय का?
ऍड. डॉ. सुरेश माने यांचा सवाल
महाराष्ट्रातील विधानपरिषद 11 जागा निवडणुकीच्या महाभारताविषयी कालपासून सर्व मीडियामध्ये वेगवेगळ्या विस्तृत बातम्या येत असून कुणाचे किती आमदार फुटले आणि त्यामुळे कुणाची किती मते कोणी फोडली कुणाकुणाला लक्ष्मीदर्शन घडले किंवा मतदार संघासाठी निधी मिळाला याची चविष्ट चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणातला सध्या विषय आहे.
परंतु तरीदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने डाव्या पुरोगामी चळवळीतील एकांडा शिलेदार आमचे मित्र शेकापचे भाई जयंत पाटील यांचा गेम झाला की कुणी ठरवून गेम केला हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रश्न महाराष्ट्र समोर आलेला आहे.
महाराष्ट्रातील धूर्त राजकारणी नेते शरद पवार यांचा पाठिंबा असून देखील भाई जयंत पाटील यांचा पराभव होणे व महाविकास आघाडीतील लहान लहान पक्ष यांच्या आमदारांची मते उदाहरणार्थ सीपीएम यांची मते कुठे गेली हे देखील स्पष्ट आहे हे विशेष.
महायुती मधील शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार एनसीपी यांना जास्त मते मिळाली हे मात्र न उलगडलेले कोडे आहे आणि त्यामध्येच स्वतः शरद पवार एनसीपी पक्षाचे एक मत फुटले आहे हे भाई जयंत पाटील यांचे विधान फारच बोलके आहे शिवाय आत्तापर्यंत भाई जयंत पाटील यांच्या परावाबाबत शरद पवार यांनी किंवा त्यांच्या पक्षाने कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
या निवडणूक निमित्ताने महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामधील म्हणजेच महाविकास आघाडीतील विसंगती पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली आणि स्वतःचे पक्ष वाढविण्याकरिता आपल्या सहकारी पक्षांचा देखील बळी कसा घेतला जाऊ शकतो हे देखील स्पष्ट झाले नाही तर शिवसेनेतर्फे नॉर्वेकर यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात घोषित केली त्याला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी कोणतीही हरकत घेतली नाही तेव्हाच भाई जयंत पाटील यांचा पराभव होणार हे निश्चित झालेले होते की या निवडणूक निमित्ताने रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पराभव बद्दल शेकाप पक्षाला जबाबदार धरून त्यांचा ठरवून गेम उद्धव ठाकरे शिवसेनेने केला असाही संशय घ्यायला जागा आहे. कारण शेवटी उमेदवार जिंकण्यासाठी या निवडणुकीत अंतिम लढाई झाली ती नॉर्वेकर आणि भाई जयंत पाटील यांच्यामध्येच
काँग्रेस पक्षाच्या मॅनेजमेंट बद्दल हंडोरेचा गेल्या निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती झाली म्हणजे त्याबद्दल काय म्हणावे त्याही निवडणूक वेळी मी स्वतः चंद्रकांत हंडोरे हे निवडणूक हरणार आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील मराठा राजकारण हंडोरेचा पराभव करणार ही भविष्यवाणी केलेली होती आणि ती नंतर खरीच झाली.
अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकार कालखंडात सरकारने अपेक्षेनुसार काम न केल्यामुळे महाविकास आघाडीतील सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पुरोगामी सर्व पक्षांनी ज्यांचे दहा ते अकरा आमदार होते त्या सर्वांनी पाठिंबा दिलेला असताना सुद्धा भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वातच प्रागतिक पक्ष आघाडी निर्माण करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांच्याशिवाय वेगळ्या आघाडीच्या राजकारणासाठी पोषक वातावरण निर्माण केलेले होते. परंतु लोकसभा निवडणूक 2024 कालखंडात इंडिया आघाडी अस्तित्वात आल्याने भाई जयंत पाटील यांनी त्यामध्ये सर्व प्रागतिक पक्षांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन जाण्याऐवजी स्वतःच पटकन उडी मारून गेल्यामुळे प्रागतिक पक्ष आघाडी संपुष्टात आली त्यामुळे सुद्धा आजची पराभवाची चव त्यांना चाखावी लागली हे देखील प्रागतिक पक्षाच्या संयोजकापैकी मी एक संयोजक म्हणून त्यांना स्पष्टपणे सांगावेच लागेल. अन्यथा प्रागतिक पक्षाचे 10, 11 आमदार आणि मग इतर यांच्या मतावर भाई जयंत पाटील यांना विधान परिषदेची निवडणूक सहजरीत्या जिंकता आली असती आणि त्यांनी गेल्या तीन विधान परिषद निवडणुका अशाच वेगवेगळ्या प्रकारे जिंकलेल्या आहेत
परंतु त्यांनी ही निवडणूक सर्वस्वी इतरांच्या वरती सोपवली, चांगले बस्तान बसलेल्या प्रागतिक पक्ष आघाडीला मोडीत काढले त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले ही शोकांतिका होय. मात्र यामुळे डाव्या पुरोगामी चळवळीतील एका झुंजार आमदाराची विधान परिषदेतील टर्म संपुष्टात आली हे खेदाची बाब होय.
– एडवोकेट डॉक्टर सुरेश माने (संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)