- 434
- 1 minute read
रयत शिक्षण संस्था वैचारिक दिवाळखोरीत निघाली आहे काय ?
रयत शिक्षण संस्था वैचारिक दिवाळखोरीत निघाली आहे काय ?
सातारा जिल्ह्यातील पाचवड या गावात रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे. गतवर्षी या विद्यालयाच्या प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांनी ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात बोलत असताना दिलेल्या संदर्भावरून वादंग माजले. त्यासाठी त्यांना जीवघेणा संघर्ष करावा लागला. तब्बल एक वर्ष आहेर मॅडम आणि त्यांच्या कुटूंबाने मस्तावलेल्या धर्मांध झुंडीशी एकाकी संघर्ष केला. ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कॉम्रेड गोविद पानसरे यांच्या ” “शिवाजी कोण होता ?” या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. यावर तिथल्या बजरंग दल, शिवप्रतिष्ठान, अभाविपने त्यांच्यावर प्रचड दडपण आणले, त्यांचे मॉबलिंचींग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना दम दिला, धमक्या दिल्या. मोठ्या प्रमाणात मानसिक छळ केला. स्थानिक पोलिसांनीही त्यांच्या अकलेला जातीयवादाचे गळू झाल्याचे दाखवून दिले. ते ही या प्रकरणात मुर्खासारखे वागले. ज्या वर्दीने रक्षण करावयाचे असते, कायद्याची भाषा बोलायची असते तेच वर्दीवाले या प्रकरणात कायद्याला आणि वर्दीला कलंक ठरतील असे वागले. भुईंज पोलिस ठाण्याचे कुणी गर्जे नावाचे दिडशहाणे सहाय्यक पोलिस निरिक्षक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासारखे वागले. त्यांनीही आहेर यांच्यावर दबाव टाकत माफी मागा नाहीतर एफ आय आर दाखल करू अशा धमक्या दिल्या. मृणालिनी आहेर यांचे सेवा निवृत्त प्राध्यापक असलेल्या पतींना गर्जे वर्दीच्या माजात सर्वांसमोर अपमानास्पद बोलला. मृणालिनी आहेर नावाच्या वाघिणीने या कुठल्याच भामट्यांना भिक घातली नाही. वर्दीतला गर्जे नावाचा भामटाही त्यांनी कोलून लावला. दुस-या दिवशी महाविद्यालयात शंंभर दिडशे लोकांचा जमाव आला. आहेर यांना दमदाटी करू लागला. “जय श्री राम” म्हणण्याची जबरदस्ती करू लागला. त्यांनी माफी मागावी यासाठी दडपण टाकू लागला. विशेष म्हणजे त्या कॉलेजच्या प्राचार्या बोबडे मॅडम यांच्या विवेकाचीही बोबडी वळली होती. त्या ही आहेर यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव आणत होत्या. पण मृणालिनी आहेर त्यांच्या विचाराशी ठाम राहिल्या. त्यांनी या धर्मांध झुंडीला लायकीत ठेवले. आहेर यांची गाडी फोडून बॉलने फुटल्याचा बनाव केला. आहेर मॅडमनी माफी न मागितल्याचा राग मनात धरून सहाय्यक पोलिस निरिक्षक असलेल्या गर्जेने आहेर यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र रयत शिक्षण संस्थेला दिले होते. त्या पत्राची दखल घेत संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ते संस्थेकडे पाठवत त्यांच्यावर कारवाई करण्यास अनुमोदन दिले. संस्थेने बी टी जाधव नावाच्या दुस-या दिड शहाण्याला समितीवर नेमले. चौकशी एका महिलेची करावयाची होती. संस्थेने यासाठी एक सदस्यीय समिती नेमली पण त्यात कुणी महिला नव्हती. या समितीचा अध्यक्ष असलेल्या पठ्याने उपस्थित नसलेल्या लोकांची साक्ष घेत अहवाल सादर केला. अखेर संस्थेने आहेर यांच्यावर बदलीची कारवाई केली. एकूणच या प्रकरणात आहेर मॅडम यांना खुप संघर्ष करावा लागला. बंजरंग दल, शिवप्रतिष्ठान आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाच्या जातीयवादी टोळक्यांशी भिडावं लागल. जीवावर उदार होत त्यांच्याशी झगडाव लागलं. अशा स्थितीत रयत शिक्षण संस्थेने त्यांना पाठबळ देणे गरजेचे होेते पण संस्थेने ते दिले नाही. रयतने उलटी भूमिका घेत इमानदारीने काम करणा-या आणि आपल्या विचारावर अभंग निष्ठा ठेवणा-या मृणालिनी आहेर यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली केली. पहिल्यांदा ती विट्याला केली, नंतर ती रद्द करत लोणंद येथे केली. एकूणच या प्रकरणात मस्तावलेली टोळकी जे वागली ते अभिप्रेतच आहे. ही धर्मांध टोळकी अशीच वागणार आहेत. राज्यातील व केंद्रातील सत्तेने या धर्मांध झुंडींना माज आला आहे. ते या पेक्षा वेगळं वागूच शकत नाहीत. त्याचप्रमाणे सहाय्यक पोलिस निरिक्षक असेलला गर्जे नावाचा पोलिसी भामटाही तसाच वागणार. त्याला अक्कल असती तर त्याने कायदा फाट्यावर मारत आहेर यांच्यावर कारवाई करण्याची किंवा “तुमचं काय वाईट झालं तर आम्ही जबाबदार नाही !” अशी भाषा वापरली नसती. हे दोन घटक जे वागले ते अभिप्रेत आहे पण रयत शिक्षण संस्थेने जे केले ते धक्कादायक आहे. या सगळ्या प्रकाराविरूध्द मृणालिनी आहेर नावाची रणरागिणी वर्षभर एकाकी लढली. उच्च न्यायालयात जाऊन त्यांनी या सगळ्या बदमाशीला सडेतोड उत्तर दिले. सन्माननीय न्यायालयाने पोलिस खात्याचे कान उपटत आणि गर्जेच्या बुडावर कायद्याची लाथ घालत मृणालिनी आहेर यांना न्याय दिला.
मृणालिनी आहेर लढाऊ होत्या म्हणून त्या लढल्या. त्या उच्च न्यायालयात गेल्या. या ठिकाणी हलक्या काळजाचं कुणी असतं तर ?
पण या सगळ्या घडामोडी घडत असताना कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था जी भूमिका घेते ती ती पाहून रयत शिक्षण संस्था वैचारिक दिवाळखोरीत निघाली आहे की काय ? असा प्रश्न पडतो. खरेतर ‘रयत’ बद्दल असे लिहीतानाही वेदना होतात. अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेकडे पाहताना छाती अभिमानाने भरून येते. आजही शेकडो रयत सेवक अण्णांचा विचार ह्रदयाशी कवटाळून जगतात. त्यांचा सत्यशोधकी विचार जीवापड जपतात. अण्णांच्या संस्थेतल्या प्राध्यपकाने गोविंद पानसरे सरांच्या “शिवाजी कोण होता ?” या पुस्तकाचा संदर्भ द्यायचा नाही तर मग बालाजी तांबेच्या पुस्तकाचा द्यायचा काय ? रयतचे कर्मचारी मृणालिनी आहेर यांच्या मागे का ठामपणे उभे राहिले नाहीत ? रयतने त्यांच्यावर अन्यायी कारवाई का केली ? रयतमधला कुणी म्हस्के नावाचा म्हसोबाही त्यांच्यावर माफी मागावी यासाठी कोपला होता म्हणे. मृणालिनी आहेर बंजरग दल, शिवप्रतिष्ठान व अभाविपसारख्या कट्टरवादी धर्मांध लोकांशी झुंजत असताना त्यांना पाठबळ द्यायचे सोडून रयतवाले त्यांच्यावरच कारवाई करत होते. कर्मवीर अण्णांना खरच या कर्मचा-यांची आणि पदाधिका-यांची शरम वाटली असेल. त्यांनी ज्या विचारातून रयतचा वटवृक्ष उभा केला तिथे हे घडावं ? रयतमध्ये जातीयवाद्यांची बचबच निर्माण व्हावी ? बजरंग दलाच्या विचारासोबत उभे रहात रयतवाल्यांनी त्यांच्यासमोर नांगी टाकावी ? आपल्याच सेवकावर कारवाई करावी ? हे भयंकर आहे. या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी आहेर मॅडम यांच्यावर या दबाव टाकला त्यांनी त्यांनी अण्णांच्या पुतळ्यासमोर जाऊन माफी मागायला हवी. अण्णांच्या विचारांशी बांधिलकी असेल तर स्वत:च स्वत:च्या थोबाडात मारून घ्यायला हवी. वर्दीतला गर्जे नावाचा पोलिस जसा मुर्ख वागला तसेच रयतच्या कर्मचा-यांनी, पदाधिका-यांनी वागावे हे बुध्दीला पटत नाही. खरेतर आहेर यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहण हे रयत संस्थेच आणि कर्मचा-यांच नैतिक कर्तव्य होतं. कर्मवीर अण्णांच्या या लेकीने अण्णांचा विचार जपत मस्तावलेल्या जातीयवाद्यांचे थोबाड फोडले. त्यांना शरण न जाता अण्णांच्या विचारांचा कणा ताठ ठेवला. ही फार मोठी गोष्ट आहे. खरेतर तमाम रयत शिक्षण संस्थेसाठी हा अभिमानाचा विषय होता. असे असतानाही रयतवाले जातीयवाद्यांच्या सुरात सुर कसे मिसळतात ? सन्माननीय न्यायालयाने या प्रकरणात मृणालिनी आहेर यांना न्याय देताना पोलिसांना जोरदार फटकारले आहे. गर्जेच्या माकडचाळ्यांना कानफटात मारली आहे. पण रयत शिक्षण संस्था आपल्याच झुंजार लेकीसोबत जे वागली आहे ते त्रासदायक आहे.
कर्मवीर अण्णा सत्यशोधक विचाराचे होते. बहूजनांची पोरं शिकावीत, ती जातीयाद्यांच्या म्हणजे भटशाहीच्या अजगरी विळख्यातून बाहेर यावीत यासाठी त्यांनी अखंड आयुष्य खर्च केले. त्याच अण्णांची रयत आज वैचारिक दिवाळखोरीत निघते आहे. तिथेही बजरग दलवाले, शिवप्रतिष्ठानवाले, अभाविपचे टोळके शिरजोर होत असेल तर परस्थिती चिंताजनक आहे. हा कर्मवीर अण्णांचाच अवमान आहे. कोर्टाने पोलिसांच्या मुस्काडीत मारल्या असतील पण या निमित्ताने रयतच्या प्रतिमेला, रयत शिक्षण संस्थेच्या विचारालाही गालबोट लागले आहे. जिथं फुलं वेचली तिथं गोव-या वेचायची वेळ का आली आहे ? याचं चिंतन रयतने करायला हवं. संस्थेत माजलेले, अण्णांच्या विचारांशी बांधिल नसलेले हे सर्व उपटसुंभ विचारांच्या चाकोरीत आणण्याची गरज आहे. या उपटसुंभांना बजरंगदल वाल्यांच्या नव्हे तर अण्णांच्या विचारांचा जो वटवृक्ष बहरला आहे त्याच्या छायेत आणणे गरजेचे आहे.
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी,