मुंबई. दि.( प्रतिनिधी ) संसदीय राजकारण व जनसंघर्षाच्या माध्यमातून सामाजिक न्याय आंदोलनाला गती देण्याचे ऐतिहासिक काम ज्या नेत्यांनी केले, त्यामध्ये धरतीपुत्र नेताजी मुलायमसिंह यादव यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्याशिवाय सत्तेचा बहुजनवादी चेहरा बनविण्यात ही मुलायमसिंह यादव यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे, असे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी नेताजी मुलायमसिंह यादव यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेत कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांना संबोधन करताना सांगितले.
नेताजी मुलायमसिंह यादव यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त बेलार्ड इस्टेट येथील प्रदेश कार्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, देशाची एकता, अखंडता व संविधान वाचविण्यासाठी त्यांनी आपल्या सत्तेची व पदाची कधीच पर्वा केली नाही. याची एक नव्हे अनेक उदाहरणे आहेत. बहुजन समाजाला सत्तेच्या परिघात आणण्यासाठी नेताजीने अनेक प्रयोग केले अन महत्वाचे म्हणजे ते सर्व प्रयोग यशस्वी झाले. समाजवादी विचारांच्या पक्षाचे अनेक गटात विभाजन झाल्यानंतर त्यांनी 4 ऑक्टोबर 1992 साली समाजवादी पार्टीची स्थापना केली व उत्तर प्रदेशसारख्या राज्यात आपले सरकार ही स्थापन केले. देशाच्या संसदेत राजकारणाला ही बहुजन चेहरा देण्याचा त्यांचा प्रयत्न या माध्यमातून राहिलेला आहे, असे ही अबू आसिम आझमी यांनी यावेळी सांगितले. अखिलेशजी यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी आज देशातील संसदीय राजकारणातील तिसरी सर्वात मोठी शक्ती बनली असून संघ, भाजपाचे संविधान बदलाचे व लोकशाही विरोधी कट कारस्थान हाणून पाडण्याचे काम नेताजींच्या विचाराच्या बळावरच समाजवादी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे, हिच नेताजी मुलायमसिंह यादव यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ही अबू आसिम आझमी यावेळी म्हणाले. यावेळी आयोजित अभिवादन सभेस समाजवादी पार्टीचे मुंबई प्रदेश प्रमुख महासचिव मेराज सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव राहुल गायकवाड, महासचिव अनिस अहमद, प्रदेश सचिव रहीमभाई मोटरवाला, प्रदेश सचिव शकील खान, अधिवक्ता सभेचे राष्ट्रीय सचिव ऍड. संदीप यदुवंशी, शिवसेना नेते शकील कुरेशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉ. शैलेंद्र कांबळे, कामगार नेते कॉ. अशोक पवार, 3 वेज मिडियाचे संपादक चंद्रकांतजी सोनवणे, विचारवंत मिलिंद पखाले, समाजवादी पक्षाचे नेते हारून रशीद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.