/ विचारांशी गद्दारी करणाऱ्या जोगेंद्र कवाडे यांना आंबेडकरी जनतेने काल धडा शिकवला , आदिवासींचे आदिवासित्व नाकारणारया मंत्री महोदय अशोक उईके साहेबांना जाब कोण विचारणार…..?
विचारांशी गद्दारी करणाऱ्या जोगेंद्र कवाडे यांना आंबेडकरी जनतेने काल धडा शिकवला , आदिवासींचे आदिवासित्व नाकारणारया मंत्री महोदय अशोक उईके साहेबांना जाब कोण विचारणार…..?
जोगेंद्र कवाडे काल एका कार्यक्रमाला उपस्थित होते व ते बोलायला उभे राहताच त्यांना मनाई करायला आंबेडकरी जनता पेटून उठली. आंबेडकरी लोकांनी कवडेंना एक शब्द बोलू दिला नाही. कारण काय तर कवाडेंच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी ने आरएसएस च्या माधव गोलवलकरला अभिवादन करणारे बॅनर्स काही दिवसांपूर्वी लावले होते….! आरएसएस ला अश्या प्रकारे गोंजारणे ही बाब आंबेडकरी विचारांशी गद्दारी आहे हे लक्षात घेऊन आंबेडकरी जनतेने जोगेंद्र कवाडेंना धडा शिकवला व आंबेडकरी विचारांची आठवण करून दिली. समाजाची प्रतिष्ठा , विचारांची प्रतिष्ठा एक व्यक्तीच्या सत्तेच्या हव्यासापेक्षा अधिक महत्त्वाचे असते हे आंबेडकरी जनतेने दाखवून दिले.
आता इकडे मंत्री महोदय अशोक उईके साहेब यांनी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवसाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या म्हणजे जगभरातल्या आदिवासींच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस आदिवासी विभाग मार्फत साजरा करणे तर दूर , त्यांनी आदिवासी जनतेला साध्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. आदिवासी दिवस साजरा न करण्याचे कारण म्हणजे मंत्री महोदय उईके साहेब यांच्या आरएसएस ह्या संघटनेची विचारधारा होय….! आरएसएस आदिवासींना आदिवासी मानत नाही तर वनवासी समजते. आदिवासी नव्हे तर इथले सगळे लोक इथले मूळचे आहेत असे आरएसएस मानते व त्यातून आदिवासींचे आदिवासीत्व नाकारते. ह्याच विचारा मुळे मंत्री महोदय आदिवासी दिवस साजरा करत नाहीयेत हे स्पष्ट आहे. आपल्या संघटनेच्या विचारांच्या साठी मंत्री महोदय संपूर्ण आदिवासी समाजाचे अस्तित्व ….. अस्मिता नाकारत आहेत व आदिवासी जनतेचा घोर अपमान करत आहेत. ही बाब अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे…. संतापजनक देखील आहे.
एकंदरीत आदिवासी अस्मिता व अस्तित्व टिकवायचे असेल तर आदरणीय मंत्री महोदयांना जाब विचारणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व २५ आदिवासी आमदार , चार खासदार, माजी आमदार व खासदार आणि एकूण सर्व आदिवासी संघटनांनी मंत्री महोदयांस स्पष्ट इशारा देण्याची गरज आहे. आदिवासी दिवस साजरा करू शकत नसाल तर तुम्ही मंत्री राहणे काय कामाचे हे त्यांना विचारावे लागेल…. एक व्यक्तीच्या व त्यांच्या संघटनेच्या विचारधारेसाठी संपूर्ण आदिवासी समाजाचे अस्तित्वच कुणी नाकारत असेल तर ते भयंकर आहे आणि त्याबद्दल गप्प बसून राहणे चालणार नाही.
ज्याप्रमाणे आंबेडकरी जनता विचारांवरील घाला सहन करत नाही त्याप्रमाणे आदिवासी समाजाने सुद्धा आपले विचार , अस्मिता आणि अस्तित्व यासाठी संबंधितांना निर्भीडपणे जाब विचारला पाहिजे.
डॉ. संजय दाभाडे , पुणे ….. 9823529505 sanjayaadim@gmail.com