- 139
- 3 minutes read
मंदिर अन आश्रम ही वैदिक धर्म व्यवस्था स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक शोषणाचे अड्डे…!
भारत वर्षाचा इतिहास हा बुद्ध काळापासून सुरु होतोय अन वैदिकांचे सर्व ग्रंथ काल्पनिक आहेत. मग ते वेद असो, पुराण अथवा रामायण, महाभारत असो. काल्पनिक आहेत. पण त्यावर इथल्या बहुसंख्य लोकांची श्रद्धा असल्याने त्यांना मानायलाच हवे, असे माफीवीर सावरकर स्पष्टपणे म्हणतात. अन या खोट्या व काल्पनिक इतिहासाचे दाखले देत हिंदुत्व व हिंदु राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहतात. तेच स्वप्न ते इथल्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्या आडून हिंदूंना देतात. अन लाखो लोक सावरकरांच्या हिंदु राष्ट्रावर स्वतः गुलाम होत असताना ही विश्वास ठेवतात. सावरकर व संघाला हवे असणारे हिंदूराष्ट्र म्हणजे बहुजन वर्गाची गुलामगिरी अन् दास्याचा कोंडवाडा व तुरुंगच. पण तो ही धर्मवेड्या बहुजन वर्गाला प्रिय वाटत आहे. तर या हिंदु धर्म व्यवस्थेचा भक्कम पाया व आधार इथल्या स्त्रिया असून त्यांच्यावरच या व्यवस्थेत अधिक अन्याय, अत्याचार होत आहे. त्यांना शूद्र म्हणून मंदिरात प्रवेश नाकारला जातो. पण याच मंदिरात त्यांच्यावर अत्याचार , बलात्कार केले जातात. मंदिर अन् आश्रम स्त्री शोषणाचे अड्डे अगदी या धर्माचा उगम झाल्यापासून बनलेले आहेत.
हिंदु धर्मानुसार स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. स्त्री केवळ भोगाची वस्तू आहे. ती कुठल्याही जातीची असली तरी ती दासी अन गुलाम आहे. तिच्यावर तिच्या प्रत्येक अवस्थेत कुणाची तरी मालकी असते. आपल्या चारित्र्याची तिला परीक्षा द्यावी लागते. रामायणात सीतामाता देवी असून ही तिला अग्नी परीक्षा द्यावी लागली आहे. तर महाभारतातील द्रोपतीचे भर दरबारात वस्त्रहरण करण्यात आले. या दोघींना बेइज्जत करण्यात आले. ही बेइज्जती समस्त महिला वर्गाची आहे. स्त्री देवी असली तरी भोगायची वस्तू आहे.
मनुस्मृती, पुराण, वेद, रामायण, महाभारत स्त्री दास्याची प्रतिक आहेत , तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान या समस्त स्त्री वर्गाची या गुलामीतून व दास्यातून मुक्तता करुन तिला सन्मान देते. शिक्षणाचा अधिकार देते. राजपाटात सक्रिय भागीदारीचा अधिकार देते. संपत्तीत हक्क व अधिकार देते. सती प्रथेतून सुटका करते. तरी ही इथल्या बहुसंख्य स्त्रियांना हिंदुत्व म्हणजे गुलामीच हवी आहे. भोगाची वस्तू बनण्यातच ती स्वतःला धन्य मानत आहे. जगाचा पाठीवर आपल्या देशातील स्त्रिया इतका मूर्ख व नादान स्त्री वर्ग क्वचित जगात कुठे असेल.
ज्या मंदिरात स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार होतो, त्याच मंदिरात तिला शुद्र म्हणून प्रवेश नाकारला जातो. मंदिरात स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार करणाऱ्यांना वाचविण्यासाठी मोर्चे, आंदोलन ही केले जाते, ईश्वर, भगवान, परमेश्र्वर जे कुणी असतील त्यांच्या नावाने उभ्या असलेल्या आश्रमात याच महिलांवर सेवेच्या नावाखाली अत्याचार होतात, बलात्कार होतात, ते करणाऱ्यांना हिंदु धर्मात पूजनीय समजले जाते, त्याच आश्रमावर व त्यातील नराधम, नरभक्षक भोंदू बाबांवर स्त्रियांची आस्था आहे. या भोंदूना त्या आदर्श मानतात. ईश्वरी सेवेच्या नावाखाली लहानलहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या रामरहिम व आसाराम यांच्यावरील बलात्काराचे गुन्हे मागे घ्या म्हणून त्या रस्त्यावर उतरतात, तेव्हा या स्त्री वर्गाची कीव करावी वाटते.
मंदिर पवित्र आहेत, त्यात बसवलेल्या निर्जीव देवांवर ब्राह्मण्य, पुरोहित, पुजारी सोडून सर्वाची श्रद्धा आहे. मंदिर अन् देव सर्व बोगस असून त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी सुरु केलेला धंदा आहे. हे पक्के त्यांनाच माहित आहे. त्यामुळे ते देवाला घाबरत नाहीत. मंदिराच्या पावित्र्याचे त्यांना काही एक घेणेदेणे नाही. त्यामुळेच ते दगडाच्या मूर्तीसमोर महिला व मुलींवर अत्याचार करतात. खरच देव असता तर ते हे नीच कृत्य करण्यास घाबरले असते. पण बहुजन वर्ग हे समजत नाही. त्यामुळे तो धर्म व्यवस्था व ठेकेदारांची शिकार होतोय. मंदिर अन् आश्रमात राम रहिम व आसारामसारखे हजारो भोंदू रोजच आया – बहिणींची इज्जत लुत्त आहेत. घरातील कटकटीला कंटाळून थोडेशी शांती मिळावी म्हणून विघ्नहर्ता गणेशाच्या मंदिरात गेलेल्या एका महिलेवर तीन पुजाऱ्यांनी पाशवी बलात्कार करुन तिची हत्या केली. अन् विघ्नहर्ता बघत राहिला. दगडाचाच देव तो दूसरे काय करणार ? चूक तर त्या महिलेचीच होती ना.
धर्माच्या नावाने सुरु असलेला हा धंदा इतका जबरदस्त आहे की, या धंद्यातील लाभार्थीना स्वतःचे भांडवल गुंतवावे लागत नाही. ज्यांची लूट होणार आहे, तेच पै पे जमा करुन ही लूटीचे केंद्र गल्लो गल्ली, गाव खेड्यात उभे करतात. त्यात ब्राह्मणाला बसवतात. व शिकार होऊन स्वतःच जातात. या लुटारूंनी काहीच करावे लागत नाही. रामरहिम व आसारामसारखे भोंदू बाबा आज जेलमध्ये बलात्काराची शिक्षा भोगत असेल तरी हजारो- लाखो जण बाहेर ही आहेत. हरयाणातील अमरपूरी या बाबाला पोलिसांनी पकडले असून त्याने १२० महिलांवर अत्याचार, बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. भाविक म्हणून आलेल्या महिलांची इज्जत लुटल्यावर त्यांचे अश्लील व्हिडिओ बनून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा ही हा अमरपूरी करीत होता. आता तो जेलमध्ये आहे. आपल्या बालकनाथ आश्रमात त्याने या महिलांवर बलात्कार करुन त्यांचे अश्लील व्हिडिओ बनविले असून या सर्व कामात त्यांना त्याची सरोज नावाची मुलगी मदत करते. आता हा भोंदू बाबा जेलमध्ये गेला असून त्याची वारसदार हीच सरोज आहे. इतके नीच कृत्य या आश्रम व मंदिरात चालत असताना आपल्या देशातील स्त्रियांना हेचं हिंदुत्व हवे आहे. हे अतिशय भयानक आहे.
_________________
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)