- 137
- 3 minutes read
छ.शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी जयदीप आपटे, संघ, भाजप व नौदलाचे कनेक्शन तपासण्याची गरज…!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्या प्रकरणातील केवळ शिंदे – फडणवीस सरकारचाच नाही तर संघ, भाजपचा ही कुटील डाव व सहभाग आता उघड झाला आहे. भाजपची सरकारे ज्या राज्यांत आहेत, त्या राज्यांत संघाच्याच संघोट्यांना मोठ – मोठी कंत्राटे दिली जात असल्याचे या प्रकरणातून आपटचे नाव पुढे येत असल्याने स्पष्ट झाले आहे. यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे लायकी नसणाऱ्या संघोट्यांना सरकारच्या तिजोऱ्या खाली करुन दिल्या जात आहेत. या प्रकरणात मोदींच्या माफी बद्दल तर बोलले पाहिजेच. त्यात आस्था कमी व नाटक जास्त आहे. पण या पेक्षा महत्त्वाचे आहे, ते म्हणजे संघ सत्तेच्या गैरवापर करून देशातील सर्व सामान्य जनतेच्या पैशावर कसा डाका टाकीत आहे. ते पाहणे. यावर अधिक फोकस करुन ही प्रकरणे पुढे आणली पाहिजेत. बाकी या प्रकरणी केवळ माफी मागून चालणार नाही. केलेल्या नीच कामाचा परिणाम ही तितकाच नीच येणार यात शंकाच नाही. त्यामुळे माफी मागण्या बरोबरच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर काय कारवाई होणार ? हे राज्यातील जनतेला सांगितले पाहिजे. अन् जो वर हे माफीवीर सावरकरांचे भक्त, चेलेचपाटे गुन्हेगारांवर कारवाई करीत नाहीत, तोवर त्यांच्या माफीला कवडीची ही किंमत नाही, हे राज्यांतील जनतेने समजून घेतले पाहिजे.
राज्यातील शिवप्रेमी जनतेने मोदींच्या माफीची चर्चा न करता या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे अन् पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील यांच्यावर अधिक फोकस करून या दोघांनाच टार्गेट करून सरकारला याचा जाब विचारला पाहिजे. सरकारची घेराबंदी केली पाहिजे. तसेच या प्रकरणात नौदलाचा ही मोठा हात राहिलेला आहे. हा पुतळा उभारण्याचे कंत्राट जयदीप आपटे यास दिले नौदलाने दिले आहे. आपटेला पुतळा उभारण्याचा कसलाही अनुभव नसताना हे कंत्राट त्यास कसे मिळाले ? कुणी त्याची शिफारस केली ? संघाचा नौदलातील कामात ढवळाढवल आहे का ? आपटे, नौदल अन् संघ यांचे संबंध या प्रकरणातून बाहेर येऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणी जनतेत चर्चा घडवून जागृती करणे आवश्यक झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात आला होता, तो २८ फुटाचा होता अन् जयदीप आपटे याने आतापर्यंत दोन फुटांपर्यंतचेच पुतळे उभारले आहेत. त्यामुळे अनुभवहिन आपटेला कंत्राट कसे मिळाले ? हा खरा या प्रकरणातील मुख्य प्रश्न आहे.
सदरचा ब्रांझचा पुतळा उभारण्यासाठी किमान ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित होता, मग हा पुतळा फक्त ७ महिन्यातच का उभारला गेला ? अन् नौदलाच्या देखरेखीखाली या पुतळ्याचे काम सुरु होते ? मग यात जे काही अनुचित घडले आहे , त्याची जबाबदारी नौदल झटकू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात केवळ जयदीप आपटे व स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून चालणार नाहीत, तर नौदलातील संबधित अधिकाऱ्यांवर ही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण त्यांनीच अनुभव नसलेल्या जयदीप आपटे यास हा पुतळा उभारण्याचे कंत्राट दिले आहे. या प्रकणातील सर्व गुन्हेगारांची कसून तपासणी केल्यानंतरच या प्रकरणातील खरे आरोपी अन् सुत्रधार समोर येतील. अन् ते येणे अत्यंत गरजेचे आहे.
पुतळा उभारण्याचे काम करणाऱ्या अनेक शिल्पकारांचे म्हणणे आहे की, इतका भव्य दिव्य अन् ब्राँझचा पुतळा उभाण्यासाठी किमान ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो. मग हा पुतळा ७ महिन्यात उभा करण्याचे कारण काय होते ? हा प्रश्न सहज पडू शकतो. तर याचे कारण स्पष्ट आहे की, हा पुतळा उभा करून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत याचा लाभ उठविण्यासाठी काल मर्यादा धाब्यावर बसवून हा पुतळा उभारण्यात आला. त्यासाठी मोदी सरकारचा नौदलावर दबाव असणार व त्याच दबावापोटी हा पुतळा ३ वर्षां ऐवजी ७ महिन्यातच उभारला गेला, हे स्पष्ट आहे. या प्रकरणाचा तपास राज्यातील पोलिसांच्या हाती राहिला, तर कुणाला ही काहीच शिक्षा होणार नाही. हा प्रश्न जोवर चर्चेत आहे, तोवर जनतेत याची चर्चा ही होईल. पण जेव्हा दूसरे एखादे प्रकरण उभे राहिले, तर लोक हे पुतळा प्रकरण व छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान व अपमान सर्वच विसरून नव्या विषयांवर चर्चा करतील. अन् नवे विषय देण्यात मोदी खूपच पटाईत आहेत.
लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाई करुन हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभरण्यात उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रात निवडणुकीला जाताना मतदारांना सांगण्यासाठी काहीतरी असावे म्हणून हा पुतळा उभा करण्यात आला. अन् पुतळा बसविण्याचे काम हे नौदलाच्या अखत्यारित असल्याने या प्रकरणास पंतप्रधान म्हणून मोदीच जबाबदार आहेत. अन् महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी पुतळा घाईघाईत उभा केल्याने कालमर्यादेचे उल्लंघन झालेले आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी असे कांड करणे पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही. त्यामुळे या प्रकरणात मोदींचा निषेध करावा तितका थोडाच आहे. असे असताना याच छत्रपतींच्या भूमीत येऊन माफी मागण्याची लाज मोदीला वाटायला हवी होती. पण लाज लज्जा नावाची गोष्ट त्यांच्याकडे राहिलेलीच नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांची नेहमीच असते. २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना ही त्यांनी पुलवामामध्ये ४० जवानांना शहीद केले होतेच.
बाकी माफी मागत असताना मोदीने आणखी एक घोडचूक केली आहे. ती म्हणजे सावरकर यांचा उल्लेख करून. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म व राजा होणे यास काकतालीय योग म्हणणाऱ्या सावरकरांचा उल्लेख करीत माफी मागणे, ही नीचपणाची हद्द आहे. सावरकरांनी पूर्णपणे शिवशाहीच्या विरोधात लिखाण केले आहे. छत्रपतींच्या अवगुणांवर बोलण्याचे धाडस आजपर्यंत जगात कुणाचेच झाले नाही. मात्र सावरकर यावर जाहीर भाष्य करतात. छत्रपती राजे संभाजी यांच्याबद्दल ही ते वाईट लिहितात. त्या सावरकरांचा उल्लेख शिवप्रेमीची माफी मागत असताना करून मोदीने महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याचा सूड, बदला राज्यातील जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच घेईल. हे मात्र खरे……!
_________________
– राहुल गायकवाड
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)