- 47
- 1 minute read
राज ठाकरेंना सोबत घेतल्यानेच उद्धव सेनेचा बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सुफडासाफ…!
मुंबई महानगरपालिका निवडणुक निकालाचा कल काय असेल ? हे बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीचे निकाल ठरवतील , अशा चर्चेच्या गदारोळात पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव व राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला. बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची ही निवडणूक खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम होती. बेस्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असून बेस्टमधील ३० हजारांच्या आसपासचे सर्व कर्मचारी हे १०० % टक्के मराठी आहेत. त्यामुळे या निकालाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, मराठी माणसांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या युतीला नाकारले आहे.
खरे तर उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे वाटणारे मूठभर लोक असून ते मराठी माणसांचे नेतृत्व करीत नाहीत. आपले हित संबंध जपण्यासाठी ते हा दोन ठाकरेंना एकत्र आणण्याचा सतत प्रयत्न करीत आलेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या व मराठी माणसांची अस्मिता ठरलेल्या शिवसेनेतून बाहेर पडून तिच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय उभा करणाऱ्या राज ठाकरेंना मराठी माणसांच्या मनात काडीची ही जागा राहिलेली नाही. बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीतील दारुण पराभवाचे हे एक प्रमुख कारण आहे.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही उद्धव व राज ठाकरे ही युती झाली, तर हाच निकाल पदरी पडणार आहे.
राज्य सरकारने पहिल्या इत्तेपासून हिंदीची सक्ती केल्यानंतर राज्यातील मराठी माणूस सरकारच्या विरोधात उभा राहिला. सरकारच्या विरोधात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरला. त्याने कुठल्या नेत्यांची वाट पाहिली नाही. आपल्या मराठी भाषेच्या अस्मिताने त्याच्याच बळ निर्माण केल्याने त्याला कुठल्या नेत्याची ही गरज वाटली नाही. हे आपण गेल्या काही दिवसांपूर्वीच पाहिलेले आहे. पण मराठी माणसांच्या पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यात आपली होरपळ होऊ नये म्हणून उद्धव व राज ठाकरेंना एकत्र यावे लागले. एकत्र आलेल्या या दोन ठाकरेंनी आपणच महाराष्ट्राचे मालक आहोत, या थाटात वरळीत एक विजयी मेळावा घेतला. मराठी भाषेचे संवर्धन व अस्मितेसाठी मराठी माणसांनीच सुरू केलेल्या आंदोलनाचा इव्हेंट करून ते आंदोलन संपविण्याचा घाट म्हणजे हा विजयी मेळावा होता.
आंदोलने अशा प्रकारे होत नसतात. ती रस्त्यावर लढायची असतात. पण मराठी भाषा, मराठी अस्मिता व मराठी माणसांच्या न्याय, हक्काच्या लढ्याला राज ठाकरेंनी इव्हेंट बनविले आहे. त्यामुळेच मराठी माणूस करमणूक म्हणून त्यांचा कार्यक्रमाला हजेरी लावतो. राज ठाकरेंनी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या केलेल्या नकलावर टाळ्या वाजवतो व घरी निघून जातो. निवडणुकीत मतदान करायची वेळ येते तेव्हा त्याला रेल्वे इंजिन दिसत नाही. कारण राज ठाकरेंकडे तो राजकीय नेता म्हणून पाहत नाहीतर नकलाकार म्हणून पाहतो. ही वस्तुस्थिती आहे. त्या शिवाय राज ठाकरेंच्या बदलत्या भुमिका ही या मराठी माणसांनी पाहिल्या आहेत. ” बिनशर्त पाठिंबा ” आणि ” मोदी पुराण, गुजरातचा विकास ” हा राजचा शो ही मराठी माणसांनी पाहिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंसोबत मराठी माणूस उभा राहूच शकणार नाही, हे उद्धव ठाकरे यांनी समजून घेतले पाहिजे.
शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभलेले उद्धव ठाकरे मात्र आयत्या बिळावरचे नागोबा कधीच बनले नाहीत. शिवसेनेची सूत्र हाती आल्यानंतर त्यांनी भाजपच्या पाशवी सत्ता लालसेच्या विरोधात बंड केले. २०१४ साली तर त्यांनी भाजप विरोधात निवडणूक ही लढविली. तर २०१९ मध्ये युतीसोबत निवडणूक लढवून ही ते वेगळे झाले. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारलेले कडवे हिंदुत्व ही त्यांनी सोडून दिले व प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांवर शिवसेनेला मार्गस्त केले. शिवसेनेचे भले ही दोन तुकडे झाले असेल, शिवसेना कमजोर झाली असेल, पण उरलेल्या शिवसेनेला आपल्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रीय ओळख व मान्यता मिळवून दिली आहे. त्या उलट राज ठाकरेंचे आहे. राज ठाकरे भाषिक व प्रांतीय राजकारणात अडकले असून अतिशय कडवेपणाने ते राजकारण करीत आहेत. त्यामुळे उद्धव व राज ठाकरेंचे राजकीय मार्ग पूर्णतः वेगळे असल्याने हे दोन ठाकरे प्रामाणिकपणे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. हे राज्यातील जनतेला माहित असल्यानेच दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी त्यांना संयुक्तपणे यश येणार नाही. बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे.
आपले राजकीय मार्ग वेगळे आहेत, हे उद्धव व राज ठाकरे यांना ही माहित असल्याने दोन्हींकडून ही युतीसाठी कुणी अतिउत्साही वाटत नाहीत. दोन्हीकडील दुसऱ्या फळीतील नेते ही यासंदर्भात उत्साही नाहीत. उद्धव व राज ठाकरे एका व्यासपीठावर आल्यापासून दोघांमध्ये युती व्हावे म्हणून काहीच प्रयत्न झालेले नाहीत. अन् बेस्टच्या निकालाने तर ती शक्यता ही आता दुसर होण्याची शक्यता आहे.
भाजपसोबतची युती तोडून इंडिया आघाडीत ( महाविकास आघाडीत) सामिल होण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर शिवसेनेच्या परंपरात मतदारांसोबतच मुस्लिम व दलित मतदार उद्धव ठाकरेंच्या समर्थनात उतरला आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याच मतदारांनी उद्धव सेनेला तारले आहे. हे अगदी स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेंची सेना इंडिया आघाडीची घटक असल्याने मुंबई व आसपासच्या उत्तर भारतीय मतदारांनी साथ दिली आहे. अशा राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती केली, तर हा मुस्लिम, दलित व उत्तर भारतीय मतदार पुन्हा उद्धव सेनेपासून दूर जाईल. आजच्या परिस्थित ही जोखीम उठविण्याची हिंमत उद्धव सेना करणार नाही.
मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आणि राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाधानकारक प्रदर्शन करण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेऊन नव्हेतर साथ सोडून उद्धव सेनेला वाटचाल करावी लागेल. राज्यातील सरकारच्या विरोधातील एक प्रमुख चेहरा म्हणून आज उद्धव ठाकरेंची ओळख निर्माण झालेली आहे. ती ओळखच उद्धव ठाकरेंना पुन्हा उभारी देईल. शिवसेनेची विस्कटलेली घडी घडी पुन्हा व्यवस्थित करेल.
…………………………….
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश