- 83
- 1 minute read
तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील !
कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त लेख…
“रयत” हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. मूळ अरबी भाषेतील असणाऱ्या शब्दाने मराठी भाषिकांना आकर्षित केले आहे. रयत म्हटले की एक आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनात निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजीराजांनी जे राज्य निर्माण केले, त्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभाव नाही.
छत्रपती शिवाजीराजांनी कृषी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समतेचा पाया घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू ठेवली.
कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी आहेत. कर्मवीरांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी होते. रयतेच्या शिक्षणाची माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर आण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी होते. शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते. ते अत्यंत मानवतावादी होते.
कर्मवीरांनी शिक्षण संस्था उभारून पैसा कमावला नाही, परंतु स्वतःच्या कमाईचा सर्व पैसा रयतेच्या शिक्षणासाठी खर्च केला, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईनी मंगळसूत्रासह सर्व दागिने गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मोडले. म्हणूनच आण्णाना शिक्षणमहर्षी म्हटले जाते. त्यांचे संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रातिसिंह नाना पाटील यांचेशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
आण्णा हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या आजोळी गावी झाला. त्यांचे गाव वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक होय. वडील सरकारी सेवेत असल्यामुळे बदलीच्या गावी विटा, दहिवडी, इस्लामपूर इत्यादी ठिकाणी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यांच्या वडिलांना बाणेदारपणामुळे नोकरी सोडावी लागली. आण्णांचे पुढील शिक्षण कोल्हापुरातील जैन बोर्डिंगमध्ये झाले. बोर्डिंगचे नियम मोडल्यामुळे त्यांना अधीक्षकांनी काढून टाकले, तेंव्हा शाहू महाराजानी त्यांना राजवाड्यावर ठेवून घेतले व राजपुत्रांबरोबर शिकविले.
आण्णा बालवयापासूनच बंडखोर होते, अस्पृश्याना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिले नाही, म्हणून त्यांनी रहाटच मोडून टाकला. ज्ञानदेव घोलप या मुलाला घेऊन त्यांनी परिवर्तनाचा लढा सुरू केला. ज्ञानदेव घोलप या मुलाला जेंव्हा ते घरी जेवायला घेऊन गेले, तेंव्हा आई आण्णांवर रागावली, तरी आण्णा दुसऱ्या दिवशीदेखील त्याला आणखीन घरी जेवायला घेवून गेलेच. परिवर्तन करण्यासाठी आण्णा नेहमी हट्टी असायचे. सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव होता.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी स्थापन केलेल्या जैन बोर्डिंगमध्ये आण्णा शिक्षणासाठी गेले. तेथे शिक्षण घेत असताना आण्णांनी जैन बोर्डिंगचे कर्मठ नियम मोडले. तेव्हा तेथील अधीक्षकांनी आण्णांना वस्तीगृहातून काढून टाकले. पण आण्णा निराश होणारे नव्हते, तर सतत धडपडत राहणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. खानविलकर नावाचे आण्णांचे मित्र आण्णांना घेऊन शाहू महाराजांकडे राजवाड्यावरती गेले. त्यांनी शाहू महाराजांना सर्व वृत्तान्त सांगितला. तेव्हा शाहू महाराज अण्णांना म्हणाले “तुम्ही आता राजवाड्यावरती राहूनच शिक्षण घ्या”. राजवाड्यावर राहून शाहू पुत्र राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी यांच्या सोबत आण्णा शिकले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली कर्मवीर अण्णांचे शिक्षण झाले.
आण्णा सहावीत नापास झाले, पण डगमगले नाहीत, निराश झाले नाहीत. ते हिम्मतवान होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांचे शिक्षक भार्गव कुलकर्णी यांना म्हणाले “भाऊ पाटलाला मार्क कमी आहेत; परंतु तो अत्यंत गुणवान आहे. त्याला वरच्या वर्गात पाठवा” त्यावेळेस कुलकर्णी मास्तर म्हणाले “महाराज, भाऊ पाटील ज्या बेंचवर बसतो ती बेंच वरच्या वर्गात पाठवेन परंतु भाऊ पाटलाला वरच्या वर्गात पाठवणार नाही”. ज्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना सहावा वर्ग उत्तीर्ण होता आला नाही, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी कोट्यवधी मुलांना शिक्षण दिले. आज त्यांचे विद्यार्थी जगातील विविध क्षेत्रांमध्ये आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना गरीबाप्रति खूप तळमळ होती. गरिबांना शिकविण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण बहुजन मुलांना उपाशी राहू दिले नाही किंवा त्यांचे शिक्षण बंद पडू दिले नाही. गावोगावी जाऊन त्यांनी मुलं आणून त्यांना मोफत शिक्षण दिले. आण्णा महाराष्ट्राची मायमाऊली आहेत.
आण्णा प्रचंड महत्त्वाकांक्षी होते. ‘नाही’ हा शब्द आण्णांच्या जीवनकोशात नव्हता. संकटावर मात करण्याचं सामर्थ्य आण्णामध्ये होते. एकदा आण्णा सातारा येथील डेप्युटी कलेक्टर यांना भेटायला गेले होते. डेप्युटी कलेक्टर आण्णांना म्हणाले “माझ्या मुलीला संस्कृत शिकवनार का?” आण्णा म्हणाले “हो,शिकवणार” नंतर आण्णांच्या लक्षात आले की आपल्याला संस्कृत येत नाही. आपण तर संस्कृत शिकविण्याचा शब्द दिलेला आहे. आण्णांनी स्वतः संस्कृत क्लास लावला. ते एका शिक्षकाकडे सकाळी लवकर संस्कृत शिकायला जायचे आणि त्यानंतर डेप्युटी कलेक्टरच्या मुलीला संस्कृत शिकवायचे. आणा प्रचंड प्रयत्नवादी होते. त्यांनी कधीही नकारघंटा वाजवली नाही.
आण्णांनी विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. ते शेकापशी एकनिष्ठ होते. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी रयत शिक्षण संस्थेची ग्रँड बंद केली म्हणून त्यांनी पक्षांतर केले नाही किंवा ते साधे भेटायलाही गेले नाहीत. त्याच्याविरुद्ध लढत राहिले, इतके ते स्वाभिमानी होते. आण्णा जितके कनवाळू होते तितकेच ते बाणेदार होते. गाडगेबाबा बाळासाहेब खेर यांना भेटले आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे अनुदान सुरू झाले.
आण्णा आर्थिक अडचणीत असताना एक व्यापारी आण्णांना म्हणाला “मी तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव बदला आणि माझे नाव कॉलेजला द्या” तेंव्हा आण्णा म्हणाले “एक वेळेस जन्मदात्या बापाचे नाव बदलेण, पण एकदा कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव मी कधीही बदलणार नाही. इमान विकून पैसे घेतले तर हा भाऊ पाटील मेला” असे अण्णा म्हणाले. पैश्यामुळे त्यांनी कधीही निष्ठा बदलली नाही. आण्णा हे महान शिवप्रेमी होते, पण त्यांनी शिवाजीराजांचे नाव घेऊन तरुणांच्या डोक्यात द्वेष आणि हातात दगड-धोंडे किंवा तलवारी दिल्या नाहीत, तर त्यांच्या हातात पाटी-पुस्तक आणि लेखणी दिली. त्यांनी लाखो विद्यार्थी घडविले. आज जगभर विविध क्षेत्रात रयतचे विद्यार्थी आहेत. कर्मवीर आण्णांनी शिवरायांचे नाव घेऊन शाळा काढल्या. जाती-जातीत धर्मा-धर्मात त्यांनी प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण केली. तरुणांना डॉक्टर, वकील, इंजिनिअर, न्यायाधीश, उद्योजक बनविले.
आण्णा हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते.1906 सालचे सयाजीराव गायकवाड यांचे अस्पृश्योधाराबाबतचे भाषण वाचून अण्णांच्या मनात उपेक्षित वर्गाबाबत प्रचंड तळमळ निर्माण झाली. शाहूंराजांच्या छत्रछायेखाली त्यांचे शिक्षण झाले.
कर्मवीर भाऊराव आण्णांनी सत्यशोधकी विचारांसाठी मरण पत्करले, परंतु सनातनी विचारधारेला ते कधीही शरण गेले नाहीत, बाळासाहेब खेर या सनातनी मुख्यमंत्र्यांनी कर्मवीर आण्णांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली, तरी आण्णा त्या सनातनी विचारधारेला शरण गेले नाहीत. शेवटपर्यंत पुरोगामीवृत्ती आणि तत्त्वनिष्ठा त्यांनी सोडली नाही. ते नीतिमान, निस्वार्थी, निष्कलंक, निर्भय, निर्व्यसनी, निपक्षपाती होते. त्यांनी डोंगरदऱ्यात, दुष्काळी भागात शाळा काढल्या. अनेक जमीनदारांनी, सरदारांनी, शेतकऱयांनी त्यांना मोठ्या मनाने देणग्या दिल्या. सातारच्या छत्रपतीनी संस्थेसाठी जमीन दिली. घेणारे हात स्वच्छ असतील तर देणारे लाखो हात पुढे येतात. आण्णा स्वछ मनाचे आणि वृत्तीचे होते.
कमवा आणि शिका, स्वावलंबी शिक्षण हे आण्णांचे धोरण होते. मन, मनगट आणि मेंदू सक्षम करणारे शिक्षण असावे, हा त्यांचा आग्रह होता. विद्यार्थ्यांबरोबर आण्णा काम करायचे. विद्यार्थ्यांबरोबर पंक्तीला जेवायचे. विद्यार्थी आजारी पडला तर आण्णा स्वतः रात्रभर जागून विद्यार्थ्याची सेवा करायचे. आण्णा म्हणजे विद्यार्थ्याची जणू आईच होती. कर्मवीर अण्णांच्या या अद्वितीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने आणि पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले. अशा या शैक्षणिक क्षेत्रातील संतांचा 9 मे 1959 रोजी मृत्यू झाला.
आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या राज्य-परराज्यात आज सुमारे 650 शाखा आहेत. आशिया खंडातील अत्यंत दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेचा लौकिक आहे. अत्यंत तळमळीने काम करणारे शिक्षक या संस्थेत आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील या शैक्षणिक क्षेत्रातील संततुल्य शिक्षणमहर्षीना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
– डॉ.श्रीमंत कोकाटे