• 58
  • 1 minute read

स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा गौप्यस्फोट

सर्वाधिक आसन क्षमतेचे सभागृह देशाच्या आर्थिक राजधानीत का नको ?

तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ६ हजार आसन क्षमतेचे ‘हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेनशन सेंटर’ हे पिलरलेस सभागृह निर्माण केले आहे. ते ६ हजार ४८० चौरस मीटर क्षेत्रफळाचे असून त्यात ३७रूम्ससुद्धा आहेत. त्या धर्तीवर मुंबईत सर्वाधिक आसन क्षमतेचे सभागृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात उभारण्याची हाताशी असलेली संधी का साधली जात नाही ?

मुंबई (३ मार्च २०२५) : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘सदोष पुतळा’ आणि साडेवारा एकराच्या विस्तीर्ण भूखंडावरील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा घोर निराशा करणारा ‘आराखडा’ हे सारे पाप ‘एमएमआरडीए’मधील नोकरशहांचे आहे, असा स्पष्ट आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने आज केला.

त्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत शिल्पकार आणि आर्किटेक्ट यांची निवड ही मनमर्जीन आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रिया पद्धती बाजूला सारून करण्यात आली, असा गौप्यस्फोट त्या समितीने एका पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक पत्रकार परिषद घेवून डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत त्या समितीने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. त्या स्मारकासाठी निधी पुरवणाऱ्या सामाजिक न्याय खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, उदासीनता ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असेही दक्षता समितीने म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेला स्मारक दक्षता समितीच्या कोअर कमिटीच्या मान्यवर सदस्यांनी संबोधित केले. त्यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, माजी शिवसेना आमदार बाबुराव माने, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे, ओबीसी नेते राजाराम पाटील, काँग्रेस नेते गणेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे नेते उत्तमराव गायकवाड, समाजवादी पार्टीचे राज्य महासचिव राहुल गायकवाड, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे, बुद्धिस्ट कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष रवी गरुड, आंबेडकरवादी भारत मिशनचे सतीश डोंगरे, अॅड. जयमंगल धनराज यांचा समावेश होता.

नामर्वतांचा सहभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदोष पुतळ्याबाबत सर्व घरांतून तीव्र नापसंती आणि विरोधाच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्यापैकी प्रख्यात चित्रकार प्रा. प्रकाश भिसे, चित्रकार प्रा. मोग्गलान आवस्ती, वृत्त छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, शिल्पकार शिवाजी परुळेकर हे पत्रकार परिषदेत सहभागी होते. कला शिक्षक आणि शिल्पकलेचे जाणकार असलेले ज्येष्ठ रिपाइं नेते, माजी राज्यमंत्री दयानंद मस्के यांनी तर तो सदोष पुतळा म्हणजे डॉ. आंबेडकर यांची शुद्ध विटंबना आहे, असे सांगत दक्षता समितीच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

शिल्पकाराच्या निवडीत डोळेझाक

४५० फूट उंचीच्या उत्तुंग पुतळ्याच्या निर्मितीसाठी शिल्पकार राम सुतार (वय: १०० वर्षे) यांची निवड ही त्यांचे वय आणि क्रियाशिलता याकडे डोळेझाक करून करण्यात आली. केवळ त्यांची ख्याती, लौकिक पाहून त्यांच्या कंपनीला पुतळ्याचे काम देण्यात आले. परिणामीः प्रत्यक्षात पुतळ्याची निर्मिती त्यांचे पुत्र अनिल सुतार है करत आहेत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिल्पात साकार करण्यात त्यांच्या मर्यादा आणि अपयश सदोष पुतळ्याने उघडे पाडले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासाठी नव्या समर्थं शिल्पकाराचा शोध घेण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.

डझनभर आराखडे कोनाड्यात का फेकले ?

इंदू मिल येथील स्मारकाच्या उभारणीचे कंत्राट शापुरजी पालनजी या कंपनीला देण्यात आले असून सावागार मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएट है आहेत. त्या स्मारकासाठी आर्किटेक्ट निवडताना एमएमआरडीए‌ने प्रचलित पद्धतीनुसार सुरुवातीला जाहिराती देवून स्पर्धात्मक पसंतीसाठी देशी विदेशी आर्किटेक्टस् कडून आराखडे मागवले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून डझनभर आराखडे प्राप्तही झाले होते. त्यातून सर्वोत्तम आराखड्याला पसंती देवून आर्किटेक्टची निवड करणे क्रमप्राप्त होते. पण एमएमआरडीएमधील नोकरशहांनी ते सारे आराखडे गुंडाळून कोनाड्यात फेकून देत मनमर्जीन शशी प्रभू यांची निवड करून टाकली.

शशी प्रभू यांचा चैत्यस्तूपाचा आराखडा फेटाळला गेला आहे

यापूर्वी चैत्यभूमी येथील प्रवेशद्वारावरील शिल्पाकृतीची उभारणी ही शशी प्रभू यांच्या हातून झाली हे खरे. पण त्यांनी चैत्यभूमीच्या विकासासाठी चैत्यस्तुपाचा तयार केलेला आराखडा बुद्धकालीन स्थापत्य कलेशी फारकत घेणारा निघाल्यामुळे माहापलिकेने फेटाळून लावला होता. त्यामुळे चैत्यस्तुपाच्या विकासाची योजना मागे पडली आहे. तत्सम असमाधानकारक कामामुळे प्रभू यांनी महापालिकेच्या ‘काळ्या यादी’त जाण्याच्या कारवाईला निमंत्रण दिले होते.

शशी प्रभू यांची अशी नकारात्मक पार्क भूमी असतानाही डझनभर आर्किटेक्ट्स आणि त्यांनी सादर केलेले सारे आराखडे बाजूला सारून एमएमआरडीए मधील नोकरशहा हे शशी प्रभू यांच्यावर’ मेहेरबान’ का झाले, असा स्मारक दक्षता समितीचा सवाल आहे.

अपेक्षाभंग करणारा स्मारकाचा आराखडा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उभे राहणारे स्मारक है आंतरराष्ट्रीय आहे. त्यासाठी केंद्र सरकारने इंदू मिलची साडेबारा एकर जागा महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित केली आहे.
‘चैत्यभूमीनजीकच्या त्या विस्तीर्ण भूखंडाच्या संपूर्ण क्षेत्रफळाचा पुरेपूर वापर स्मारकातील अनेकविध संकल्प आणि सोयी सुविधांसाठी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आराखड्यात शक्य तितके आवश्यक ते बदल, नवीन गोष्टींचा अंतर्भाव आणि विस्तार करण्याची गरज आहे.

ही आर्किटेक्टची मनमानी की, सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव ?

आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध साडेबारा एकर क्षेत्रफळाचा पुरेपूर वापर करण्याबाबत त्याच्या आराखड्यात हात आखडता का घेण्यात येत आहे? ही कंजुषी आर्किटेक्टला मिळालेल्या अनिर्बंध स्वातंत्र्यातून, त्यांच्या मनमानीतून घडत आहे की, राज्य सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावातून ?

पंतप्रधानांच्या भेटीसाठी जाणार

गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा उत्तुंग पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो पुतळा जसा प्रतिष्ठेचा मानला, तितक्याच आत्मीयतेने त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा आणि समारकाकडे पाहावे, अशी आमची रास्त अपेक्षा आणि नम्र विनंती आहे. त्यासाठी दक्षता समितीचे एक शिष्टमंडळ लवकरच मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहे.

या पत्रकार परिषदेला स्मारक दक्षता समितीचे सदस्य अॅड. प्रफुल्ल सरवदे, मुस्लिम ब्रिगेडचे नेते आकिफ दफेदार, कॉ. सुबोध मोरे, शारदा नवले, मंगेश पगारे, पंकज चाळके, प्रसेनजित कांबळे, प्रकाश मेश्राम, विनोद ढोके, सो. ना. कांबळे, आया मुळीक, सचिन गायकवाड, गौतम कांबळे, सुधीर मकासरे, मिथुन कांबळे, बापूराव गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

0Shares

Related post

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल ! जगातील 7 आश्चर्या पैकी ताजमहल हे एक आश्चर्य असून ही वास्तू…
वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील…
ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याने सदस्यत्व रद्द !

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याने सदस्यत्व रद्द !

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याने सदस्यत्व रद्द ! धुळे, ता. २ : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *