- 44
- 1 minute read
म व्ह तू र ‘ च्या प्रकाशनानिमित्ताने !
सुरेश धनवेंचा 'मव्हतूर' हा कथासंग्रह आदिवासींच्या भावविश्वाचा हृदयस्पर्शी अविष्कार! .. प्रा.डॉ. रविप्रकाश चापेक
“जखम” चारोळी संग्रह, “अस्वस्थ मनाचे बंड” आणि “मुक्त मनाच्या तळातून…” या तीन कविता संग्रहानंतर मव्हतूर या कथा संग्रहाच्या रुपाने सुरेश सायत्री किसन धनवे यांचे चौथे पुस्तक रसिक वाचकांच्या हाती सुपूर्द केल्या जात आहे.हा कथासंग्रह
वाचल्यानंतर वाचक;
धनवे सरांच्या कविता संग्रहांप्रमाणेच या कथांनाही उदंड प्रतिसाद नक्कीच देतील असा मला विश्वास वाटतो.
या संग्रहातील नऊही कथा ग्रामीण भागातील अस्सल बोली भाषेत असल्यामुळे त्यातील संवादातून ग्रामीण मातीचा गंध येतो. ज्यांचे वय आज साधारणतः साठ वर्षापेक्षा जास्त आहे त्या वाचकांना तर ह्या कथा वाचून आपले गाव आठवल्या शिवाय राहाणारच नाही.या संग्रहातली प्रत्येक कथा ही ग्रामीण जीवनाचे प्रतिनिधीत्व करते. पात्रांच्या तोंडी आलेले संवाद जसेच्या तसेच ग्रामीण भाषेत असल्यामुळे आपण विसरत चाललेले अनेक शब्द आपल्याला या कथांमधे आढळणार आहेत.आजच्या पिढीतीतील मुला – मुलींना तर ह्या शब्दांचा अर्थही कळणार नाही कदाचित !
भाषा शास्त्राच्या
अभ्यासकांनाही हा संग्रह उपयुक्त ठरेल असे वाटते.
एकदा वाचकाने कथा वाचायला सुरुवात केली की, ती पूर्ण वाचल्याशिवाय वाचक सोडणारच नाही इतकी प्रत्येक कथा उत्सुकता वाढवत नेणारी आहे ! काही कथा वाचतांना तर नक्कीच डोळे पाणावतीलही !उदा. ‘ सुऱ्या ‘ ‘ विहिरीची तेरवी ‘ ह्या कथा.
या संग्रहात मांडलेले सामाजिक जीवन,बोली भाषा हे खास करुन पुसद, उमरखेड, महागाव
ह्या वैदर्भीय तालुक्यातील आहे. सुरेश धनवे हे मुळातच पुसद तालुक्यातील हर्षी या गावचे आहेत. ते स्वतः आदिवासी आंध जमातीचे असल्यामुळे या
संग्रहातील प्रत्येक कथा ही आदिवासी आंध समाजाच्या वास्तविक जीवनाचा एक भाग आहे हे रेखाटण्यात त्यांचे अनुभव कौशल्य सत्यात उतरल्याचे दिसते आणि म्हणूनच ती ग्रामीण आदिवासी भाषेची नाळ घट्ट पकडून आहे.
” विहिरीची तेरवी” काबाडकष्ट करून खोदलेली विहीर आपल्या मायबापासारखीच आपल्याला जीवदान देत असते.ती विहीरच जेव्हा रेल्वे रस्त्याच्या खाली बुझवली जाते.तेंव्हा तिला वाचविण्यासाठी बंठ्याने केलेली धडपड आणि शासनाच्या कठोर नियमांमुळे बंठ्याच्या हाती आलेली निष्फळता.त्यातच सख्या बहिनींनी रेल्वेच्या पैशात नातं तोडून मागितलेला हिस्सा, इत्यादी वाचकाचे मन खिन्न करणारे आहे.
“सुऱ्या” या कथेत
पतीने आत्महत्या केल्यानंतर हलाकीच्या आर्थिक परिस्थितीत सुऱ्याच्या शिक्षणासाठी सायत्रीने केलेला संघर्ष ! माणसाचे मन हेलावून सोडणारा आहे.
”मव्हतूर” या कथेतील मव्हतूरही आंध आदिवासी समाजाची पुर्नरविवाहाची पध्दत आहे. आंध समाजात दीर -भावजई किंवा भासरा आणि लहान भावाची बायको असा विवाह होत नाही म्हणजे भावकीतल्या भावकीत विवाह होत नाही.तसे चुकून अनैतिक संबंध आलेच तर त्या स्त्रीचा काडीमोड करून जमातीतल्याच दुसऱ्या व्यक्ती सोबत एका रात्री साठीका होईना मव्हतूर ( पुनर्विवाह ) लावावा लागते म्हणजे तिचे आडनाव बदलले जाते. समाजाने न्यायनिवाडा करण्यासाठी नेमून दिलेल्या मेहतऱ्याची भूमिका यासाठी महत्वाची मानली जाते.मेहतऱ्या हा सर्वमान्य न्यायाधीश म्हणून समाजाने स्वीकारलेला असतो. तत्कालीन आदिवासी समाज जीवनाची न्यायव्यवस्था अधोरेखित व्हावी म्हणूनच धनवे सरांनी या संग्रहाला मव्हतूर हे समर्पक नाव दिलेले दिसते.
दुसऱ्या कथेतील पार्वती वर पाटलाच्या पोराने वारंवार केलेला अत्याचार. त्यातून तिला राहिलेले दिवस, मग निर्माण झालेल्या भानगडी. ह्या वाचकाचे मन खिळून ठेवतात.
”लोनदरी” च्या जत्रेतला बकऱ्याचा नवस,शेंडीने बैलगाड्या ओढण्याचा अघोरी प्रयत्न आणि त्यातून पसरत चाललेली अंधश्रध्दा. हा आदिवासी जीवनाच्या अज्ञान वा देव भोळेपणा सारख्या मनोवृतीचा विचार करायला लावणारा एक भाग आहे.
पाटलाच्या पडक्या वाड्यात शारीरिक भूक भागवण्याच्या मोहात पडून फसलेली सरसवती,
गिरजी आणि त्यातून निर्माण झालेले पेचप्रसंग, त्यातही मेहतऱ्याची न्यायदानाची भुमिका हे सर्व ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे आहे. म्हणूनच ह्या कथा चोखंदळ वाचक तथा समिक्षक यांना नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे.
वरील सर्व कथा वास्तविक जीवनाचा भाग असल्यामुळे आज हयात असणाऱ्या काही वाचकांना कथेतील पात्रांची नावे,त्यांचे स्वभाव,कथेतील घटना ह्या आपल्याशी संबंधीत आहेत असे वाटेल कदाचित ! पण तसे नाही.असे साधर्म्य वाटल्यास तो केवळ एक योगायोग समजावा अशी स्पष्ट कबुली सुरेश धनवे सरांनी मनोगतात देवून संयम दाखविला त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.
परिस प्रकाशन पुणे यांनी हा कथासंग्रह अधिक आकर्षक पध्दतीने तयार केला आणि त्याला अरविंद शेलार यांनी अत्यंत समर्पक मूखपृष्ठ देवून कथासंग्रहाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसते.
एकूनच या सर्व मुद्यांचा विचार करता मव्हतूर हा कथासंग्रह वाचनीय आहे. तो नक्कीच वाचकांच्या पचनी पडेल यात शंका नाही.
पाठराखण : – प्रा.डॉ. रविप्रकाश चापके – श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसद.
‘ मव्हतूर ‘ कथासंग्रह
लेखक : – सुरेश सायत्री किसन धनवे
परिस प्रकाशन पुणे
किंमत रू. ३०० /