महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांतर्फे १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे भव्य राज्यव्यापी परिषद
राज्यातील प्रागतिक पक्षांची येत्या 16 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये राज्यव्यापी परिषद….!
मुंबई, दि. ( प्रतिनिधी ) येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महा विकास आघाडीने पर्यायी जनताभिमुख धोरणे जाहीर करावीत व समाजवादी पार्टी , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष , भारतीय कम्युनिस्ट पक्ष , शेकाप व सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष या प्रागतिक पक्षांसोबत जागा वाटपाबाबत सन्मानजनक तडजोड करावी, या आग्रही मागणीसाठी येत्या बुधवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी नाशिकमध्ये भव्य राज्यव्यापी परिषद घेण्यात येणार आहे, असा निर्णय आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभादेवी येथील भूपेश गुप्ता भवनात डॉ. अशोक ढवळे व डॉ. भालचंद्र कानगो यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रागतिक पक्षांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
महाविकास आघाडीने पर्यायी जनताभिमुख धोरणे स्विकारून प्रागतिक पक्षांना सन्मानजनक जागा सोडल्यास राज्यात एक भक्कम पर्याय उभा राहिल व आघाडी अधिक मजबूत होईल. यावर प्रागतिक पक्षांच्या उपस्थित सर्वच प्रतिनिधीचे एकमत झाले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आसिम आझमी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ.भालचंद्र कानगो व शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय ही या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
13 ऑक्टोबर रोजी झालेल्या या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. अशोक ढवळे, डॉ.एस. के.रेगे, शैलेंद्र कांबळे,किसन गुजर, समाजवादी पार्टीचे मेराज सिद्दीकी, राहुल गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. भालचंद्र कानगो,सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती, राजू देसले, शेकापचे जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे व सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले उपस्थित होते.