• 26
  • 1 minute read

वर्षावास धम्म जागर महोत्सव भारतीय तत्त्वज्ञानाचा अविष्कार

वर्षावास धम्म जागर महोत्सव भारतीय तत्त्वज्ञानाचा अविष्कार

वर्षावास धम्म जागर महोत्सव
भारतीय तत्त्वज्ञानाचा अविष्कार

पवित्र दिवस आषाढ पौर्णिमा इ. स. पूर्व ५२८ तथागत भगवान बुध्दांच्या सिंहगर्जनेतून या भुतलावर भारतीय तत्त्वज्ञानाचा अविष्कार झाला. धर्म या व्याखेत बसणार, धर्माच्या कसोटीवर उतरणारं. ज्याला खऱ्या अर्थाने धर्मतत्त्वज्ञान तथा धर्माचे तत्त्वज्ञान म्हणता येऊ शकेल असे तत्त्वज्ञान सम्यक समबुध्दांकडून या भुतलावर पहिल्यांदा अविष्कारीत झालं. दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल की, ज्याला धर्म म्हणतात, निसर्गाचा नियम म्हणतात तो भगवान बुध्दांनी उपदेशिला. भगवान बुध्दांनी उपदेशिलेला हा धम्म पुढे साऱ्या जगात लोकप्रिय होवून तो विश्वधर्म झाला. वैशाख पौर्णिमा इ.स. पूर्व ५२८ बुध्दगया येथे सम्यक संबोधी अर्थात ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सम्यक संबुध्दासमोर प्रश्न उपस्थित झाला. या तत्त्वज्ञानाचा प्रचार मी करावा की हे ज्ञान मी फक्त स्वत:च्या आत्मकल्याणासाठी वापराववापरावं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बुध्द आणि त्यांचा विषादयोग या सदरात ब्रम्ह सहम्पतीला जेव्हा कळले की, तथागत निष्क्रीयतेकडे वळत आहे तेव्हा चिंतीत होवून ब्रम्ह सहम्पती बुध्दांपुढे उपस्थित झाले आणि दोन्ही हात जोडून विनंती केली “आता आपण सिध्दार्थ गौतम राहीला नाहीत. आता आपण सम्यक सम्बुध्द आहात. आपणांस बुध्दत्व प्राप्त झाले आहे. आपण तथागत आहात. आपण मनुष्यमात्रांना धम्माचा प्रकाश देण्यापासून कसे विन्मुख होऊ शकता?” ब्रम्हसहम्पती पुढे म्हणाला, “भगवान, आपण जाणतच आहात की, प्राचिन काळापासून मगधवासियांमध्ये अनेक दोषांनी भरलेला एक अशुध्द धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय?”
भगवान बुध्दांनी मानव समाजाला दु:खातून, कलहातून मुक्त करण्यासाठी गृहत्याग, राजदरबार, राजविलासाचा त्याग करून परिव्रजा घेतली आणि पुढे अथक प्रयत्न व परिश्रमाने त्यांना सम्यक संबोधी प्राप्ती झाली. तेव्हा त्या काळात ६२ पंथ अस्तित्वात होते. हे सारे पंथ ब्राम्हण आणि ब्राम्हणी धर्म तत्त्वज्ञानाच्या विरोधात होते. परंतु ईश्वर, आत्मा, तपश्चर्या, कर्मकांड या कल्पनांमध्येच गुरफटलेले होते. लोकांच्यावर देखील या कर्मकांडी क्रियाकर्माचा प्रभाव होता. प्रदीर्घ काळापासून या अंध, रुढी, परंपरांच्या प्रभावाखाली राहिलेले हे लोक या जुन्या मान्यतेतून बाहेर येतील का ? माझा नवा धर्म आचरणात आणतील का ? अशा विचारात भगवान बुध्द होते. परंतु या मानवसमाजाच्या प्रती करूणेची भावना मनात असल्यामुळेच सिध्दार्थ गौतमांनी परिव्रजा घेतली होती. म्हणूनच त्यांनी धम्मोपदेश करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी योग्य व्यक्तींच्या शोधात ते बुध्दगया वरून वाराणसीच्या दिशेला सारनाथ इसिपतन येथील मृगदायवनात जेथे कौण्डिण्य, अश्वजित, काश्यप (वप्प), महानाम, भद्रिक हे पाच परिव्राजक होते. तेथे गेले. तपश्चर्येच्या काळातील हे सिध्दार्थ गौतमाचे सहकारी होते.
भगवान बुध्दांचा धम्म मध्यम मार्ग, निरिश्वरवादी, अनात्म आणि अनित्यतेचा बोध देणारा, माणुस आणि माणसाचं माणसाशी असणार नात याला केंद्रबिंदु मानणारा, दुःखाच अस्तित्व मानणारा आणि दु:ख मुक्तीचा मार्ग दाखवणारा विशुध्दी मार्ग तथा पंचशिल पावन पथ दर्शक. आर्यअष्टांगित मार्ग, शिल मार्ग तथा पारमितांची अर्थात माणसाला पुर्णत्वाची अवस्था प्राप्त करून घेण्याची शिकवण देणारा असा धर्म. आपल्या या धम्मात बुध्दांनी उपासकांसाठी पंचशील व भिक्खुंसाठी दसशिल तथा दहा आज्ञा सांगितल्या आहेत. तथागत भगवान बुध्दांनी उपदेशिलेला धम्म मानवास मोक्ष तथा निर्वाणाच्या दिशेने घेऊन जाणारा, प्रतित्यसमुत्पाद तथा कर्मसिध्दांतावर आधारलेला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा धम्म आहे.
भगवान बुध्दांचा धम्म सारनाथ इसिपतन येथील मृगदाय वनात पाच परिव्राजकांनी ऐकल्यानंतर ते फार प्रभावीत झाले. बुध्दांविषयी त्यांच्या मनात आदरभाव निर्माण झाला आणि ते बुध्दांना शरण गेले व आम्हाला आपले शिष्य म्हणून स्विकारा अशी त्यांनी विनंती केली. या पाच परव्राजकांना भगवान बुध्दांनी आपल्या धम्मात दिक्षित केले. या पाच भिक्खुंनी भिक्खु संघ निर्माण केला. बुध्दांनी दिलेले हे पहिले प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन सुत्त म्हणून ओळखले जाते.
पुढे बनारस मधील एका श्रेष्ठीचा मुलगा यश याला बुध्दांनी आपल्या संघात दिक्षित केले. यशला भिक्खु झाल्याचे पाहून त्याचे चौपन्न मित्र यांनी देखील संघात प्रवेश केला. तथागतांनी या साठ शिष्यांना निरनिराळ्या दिशेने त्यांच्या विश्वधर्माचा उपदेश करण्यासाठी बाहेर पाठविले. प्रसिध्द नावाजलेले आणि तत्कालिन समाजावर प्रभाव असणारे असे अग्निहोत्री उरुवेला काश्यप, नदी काश्यप व गया काश्यप या तीन बंधूनी त्यांच्या शिष्यांसह बौध्द धम्माचा स्विकार केला आणि तथागतांच्या संघात एक हजार शिष्यांची आणखी भर पडली. मगध राजा आणि त्यांच्या अनुयायांनी बुध्दांचे प्रवचन ऐकून प्रभावित झाले. त्यांनी बौध्द धर्म स्विकारून ते गृहस्थ शिष्य झाले. बिंबीसार राजाने तथागतांच्या भिक्खुसंघास आपल्या राजवाडयावर आदराने निमंत्रित करून त्यांचे आदरातिथ्य केले व वेळूवन भिक्खु संघाकरीता दान दिले. भगवान बुध्द राजगृह येथे वास्तव्यास असताना सारीपुत्त व मोदगलायन यांनी त्यांच्या शिष्यांसह संघ प्रवेश केला व बौध्द धम्माचा स्विकार केला. भगवान बुध्द वेळुवनात वास्तव्यास असताना महाकाश्यप या ब्राम्हण साधूने त्यांची गुणवान पत्नी व त्यांची अफाट संपत्ती यांचा त्याग करून बौध्द धम्माचा स्विकार केला व भिक्खुसंघात प्रवेश केला. कोसल देशाचा राजा प्रसेनजीत, कपील ऋषींचा अनुयायी पांचशिखा, बनारसचा महाकांत्ययन, कोसंबीचा राजा उदयन, दानमतीगावचा ब्राम्हण जातीचा प्रमुख कुटदेव, एकनाला गावचा ब्राम्हण ऋषी भारद्वाज, डाकू अंगूलीमाल, आळवीचा नरभक्षक अलवाक, उग्रसेन डोंबारी, उपाली न्हावी, सुनीत भंगी. आनंदाच्या विनंतीवरून स्त्रियांना सुध्दा भिक्खु संघात प्रवेश देण्यात आला. बुध्दांची मावशी महाप्रजापती, मिगारमाता विशाखा, गणिका, आम्रपाली अशा अनेक स्त्रियांचा सामान्य माणसांचा श्रीमंत, गरीब, ब्राम्हण व इतरही जातीचे लोक बुध्दांच्या धम्मात कोणी उपासक म्हणून तर कोणी भिक्खु म्हणून सहभागी झाला. अशा प्रकारे धर्म प्रचार आणि प्रसार कार्यात बौध्द धम्माने प्रचंड आघाडी घेतली. तत्कालिन सारे धर्म, पंथ, संप्रदाय निष्प्रभ ठरले. बुध्दांच्या उपासक संघात आणि भिक्खु संघात कसलाही भेदभाव नव्हता. समता होती. आजच्या भारतीय संविधानात असलेल्या आर्टिकल १५ ची अंमलबजावणी बुध्द काळात झालेली दिसते. बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार भगवान बुध्द आणि भिक्खु संघाने लोकांच्या कल्याणाकरीता निस्वार्थ भावनेने निरंतर केला.
वैशाख पौर्णिमा इ.स. पूर्व ४८३ भगवान बुध्दांच्या महापरिनिर्वाना नंतरही भिक्खु संघाने आणि उपासकांनी बौध्द धम्माचा प्रचार आणि संवर्धन कार्य गांभिर्याने पुढे चालू ठेवले. त्या वेळी लिपीचा (लेखनाचा) शोध अजून लागलेला नव्हता. म्हणून बुध्दांच्या महापरिनिर्वानानंतर तीन महिन्यांनी श्रावण पौर्णिमा इ.स. ४८३ ला राजगृहाच्या वैभार पर्वतावर सप्तपर्णी नामक गुहेत पहिली धम्म संगीती संपन्न झाली. ही धम्म संगीती मगध नरेश आजात शत्रु यांच्या सहकार्याने महास्थवीर महाकाश्यप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. चौर्याऐंशी हजार धम्मोपदेश (बुध्दवचने) भिक्खु संघाने कंठस्थ केले. आणि त्रिपिठीकाची रचना धम्म, अभिधम्म आणि विनय निश्चित करण्यात आले. ही धम्म संगीती सात महिने चालली.
भगवान बुध्दांच्या महापरिनिर्वाणानंतर २२६ वर्षांनी सम्राट अशोकांच्या पुढाकाराने पाटलीपुत्र येथे अशोकाराम मध्ये अश्विन पौर्णिमेला महास्थवीर मोगलीपुत्त तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी धम्म संगीती संपन्न झाली. ती नऊ महिने चालली. या काळात लिपीचा शोध लागला होता. परंतु, कागदाचा शोध लागलेला नव्हता. सम्राट अशोकांनी बुध्दांनी उपदेशीलेले चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद (धम्मोपदेश) शिलालेखाद्वारे संग्रहीत केले. धम्म प्रचारक नेमून देशोदेशी प्रचारास्तव पाठविले. स्वत:चा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठविले. काश्मिर, गांधार, मर्हिष, राजपुताना, पश्चिम पंजाब, महाराष्ट्र, ग्रिस, सिरिया, इजिप्त ( मिसर), मॅसिडोनिया, सिरीयन, पिरस, हिमबस, ब्रम्हदेश, सिलोन येथे सम्राट अशोकांनी धम्मदूत पाठविले होते. सम्राट अशोकांच्या काळात बौध्द धम्माला आणि भारत देशाला अर्थात तत्कालीन जंबुद्विपाला अंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त झाली. विसाव्या शतकात भारत देशाच्या संविधान निर्मितीच्या काळात भारताचे पहिले प्रधानमंत्री आणि संविधान सभेने या इतिहासाची नोंद घेतलेली आहे.
सम्राट अशोकाने जे अनेक शिलालेख लिहिले त्यापैकी एक कपुदगिरी येथे आहे. कपुदगिरी सिंधु नदीच्या काठच्या अटक शहरापासून वायव्य बाजूस सुमारे ३५ मैलावर आहे. या शिलालेखाची लिपी उर्दु लिपिच्या पध्दतीप्रमाणे उजवीकडून डावीकडे अशी उलटी लिहिलेली आहे. मुसा अल्लाह तथा मोशे याला दोन दगडी पाटया सापडल्या . मुसा अल्लाह (मोशे) म्हणतो देवाने दोन दगडी पाटयांवर लिहून माझ्या हाती या दहा आज्ञा दिल्या. मुसा अल्लाह (मोशे) यांनी सागितलेल्या दहा आज्ञा यात बुध्दांच्या विशुध्दी मार्गाचा तथा पंचशिलेचा उल्लेख आहे. ( पहा बायबल- अनुवाद ५:२२) या दगडी पाटया म्हणजेच सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत.
मुसा अल्लाह (मोशे) प्रमाणे मोहम्मद पैगंबराने सुध्दा दहा आज्ञा सांगितलेल्या आहेत आणि यात देखील बुध्दांच्या विशुध्दी मार्गातील शिलांचा उल्लेख आहे . सम्राट अकबर हा ईसलाम (मुस्लीम) होता. अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर सम्राट अकबराने इस्लाम धर्माचा त्याग केला आणि “दिने इलाही” या नवीन धर्माची स्थापना केली. इस्लाम धर्मातून सुफी पंथांची स्थापना झाली. सुफींना कुराणातील सर्वच आचार विचार मान्य नव्हते. तसे ते उघड बोलून दाखवत होते. त्यामुळे काहींना तेव्हा देहांताची शिक्षा ठोठावली गेली.
ख्रिश्चन धर्मगुरुंनी खिश्चन धर्माच्या प्रभावकाळात धर्माच्या विरूध्द जाणाऱ्यांना साध्या कैदेपासून ते देह दंडापर्यंत शिक्षा दिल्या आहेत. समाजाच्या प्रगती करीता एखाद्या शास्त्रज्ञाने काही शोध लावला आणि तो जर धर्मगुरूंना आवडला नाही तर त्याला शिक्षा होत असे. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांना आपले जीव गमवावे लागले. पृथ्वीसबंधात आपले संशोधन मांडणारा गॅलिलिओ सारखा शास्त्रज्ञ याचं उदाहरण आहे.
भगवान बुध्दांनी आपल्या धर्मातील सत्य असत्यता पडताळून पाहण्याचं, त्याबाबत प्रश्न विचारण्याचं, परीक्षण करण्याचं सर्वांना स्वातंत्र्य दिलं आहे. भगवान बुध्द म्हणतात “माझा आदरभाव आहे म्हणून एखाद्याने माझा धर्म स्विकारू नये. परीस सोन्याची अग्नित जाळून जशी परिक्षा करतात तशी माझ्या धर्माची परीक्षा करा”. धर्माची चिकित्सा करण्याची अनुमती कोणत्याही धर्म संस्थापकाने दिलेली नाही. ती फक्त भगवान बुध्दांनी दिलेली आहे. हीच भगवान बुध्द आणि त्यांच्या धम्माची विशेषता आहे. महानता आहे.
भगवान बुध्दांच्या हयातीत त्यांच्या सोबत अनेकांनी धर्मचर्चा केली आहे. भगवान बुध्दांना लोकांनी धम्माबाबत प्रश्न विचारला बुद्धांनी त्यांना उत्तरही दिली. त्यांच शंका निरसन केल्याचे दाखले आहेत. बुध्दांच्या महपरिनिर्वाना नंतर सुध्दा अनेकदा धम्मचर्चा घडून आल्या. ग्रीक राजा मिलींद आणि भदंत नागसेन यांच्यात झालेली धम्मचर्चा मिलींदप्रश्न या पुस्तकाच्या रूपात जगात प्रसिध्द आहे. जगातील अनेक भाषांमध्ये मिलींद प्रश्न हे पुस्तक उपलब्ध आहे. राजा मिलींदाने या धम्मचर्चेनंतर बौध्द धर्माचा स्विकार केला. मानवाच्या कल्याणाकरीता अशा या एकमेव विचारप्रवण, विज्ञान निष्ठ, बौध्द धम्माचा प्रचार प्रसार निरंतर होत रहावा, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळातील वर्षावास ही बौध्द परंपरेतील धम्मप्रचाराची एक उपाययोजना. आधुनिक युगाच्या गरजेनुसार धम्म जागरासाठी या उपाययोजनेचा सदुपयोग व्हावा हीच मनिषा! वर्षावास धम्म जागर महोत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

– लेखक : सुरेंद्र खरात

0Shares

Related post

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक : जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध करणार मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश…
“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *