- 72
- 1 minute read
कुटुंब तुटल्याचा नाही तर राजकारण संपतेय म्हणून अजित पवारांना पश्र्चाताप…!
सुडाच्या राजकारणा आड घराणेशाहीच्या दिशेने शरद पवारांची घोडदौड…!
सत्तेची गणितं जुळविण्यात अथवा बिघडविण्यात शरद पवार यांचा किती ही हातखंडा राहिला असला तरी त्यांनी केलेल्या राजकारणामुळेच त्यांना अपेक्षित यश मिळाले तर नाहीच , या उलट महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी जे जे काही केले, त्याची किंमत ही त्यांना चक्रवाढ व्याजाने मोजावी लागत आहे. अन् त्यास कारणीभूत ठरले आहेत, त्याचेच पुतणे अजित पवार. आपल्या पक्षातील अनेक वरिष्ठ अन् अजित पवारापेक्षा लायक असलेल्या नेत्यांना डावलून पवारांनी अजित पवारांना झुकते माफ दिले. पण दगा ही त्यांनीच दिला. आता केवळ या दगाबजीचा बदला घेण्याचे राजकरण ते यापुढे करतील. अजित पवारांनी पक्ष तर फोडला पण लोकसभा निवडणुकीत या फुटलेल्या पक्षाचा दारूण पराभव झाल्याने पक्ष फुटीनंतर हतबल झालेले पवारसाहेब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झाले आहेत. त्यांची ही आक्रमकता भाजपचे काही नुकसान करेल की नाही, हे आज स्पष्ट सांगता येत नसले तरी अजित पवारांचे राजकरण नक्कीच संपवेल व त्यांचा राज ठाकरे होईल, हे मात्र खरे आहे. तर अजित पवारांना हे स्पष्ट दिसू लागले असल्यामुळेच बहिणीच्या विरोधात सुनेत्रा पवारांना तिकीट देणे चुकीचे होते, अन् त्याचा पश्र्चाताप होत असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. काकाच्या अथवा बहिणीच्या प्रेमापोटी त्यांना हा पश्र्चाताप होत नसून बारामतीमधील परंपरागत मतदारांची सहानुभूती मिळविण्याची यामागेची चाल आहे.
अजित पवारांना सत्तेची लालच असेल की ईडी व सीबीआयची भीती असेल, जेलमध्ये जाण्याची व सडण्याची त्यांची तयारी नसेल. त्यामुळे मोदीचे निमंत्रण त्यांनी स्विकारले व ते भाजपसोबत सत्तेत गेले. इथपर्यंत शरद पवार व अजित पवार यांच्यात कसलास संघर्ष नव्हता. अजित पवार व अन्य आमदारांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तयारी ही पवारांची नव्हती. तर पवार कुटुंबात ही कलह नव्हता. पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी भाजपच्या दबावाला बळी पडून अजित पवारांनी जाहीर केली व आपल्या स्वतःच्या राजकारणावर गंडतर ओढवून घेतले. सुप्रिया सुळेचा पराभव करून शरद पवारांचे राजकारण संपविण्याचा मोदी व भाजपच्या डाव होता, अन् अजित पवार त्या डावातील मोहरा ठरले. त्यात मोदी, भाजपला यश आले नसले तरी यास कारणीभूत ठरलेल्या अजित पवारांवर त्यांचा राग असणे स्वाभाविकच आहे. त्यामूळेच बारामतीत त्यांचा पराभव करण्याची तयारी सुरू केली आहे. अन् अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांची बारामतीतून उमेदवारी ही जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार या लढतीमुळे जितका त्रास झाला, त्याच्या कैक पट्टीने बदला घेण्याचा डाव पवारांचा आहे. अजित पवार व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार या लढतीत अजित, सुनेत्रा व पार्थ पवार विरुद्ध पुरा पवार परिवार अशी ही लढत असेल व अजित पवारांची आई ही यावेळी आपल्या नातवासोबत असेल. हे स्पष्ट चित्र आताच अजित पवारांना दिसू लागल्याने त्यांनी सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
सत्तेशिवाय जगू न शकणारे व सत्तेचा गैर वापर करून प्रचंड भ्रष्ट्राचार केलेले आपल्यासारखेच नेते सोबत घेऊन अजित पवारांनी बंड करून राष्ट्रवादी फोडली व जेलवारी वाचविली. पण त्यांची ही कृति राज्यातील जनतेला आवडली नाही व त्याची पावती ही या जनतेने लोकसभा निवडणुकीत लगेच दिली. अजित पवारांना सोबत घेण्याची किंमत ही भाजपला मोजावी लागली. त्यामुळे भाजपात आता त्यांना तशी किंमत राहिलेली नाही. फक्त अजित पवार गटाला दूर करून आम्ही चुकीचे काहीं केले नाही, हे दाखविण्यासाठी अजित पवारांना सोबत ठेवण्यासाठी भाजप मजबूर आहे. अन् हे अजित पवार गटाच्या ही लक्षात आले आहे. अशा सर्व राजकीय अडचणीत असतानाच पवारसाहेबांनी बारामतीमधून युगेंद्र पवारची उमेदवारी जाहीर करून अजित पवारांच्या राजकीय अस्थित्वलाच ग्रहण लावले आहे. त्यामुळे त्यांचे बॅफूटवर येणे स्वाभाविक आहे.
तर अजित पवारांच्या गद्दारीच्या आडून पवारसाहेब आपल्या कुटुंबातील आणखी एका सदस्याला राजकारणात आणण्याची तयारी करीत आहेत. ही घराणेशाही असली तरी त्यावर चर्चा न होता ती अजित पवारांच्या गद्दारीवर होईल, अन् ती होऊ ही लागली आहे. त्यामुळे पवारसाहेब ही संधी सोडणार नाहीत. अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार अन् आता युगेंद्र पवार यांना सत्तेचा राजकारणात प्रस्तापित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिल. पार्थ पवारला ही राजकारणात सेटल करण्याचा प्रयत्न त्यांनी 2019 मध्ये केला होताच. पण जमले नाही. पण मोठया पवारांशी पंगा आता अजित पवारांना महाग पडेल. यात शंकाच नाही.
संघ, भाजपच्या लोकशाही व संविधान विरोधी अजेंड्यामुळे देशात संविधान बचाव हा मुद्दा जनतेनेच समोर आणला व मोदी विरोधकांचा तोच तारणहार ठरला. या मुद्यामुळे राजकारणातून संपलेल्या अनेक नेत्यांना संजीवनी मिळाली. त्यात शरद पवार ही एक आहेत. गेल्या दोन – तीन लोकसभा निवडणुकीत ५ चा आकडा पार न करणाऱ्या राष्ट्रवादीला फुटीनंतर ही ९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एक नवी ऊर्जा घेऊन पवारसाहेब विधानसभा निवडणुकीत आपल्या राजकीय विरोधकांचे हिशोब पुर्ण करतील. यात अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचे ही हिशोब होणार असल्याने अजित पवार गोटात कमालीची निराशा पसरली असून त्या गर्तेतून त्यांच्या तोंडातून काही निराशेचे स्वर बाहेर पडत आहेत. पडताना दिसत आहेत. अजित पवारांना होणारा पश्र्चाताप याच गर्तेतून बाहेर पडणारा एक स्वर आहे…!
_____________________
– राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश