- 42
- 1 minute read
जातीधर्मादि खोट्या अस्मितांच्या नशाखोरांसाठी!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 66
ही गंभीर पोस्ट तरुणांना, तरुणांबाबत विचारप्रवृत्त करण्यासाठी आहे !
दंगली, खऱ्या- खोट्या अस्मिता, खरे-खोटे इश्यू अशा कारणावरून रक्त काढणं , नेत्यांच्या पोलीस केसेस अंगावर घेणं , आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं , दुसऱ्याला मारणं , स्वतः मरणं …. हे सर्व करण्याऱ्या लाखो लोकांसाठी , तरुणासाठी !
जेव्हा एकटे असाल तेव्हा या पोस्टचा विचार करा , ग्रुप मध्ये विचार करू नका ! फक्त एकट्याने विचार करा , अधून मधून झुंडीच्या बाहेर या , कारण झुंडीत विचारशक्ती mute होते म्हणून !
__________________
कोट्यवधी कष्टकरी – कामगार (ब्ल्यू कॉलर , व्हाईट कॉलर) सगळे कष्ट करतात. कशासाठी कष्ट करतात ? तर पैसे मिळवण्यासाठी !
ते पैसे कशासाठी मिळवतात ? तर अन्नपाणी खाण्यासाठी , घरात जाऊन आवश्यक ती विश्रांती घेण्यासाठी , आजारी न पडण्यासाठी , तब्येत चांगली ठेवण्यासाठी, कष्ट करतांना लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी !
तब्येत कशासाठी चांगली ठेवतात ? तर कष्ट करता यावेत म्हणून ! पुन्हा कष्ट कशासाठी करतात ? तर पैसे मिळवण्यासाठी ! ते पैसे कशासाठी मिळवतात ? तर ऊर्जेचे पुरुत्पादन करण्यासाठी !
आणि हे असंच चालू आहे , महिन्यांमागून महिने , वर्षामागून वर्षे, आयुष्यभर !!
________________
या साऱ्या वर्षात ते मुलांना जन्माला घालतात. मग त्या मुलांचं भरणपोषण करतात , त्यांना आजारी पडू देत नाहीत , त्यांना शिक्षण, कौशल्ये शिकवतात.
हे सगळं कशासाठी ?
तर ती मुलं उद्या प्रौढ झाल्यावर कष्ट करून पैसे कमावतील ! कशासाठी ? तर ऊर्जा मिळवण्यासाठी ; ऊर्जा कशासाठी तर कष्ट करण्यासाठी !
म्हणजे परत ऊर्जेचे पुनरुत्पादन करण्यासाठी !
आणि हे चक्र देखील असंच चालू आहे , पिढ्यानपिढ्या ….. शेकडो वर्षे ! ! ! !
________________
एखाद्याला वरकरणी वाटेल , काय लिहिलंय लहानमुलांसारखे ! हे सगळं आम्हाला माहित आहे , जे ऑब्व्हियस तेच लिहिले आहे.
पण तरुणांनो ! ही गंभीर पोस्ट तरुणांना, तरुणांबाबत विचारप्रवृत्त करण्यासाठी आहे !
वर लिहिलेल्या चक्रातून कमीजास्त प्रमाणात प्रत्येक प्राणिमात्र जातो. ते खरं तर बायोलोजिकल चक्र आहे. ते सर्व जीवसृष्टीत आढळतं , प्राण्यांत आढळतं.
परंतु माणसात आणि इतर प्राण्यात मुलभूत फरक काय आहे ? हा फरक आहे माणसाचा मेंदू आणि त्यातून त्याला मिळालेल्या, त्यालाच माहित नसलेल्या प्रचंड क्षमता !!
त्या क्षमतांचा वापर करून माणसाने एक प्रतिसृष्टी उभी केली आहे. संगीत , नृत्य, चित्रकला , नाटक , अनेकानेक कला ! या कला मानव स्वतः परफॉर्म करतो किंवा त्यांचा आस्वाद घेतो ! आणि शब्दाधारित कौशल्ये , अभ्यास , लाखो प्रकारचे चवीचे अन्नपदार्थ , आपल्याला आवडलेल्या तरुण / तरुणीबरोबर रोमांस , सेक्स , लग्न, घर वसवणे , सजवणे , जगभरची भटकंती … ….. काही पाने भरतील , म्हणून थांबतो !
लाखो वर्षाच्या उत्क्रांतीत जवळपास प्रत्येक स्त्री पुरुषाला, त्याच्या मेंदू, मन यातून प्रचंड क्षमता मिळाल्या आहेत.
पण जगातील कोट्यावधी स्त्री पुरुषांमधील किती स्त्री पुरुष त्या मिळालेल्या क्षमता वापरू शकतात ?
किती जण या क्षमता वापरू शकतात ? असतील एक टक्का ! चला दहा टक्के धरू !!
मग तेच कसे वापरू शकतात ? इतर ऐंशी- नव्वद टक्यांकडे काय मेंदूची क्षमता नसते ? त्यांना नाही वाटत त्या दहा टक्यांसारखे जगावं म्हणून ?
वाटतं ना ! पण इच्छा असून ही माणसं आपल्या क्षमता वापरू शकत नाहीत.
असं का होतं ?
एकदाच नाही तर पिढ्यानपिढ्या असं होत राहतं. पण का ?
यावर विचार नाही करणार ?
_______________
जात , वंश , धर्म , भाषा , देश , प्रांत या माणसाने बनवलेल्या , मॅनमेड गोष्टी आहेत !
त्यांच्याबाबत खऱ्या खोट्या अस्मिता , दुराभिमान यांचं नशापाणी तुम्ही केलं आहे !
या नशापाण्यामुळे तुमची मनं बधीर झालेली आहेत !
त्यामुळे या अशा प्रश्नांची बीजं मनाच्या मातीत रुजतच नाही आहेत !!
ती मनं किमान काही काळासाठी रिफ्रेश कराल ? आणि वर मांडलेल्या प्रश्नावर अंतर्मुख तरी व्हाल ? फक्त काही काळासाठी ?
संजीव चांदोरकर (११ जून २०२५)
ReplyForward Add reaction |
0Shares