- 220
- 3 minutes read
सम्राट अशोक, म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!
सम्राट अशोक, म. फुले व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!
जगातील एकमेव चक्रवती राजा चक्रवती सम्राट अशोक, मनुस्मृतीने ज्यांचे अस्थित्व नाकारले होते, त्या सर्व समाजासाठी शिक्षणाची दारे उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले, अन् स्वातंत्र्य भारताच्या संविधानाचे शिल्पकार, राष्ट्र निर्मिते, राष्ट्रीय पातळीवर ज्यांची सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी ओळख आहे ते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती एप्रिल महिन्यातच असल्याने हा महिना या देशातील सर्व बहुजन वर्गासाठी एका मोठ्या उत्सवाचा…, महोत्सवाचा महिना आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात या महामानवांनी फार मोठे परिवर्तन घडवून आणले. आपापल्या कालखंडांत एका युगाला जन्म दिला आहे. सामाजिक न्याय व समतेचा कालखंड म्हणून या युगाची नोंद इतिहासाच्या पानांवर झालेली आहे. त्यामुळे या महामानवांची ओळख युगपुरुष अशी ही आहे. या युगपुरुषांना कोटी कोटी अभिवादन….!
प्र… शील , करुणेचा तथागत बुद्धाचा विचार व धम्म सम्राट अशोकाने जगभर पसरविला, त्यामुळे अर्धे जग आज बुद्धाला शरण आले आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले अन् सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा कार्यांमुळे व त्यांनी केलेल्या सत्यशोधक धर्माच्या स्थापनेमुळे या देशात आमूलाग्र परिवर्तनाची लाट आली. या लाटेमुळे अमानवीय ब्राह्मणी व्यवस्था खिळखिळी झाली. त्यामुळेच अमानवीय ब्राह्मणी व्यवस्थेचे ठेकेदार आज ही फुलेंच्या विरोधात ओरड करताना दिसतात. आज फुलेंच्या कार्याला सलाम करणारा चित्रपट होत असताना त्यास विरोध होत आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, या ब्राह्मणी शक्तींना फुलेंना पचवायला किती जड जात आहे.
मंदिर म्हणजे ब्राह्मणांचे दुकान आहे,
अन्…..
शूद्र, अंत्यज व आदिवासी समाज म्हणजे,
या दुकानातील कायमस्वरूपी ग्राहक आहे,
असे म्हणत फुले बहुजन वर्गाला जागृत करतात . मग ते ऐतखाऊ ब्राह्मणी व्यवस्थेला पचनी पडतील तरी कसे ? मंदिर, त्यामधील ईश्वर, त्याची पूजा हा काही ब्राह्मणांचा धर्म नाही, तर व्यवसाय आहे, असे ही फुले म्हणतात, म्हणूनच त्यांच्या जीवन चरित्रावरील चित्रपटाला विरोध होत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीच्या माध्यमातून या देशात ब्राह्मणी विधान असलेल्या मनस्मृतीला मूठमाती दिली. या तीन ही महामानवांची जयंती या एप्रिल महिन्यात यावी, हा योगायोगच नव्हे का ? ५ एप्रिल रोजी चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती फार मोठ्या उत्साहात देशभर साजरी झाली, तर ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी झाली. आज १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर साजरी होत असून संपूर्ण जग ” नॉलेज ऑफ सिम्बॉल ” असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व प्रतिमेसमोर नतमस्तक होत आहे.
संपूर्ण जग आज आपल्या देशाला बुद्धाचा देश म्हणून ओळखत आहे,तर अर्धे जग बुद्धाला शरण ही आले आहे. अन् हे अर्धे जग आपल्याकडे मैत्रीच्या नात्याने पाहत आहे, व्यवहार करीत आहेत. विदेश नीतीच्या दृष्टीने ही आपल्या साठी उत्तम संधी आहे. पण या देशातील धर्मांध शक्ती या संधीचा फायदा उठवत नसल्याने देशाचे अनेक पातळ्यांवर नुकसान होत आहे. संपूर्ण जग बुद्धाला शरण येत असताना अन् फुले, आंबेडकर यांना सारे जग आपले नायक म्हणून स्वीकारत असताना धर्मांध व फॅसिस्ट प्रवृत्तीच्या शक्ती पुन्हा आपली अमानवीय व्यवस्था या देशावर लादू पाहत आहेत. या शक्तींनी अनेक संकट आपल्या देशासमोर उभी केली आहेत. त्या संकटांनी देशाच्या एकता व अखंडतेवरच प्रहार करायला सुरुवात केली आहे. धार्मिक व जातीय पातळीवरील वादांमुळे समाजात फूट पडण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. अशा ही वातावरणात संविधान ,लोकशाही व धर्मनिरपेक्ष व्यवस्था ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिल्या आहेत, त्यामुळे सर्व भारतीय समाज आज ही एकसंघ आहे. देशाची एकता अबाधित आहे. पण फॅसिस्ट शक्तींचा यावरच हल्ला आहे. त्यामुळे या संकटांनी देशभर एक भीतीचे वातावरण तयार केले आहे.
डीजे मुळे जयंतीतून प्रबोधनाचे कार्यक्रम गायब !
अशा वातावरणात चक्रवती सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती या महिन्यात धूमधडाक्यात साजऱ्या होत आहेत. पण या जयंती उत्सवाच्या माध्यमातून संविधान, लोकशाही व धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, सामाजिक समतेचे उत्सव खरे तर सुरू व्हायला हवे होते. पण तसे काही होताना दिसत नाही. जयंती उत्सव मंडळ वर्गणी गोळा करून या महापुरुषांच्या विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत आहेत. मात्र या जयंती उत्सवातून विचार गायब आहेत. युवा पिढी डोजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचत आहे. हे चित्र नक्कीच चांगले नाही. याचा ही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. पूर्वी असे चित्र नसायचे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नसायचा. सर्व समाज एकत्र यायचा, सभा व्हायच्या, त्या सभेत विचारवंतांची भाषणे व्हायची, आंबेडकरी विचारांचा वारसा नव्या अन् तरुण पिढीला देणारे जलसे व्हायचे, कव्वाली व्हायच्या. थोडक्यात आंबेडकर जयंती म्हणजे विचारांचे मंथन करणारा उत्सव असायचा. आंबेडकरी समाजाला जागवणारा संगर असायचा.
आता ते काही राहिले नाही. डी. जे. कल्चरमुळे हे सर्व गायब झाले आहे. आडव्या झोपडपट्ट्या जावून उभ्या झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. या उभ्या झोपडपट्ट्या उभारण्यात बिल्डरची एंट्री झालेली आहे. अन् या एंट्रीने आंबेडकरी चळवळ संपविण्यात फार मोठी भूमिका बजावली आहे. याच एंट्री आंबेडकरी चळवळीतून जलसे गायब होऊन डी. जे. कल्चर आले आहे.
धर्मांध व फॅसिस्ट शक्तींनी उभ्या केलेल्या संकटांमुळे या देशाचे संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्ष व्यवस्था जशी धोक्यात आली असून ही चिंतनीय बाब आहे. नेमके तशीच चिंता आंबेडकरी समाजाची आंबेडकरी चळवळीच्या संदर्भातील भूमिकेमुळे उभी राहिली आहे. या पुढील काळात देशासमोरची संकट ओळखून याबाबत गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. तो विचार व्हावा, नाहीतर काळ, इतिहास माफ करीत नाही. हे मात्र खरे.
………………
राहुल गायकवाड,
(महासचिव,समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश)