• 76
  • 2 minutes read

बिहार विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा डाव टाकून मोदींना कोंडीत पकडण्याचा नितीशकुमारांचा डाव…!

बिहार विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा डाव टाकून मोदींना कोंडीत पकडण्याचा नितीशकुमारांचा डाव…!

         लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर नरेंद्र मोदी व अमित शहाने निवडणुकांचा धसका घेतला असतानाच एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या जनता दलाचे ( युनायटेड) राष्ट्रीय अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी बिहार विधानसभा भंग करून निवडणुकांना सामोरे जाण्याच्या हालचाली सुरु केल्याने मोदी व शहा यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. विद्यमान विधानसभेच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात ३ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम नितीशकुमारांनी केला असल्याने ते केव्हा ही , काहीही करु शकतात, याची कल्पना मोदीला असल्याने हा धसका अधिकच वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली काल मर्यादा संपत आल्याने जम्मू काश्मिरमध्ये निवडणुका होत आहेत. ही काल मर्यादा नसती तर येथे ही निवडणुका घेण्याची तयारी भाजपने म्हणजे मोदीने दाखवली नसती. हरयाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका गेल्या ३ टर्मपासून होत आहेत. पण २०१९ प्रमाणे यावेळी ही सत्ता जाऊ शकते. ही भिती वाटत असल्याने येथे ही निवडणुका घेण्याची हिम्मत मोदींची झालेली नाही. महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर न झाल्याने येत्या काळात राज्यात मोठा पेच उभा राहू शकतो. मोदी अन् शहाची कुठल्या ही निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, हे चाणक्ष नितीशकुमार ओळखून असल्याने बिहार विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा फास टाकून या दोघा रंगा बिल्लाची कोंडी करण्याचा प्रयत्न नितीशकुमारांचा आहे. यामुळे मोदी, शहा यांना नियंत्रणात ठेवण्याचा या कोंडी मागचा उद्देश आहे.

       देशाच्या संसदीय राजकारणात मोदीला पर्यायच नाही, असे एक चित्र गोदी मिडिया अन् मोदींच्या अंधभक्तांनी तयार केले होते. अन् त्याचा प्रभाव ही देशातील मतदारांवर होता. मोदी शिवाय काहीच दिसत नव्हते. पण इंडिया आघाडी उभी राहिली अन् मोदींचा फुसका बार फुटला. राज्या राज्यात मोदीला तगडे आव्हान देणारे नेते उभे राहिले. अमित शहा अन् मोदींच्या तोंडचे पाणी पळविले. झोप उडविली. देशातील जनतेसमोर पर्याय उभा राहताच जनता ही मैदानात उतरली व तिने लोकसभेत भाजपची जी काही दैना केलीय ते आपण आज पाहत आहोत. देशभरातील मतदारांनी भाजपला नाकारले आहे. हाच ट्रेंड या पुढच्या सर्व निवडणूकीत राहणार आहे, यासंदर्भात भाजपने स्वतःच केलेल्या सर्व्हेंमधून हेच पुढे येत आहे. त्यामुळे मोदी, शहा कुठल्याच निवडणुकीचा तयारीत नाहीत. निवडणुका जितक्या टाळता येतील, तितक्या टाळण्याचा प्रयत्न ही जोडी यापुढील काळात करेल. पण त्या विरोधात ही विरोधकांनी जागृत राहायला हवे अन् ते आहेत.

        भाजपचे संघटन नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अवलंबून राहिले आहे. निवडणुकीचा मैदानात भाजप कमी व संघ अधिक असतो, हे सत्य आहे. पण सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी व अमित शहाने ज्या पद्धतीने स्वतःचा महिमामंडम करुन घेतला आहे, त्यामुळे संघाचे जमिनीवरील प्रचारक कमालीचे नाराज आहेत. त्याशिवाय या दोघांचे चरित्र अन् फेकाफेकी ही संघाला निवडणुकीच्या मैदानात अडचणीची ठरू लागली असल्याने संघ मागे हटताना दिसत आहे. तर मोदी व शहाने पक्षातील इतर नेत्यांचा कधीच मानसन्मान ठेवला नाही. कधीच त्यांना विचारात घेतले नाही. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते मोदी, शहाच्या अडचणीत सापडल्याने आनंदात आहेत. संसदेत या दोघांची विरोधक ज्या वेळी पिसे काढतात, त्यावेळी कुठलाही वरिष्ठ नेता मध्ये पडताना अथवा बचाव करताना दिसत नाही.
       मोदीला अल्पमतातील सरकार चालविण्याचा अनुभव नाही. तसेच विरोधकांना अपमानित करूनच त्यांनी प्रचंड अहंकाराने सरकार चालविली आहेत. २०१४ ते २०१९ व २०१९ ते २०२४ या दहा वर्षांच्या सत्ताकाळात तर त्यांनी विरोधकांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे. आजपर्यंतच्या साऱ्या संसदीय परंपरा व चौकटी तोडल्या आहेत. मात्र २०२४ नंतर ते अल्पमतातील सरकार चालवीत आहेत अन् विरोधक अतिशय आक्रमक आहेत. त्यामुळे मोदींची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. शिवाय ज्या नितिशकुमारच्या पाठिंब्यावर मोदीचे सरकार चालले आहे, ते नितिशकुमार सरकारपुढे संकटे वेळोवेळी संकट उभी करणार, हे निश्चित आहे. आता नितिशकुमारने तेच केले आहे. मोदी अन् शहाला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी बिहार विधानसभा बरखास्त करून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी भाजप अथवा मोदी तयार नाहीत, याची पुर्ण जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच मुदतपूर्व निवडणुकीचा डाव त्यांनी टाकला आहे. मोदी, शहा अन् भाजपला खिंडीत पकडून नियंत्रणात ठेवण्याचा उद्देश यामागे नितीशकुमार यांच्या आहे.
       मोदी सत्तेवर राहवेत, असे आज एनडीएतील घटक पक्षांना ही वाटत नाही. नितीशकुमार तर मोदीचे खऱ्या अर्थाने विरोधक राहिले आहेत. मोदी अन् नितीशकुमार यांच्यातील संघर्षाला दोन पेक्षा अधिक दशकांचा इतिहास आहे. दंगलखोर, आदमखोर अशा शेलक्या शब्दात मोदीचे वर्णन नितीशकुमारांनी केले आहे, तर मोदी नितीशकुमार यांच्या डीएनएपर्यंत गेले आहेत. आज या दोघांची ही गरज असल्याने ते एकत्र आहेत. मात्र कुरघोडीचे राजकरण करीतच ते ऐकमेकांसोबत राहणार, हे ही तितकेच खरे आहे. नितीशकुमार भल्ले ही ९ वेळा मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. मात्र जमिनीवर त्यांची ताकद राष्ट्रीय जनता दलापुढे नाही. भाजपसोबत आल्यानंतरच नितिशकुमारची ताकद वाढलेली आहे. तर नितीशकुमार यांच्याचमुळे बिहारमध्ये सत्ता मिळू शकते, एकट्या भाजपला ते शक्य नाही, याची जाणीव भाजपला आहे. तर या अशा ऐकमेकांच्या गरजेतून नितीशकुमार मोदी एकत्र आहेत.

      एनडीएतील घटक पक्ष जसे मोदीला पसंत करीत नाहीत, तसेच संघ ही आता मोदीला पसंत करीत नाही. पण मोदीला हटविणे संघाला अवघड जात आहे. मात्र भाजपचे मिञ पक्ष जितके मोदी व शहाच्या विरोधात उभे राहतील तितके संघाच्या फायद्याचे आहेत. आज एनडीए असो अथवा संघ, भाजप असो यांच्यातील अंतर्गत संघर्ष सुरु आहे. अन् या संघर्षात प्रत्येकजण एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचं संघर्षातून नितीशकुमार मुदतपूर्व निवडणुकीचा डाव खेळत असून ते जनता दल युनायटेडच्या फायद्याचे राजकरण करीत आहेत.

——————————-
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *