- 73
- 1 minute read
काय आहे दिवाळी सणाचा इतिहास? – डॉ. श्रीमंत कोकाटे
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 80
काय आहे दिवाळी सणाचा इतिहास?
भारतातील बहुतांश सण हे आर्य-अनार्य म्हणजेच सूर-असुर यांच्या संघर्षाच्या स्मृती आहेत. उदा तुळशी विवाह, बलिप्रतिपदा, दसरा इत्यादी. त्याचप्रमाणे नरक चतुर्दशी हा दिवसदेखील अभिमान बाळगावा असा आहे. नरक चतुर्दशी हा सण अनार्य, असुर म्हणजे भारतीयांच्या अस्मितेचा सण आहे. शेतीची कला अवगत असणाऱ्या समुहाला ऋग्वेदात *अब्राह्मण* असे म्हटले आहे, याचा दुसरा अर्थ असा होतो की ज्यांना शेतीची कला अवगत नव्हती त्यांना ब्राह्मणी समुदाय म्हटले जाते, त्यामुळे ब्राह्मणी-अब्राह्मणी हे शब्द जातीवाचक किंवा द्वेषमूलक नाहीत, तर हे दोन शब्द भारतातील सांस्कृतिक संघर्ष दर्शवतात, त्यामुळेच जगविख्यात प्राच्यविद्यापंडित शरद पाटील हे वेदांच्या आधारे त्यांच्या तत्वज्ञानाची मांडणी “ब्राह्मणी-अब्राह्मणी” अशीच करतात.
आर्य, सूर म्हणजे विदेशी लोक होत. या थेअरीला जसे ऐतिहासिक, प्राच्यविद्येत संदर्भ आहेत, तसेच पुरातत्त्वीय (Archaeological) संदर्भदेखील आहेत. आर.एस.शर्मा, मॉर्टीमर व्हीलर, गॉर्डन चाईल्ड हे अनेक इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ यांनी याबाबत विस्ताराने मांडलेले आहे. याबाबत जेन. एन. पांडे यांचा *पुरातत्वविमर्श* हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
स्वर्ग-नरक या संकल्पना वास्तव नाहीत. त्या काल्पनिक आहेत, असे चार्वाक तत्त्वज्ञान सांगते. वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज यांनी स्वर्ग-नरक या कल्पना नाकारलेल्या आहेत. गरिबांना स्वर्गाचे आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग-नरकाच्या कल्पना आल्या, हे स्पष्ट होते. स्वर्ग-नरक रिटर्न अशी कोणीही व्यक्ती अजून जगात कोणालाही भेटलेली नाही. जसा स्वर्ग अस्तित्वात नाही, तसेच नरकदेखील अस्तित्वात नाही.
नरक जर वास्तवात नसेल तर ही संकल्पना आली कोठून, त्याची युत्पती काय आहे ? याचा शोध प्रथमतः प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी लावला. आर्यांच्या आक्रमणाचा प्रतिकार करणारे अनेक असुर गण भारतात होते, त्यापैकीच *नर* गणाचे असुर लोक होते. ते खूप कष्टाळू, प्रामाणिक आणि शूर होते. ते कृषक होते. त्यांना शेतीची कला अवगत होती. नरक गणाच्या मातेचे नाव भूदेवी होते. म्हणजे हा कृषक गण होता. त्यांनी उत्तम शेती केली, धरणे बांधली, किल्ले बांधले, उत्तम प्रशासनव्यवस्था निर्माण केली.
गाळपेऱ्याच्या शेतीनंतर असुर हे सामुदायिक शेतीत उतरले, कारण वाढती लोकसंख्या, शेतीचे अवगत झालेले प्रगत तंत्रज्ञान होय. असुर लोक हे अत्यंत लोककल्याणकारी होते. आर्यांच्या आक्रमणामुळे ते दक्षिणेकडे सरकलेले आहेत. असुर राजा बळी हा पाताळात म्हणजेच दक्षिणेकडे आलेला आहे. पाताळ म्हणजे केरळ, तमिळनाडू हा भाग होय. त्याच्या स्मृती आपण भारतीयांनी ओणम, बलिप्रतिपदा या सणाच्याद्वारे जतन करून ठेवलेल्या आहेत. दक्षिणेत सरकलेल्या *नर* नावाच्या असुरांनी सिंचनव्यवस्था निर्माण करून *कटाची* शेती केली. कटाची शेती म्हणजे गणाची सामुहिक शेती होय. सामूहिक शेती करणाऱ्या नर गणाच्या असुर लोकांचा समुदाय म्हणजेच *नरक* होय. (नर+कटाची). त्यातील अधिक प्रगत लोकांचा गण म्हणजे *वानर* गण होय.
वानर हे जंगलात सरकती शेती करणारे, एका शेती मौसमात एका ठिकाणी, तर दुसऱ्या मौसमात दुसऱ्या ठिकाणी शेती करत असत. त्यामुळे जंगलाची नासधूस होत नसे. जंगल साफ करून म्हणजेच जंगल जाळून व्यापक शेती करणारा गण म्हणजे *वैश्वानर* गण होय. वैश्वानर आर्यांच्या अंकित झाल्यामूळे समुळ जंगले जाळून नव्या वसाहती निर्माण करण्यास ते आर्यांना मदत करु लागले. याबाबतची विस्तारित मांडणी प्राच्यविद्येचे अभ्यासक राजकुमार घोगरे यांनी केलेली आहे.
नरक गणातील राजे खूप महान होते. नरक गणातील असुर लोकांचा अभिमान वाटावा, इतके ते प्रगत आणि मानवतावादी होते. ते लुटारू, क्रूर, विध्वंसक नव्हते, तर शेतीत काबाडकष्ट करून जगणारे व इतरांना जगविणारे कर्तृत्ववान लोक होते. ते ऐतखाऊ नव्हते, तर श्रम करून जीवन जगणारे, नवनिर्मिती करणारे लोक होते. उदाहरणार्थ बळीराजा, जालंधर, हिरण्याक्ष इत्यादी. भारतीयांनी अशा लोकांचा अभिमान बाळगला पाहिजे, इतके ते महान होते, म्हणूनच त्यांची आठवण आपण *नरक चतुर्दशीच्या* रूपाने जिवंत ठेवलेली आहे. आपण त्यांच्या नावाने दिवाळी साजरी करतो. दिवाळीतील प्रत्येक दिवस हा कर्तृत्ववान असुर लोकांच्या कार्यकर्तृत्वाचा जयजयकार करणारा दिवस आहे.
आम्ही लहानपणी दिवाळीच्या वेळेस सकाळी लवकर नाही उठलो, की वडील म्हणायचे “लवकर उठून आंघोळ करा, उशिरा उठलात तर नरकात जाल.” नरकात जायच्या भीतीने आम्ही सूर्योदयापूर्वीच आंघोळ करायचो. कारण नरकात वाईट लोक जातात, तेथे त्यांचा खूप छळ केला जातो, तेथे रवरव नरक असतो, अशा पुराणकथा ऐकल्या होत्या.
नरक जर खरच वाईट असता तर नरक चतुर्दशीला आपण दिवाळी साजरी केली असती का?. पण आता आम्ही म्हणतो आंघोळीला उशीर झाला तरी चालेल, कारण नरक गणातील लोक आपले पूर्वज आहेत, नरक हा पृथ्वीवरच आहे. आपण कृषिसंस्कृतीतील लोक त्यांचे वारसदार आहोत. आपल्या लोकांत म्हणजे नरकात राहायला नक्की आवडेल.
गाय हा सर्वार्थाने उपयुक्त पशू आहे. दुसरे नागरीकरण (second urbanation) गंगेच्या खोऱ्यात झाले. त्यादरम्यान जगात लोखंडाचा (इसपू १० वे शतक) शोध लागला. त्यामुळे मानवी जीवन अधिक वेगवान झाले. गंगेच्या खोऱ्यात जंगल साफ झाले. शेती करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे होते. त्यावेळेस गोधन मदतीला आले. आर्य तर यज्ञात गायींचा बळी देत होते. ते गोमांसभाक्षक होते याबाबत The myth of The Holy Cow या अभिजात ग्रंथात Dr. D. N. Zha यांनी विस्ताराने लिहिले आहे. महावीर-बुद्ध हे कृषी संस्कृतीतून आले असल्यामुळे ते यज्ञाविरूद्ध गोरक्षक म्हणून उभे राहिले, ते अध्यात्मिक कारणाने नव्हे, तर भौतिक कारणाने उभे राहिले. त्यामुळे गोभक्षक आर्यांना नाईलाजाने शाकाहारी व गोरक्षक व्हावे लागले. महावीर आणि बुध्दाने रक्षण केलेली गाय आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. तो आपण दिवाळीत *वसुबारस* या रुपाने जतन करतो.
लक्ष्मीपूजन हा तर स्त्री संस्कृतीचा सन्मान आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. भटक्या मानवाला खात्रीचे अन्न, राहण्यासाठी घर स्त्रियांनी दिले. स्त्रियांनी खात्रीचे स्थिर जीवन दिले अर्थात अन्न, गावं आणि घर दिले, हे पुरुषांनी कधीही विसरू नये. अतिरिक्त धान्य (surplus) आले. त्यामुळे मानवी जीवन स्थिर झाले. बरकत आली. मानवी जीवनात भरभराट आली, ती भरभराट स्त्रीपावलाने म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी आली. हा स्त्री सन्मानाचा उत्सव आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा उत्सव आहे. स्त्री ही हिम्मतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान आहे. ती पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे. तिच्याकडे प्रसवक्षमता आहे. म्हणूनच निसर्गाने अपत्यप्राप्तीची जबाबदारी स्त्रीकडे दिलेली आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे *लक्ष्मीपूजन* होय. लक्ष्मीपूजन हे शेतीचा शोध लावणाऱ्या निऋतीचे पूजन आहे.
आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी याच्याप्रती कृतज्ञता म्हणून *धनत्रयोदशी* आली, असेही मानले जाते. सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त यांचा विजयोत्सव म्हणून दीप म्हणजे दिवा लावण्याची परंपरा आहे, असे म्हटले जाते. पाताळयंत्री, कपटी आणि क्रूर वामनाने लोककल्याणकारी बळीला छळले, जसे औरंगजेबाने शिवरायांना छळले. शिवाजीराजे मागे हटले नाहीत. बळीराजा मागे हटला नाही. बळी हा जनतेला आनंद देणारा राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. कोणत्याही प्रकारची उणीव नव्हती. म्हणून म्हटले जाते “इडा पिडा टळो l बळीचे राज्य येवो ll”. आजही प्रजा बळीच्या आगमनाची, त्याच्या लोककल्याणकारी राज्याची वाट पाहत आहे. त्या लोकप्रिय बळीराजाचे स्मरण म्हणून आपण *बलिप्रतिपदा* हा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस साजरा करतो.
बहीण भावाने एकमेकांच्या मदतीला सतत धावून आले पाहिजे. बहीण भाऊ हे सहोदर आहेत. त्यामुळे त्यांचे नाते अतूट आहे. ते सतत वृद्धिंगत राहावे, हाच संदेश दिवाळीत *भाऊबीज* हा सण देतो. अशा अनेक कल्याणकारी अर्थाने ओतप्रोत भरलेला आनंददायी सण म्हणजे दिवाळी आहे. ही आनंदाची दिवाळी आहे. अंधकार दूर करून जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही दीपावली आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात
*”की अविवेकाची काजळी l*
*फेडूनिया विवेकदीप उजळी ll*
*योगिया पाहे दिवाळी *l
*निरंतर” ll*
विवेकाचा-ज्ञानाचा दिवा लावून अविवेकाची-अज्ञानाची काजळी नष्ट करणे, हीच खरी दिवाळी आहे, असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.
अशा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा!
-डॉ.श्रीमंत कोकाटे
0Shares