• 56
  • 1 minute read

अनिल यशवंते गेले!..

अनिल यशवंते गेले!..

सुप्रसिद्ध आंबेडकरी कवी, गायक स्मृतीशेष श्रावण यशवंते यांचे मोठे पुत्र अनिल यशवंते हे काल रात्री अकरा वाजता कस्तुरबा रुग्णालयात अल्पशः आजाराने निधन पावले.

           तसे अनिल यशवंते आणि आम्ही समवयस्क. अगदी खास मित्रच म्हणाना! पण आम्ही कधीच एकमेकांना अरे, तुरे म्हटले नाही. याचं एकमेव कारण म्हणजे, अनिल यशवंते प्रत्येकाशी अहो, जाहो असेच म्हणायचे. त्यांच्यापेक्षा लहान, मोठा कोणीही असो, अनिल यशवंते त्या प्रत्येकांशी आदरपूर्वकच संबोधन करायचे. मी सातरस्त्याला, जयवंत कांबळे महालक्ष्मीला, सुमेध जाधव लव्हलेनला, मिलिंद सुर्वे चांदी गल्लीत आणि अनिल यशवंते काळाचौकीला रहात असल्याने आम्ही वारंवार एकमेकांना भेटायचो. अनिल यशवंतेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते स्वभावाने अत्यंत जिद्दी, तत्त्वनिष्ठ आणि स्पष्टवक्ते होते. तत्वाशी तडजोड करणे, त्यांना कधीच मान्य नसायचे. अशा वेळेस त्यांची अनेकांशी पराकोटीची वादविवाद व भांडणेही व्हायची. आंबेडकरी विचाराचे ते परिपूर्ण अभ्यासकही होते. बाॅलिवूड हे किती अवास्तव आहे, याची कितीतरी उदाहरणे ते मला सांगायचे. उदाहरणार्थ पुरब और पश्चिम या चित्रपटातला हिरो मनोजकुमार शेतकरी दाखवलाय. तो शेतात नांगरणी करताना “मेरे देश की धरती सोना उगले….” हे गाणं म्हणतो. अनिल यशवंते म्हणायचे की, मनोज कुमार सारखा गोरापान, गुबगुबीत गालाचा, राजबिंडा शेतकरी संपूर्ण देशात एकही शोधून सापडणार नाही. या एका उदाहरणावरून अनिल यशवंतेंचं किती सुक्ष्म निरिक्षण होतं याचा प्रत्यय आपणास येऊ शकतो. दहा वर्षापूर्वी ॲड. संघराज रुपवते, सुनील खोब्रागडे, बबन सरवदे व माझ्यासारख्या असंख्य अस्वस्थ आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जेंव्हा ‘बुध्दिस्ट रिपब्लिकन’ स्थापन केली त्यात अनिल यशवंतेंचा सिंहाचा वाटा होता. बाबासाहेबांचं ‘मुक्ती कोण पथे’ या भाषणाचा त्यांनी आयुष्यभर असंख्य भाषणे देऊन प्रचार आणि प्रसार केला. १० जानेवारी २०२५ चा शहिद भागवत जाधवांचा ‘शहिद दिन’ साजरा करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती. या कार्यक्रमात कोणताच मार्क्सवादी असता कामा नये याची त्यांनी काटेकोर दक्षता घेतली होती. प्रसिध्दी पत्रकातही त्यांनी बुध्दांना प्रमुख स्थान दिले होते. दरवर्षीच्या डफलीच्या गाण्याऐवजी त्यांनी पारंपरिक आंबेडकरी गायन पार्टी ठेवली होती. या कार्यक्रमालाही प्रचंड गर्दी झाली होती. सूत्रसंचालनही अनिल यशवंते यांनीच केले. पण शेवटी त्यांच्या सडेतोड स्वभावामुळे काही मंडळी दुखावली गेली. त्यानंतर याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात त्यांनी श्रावण यशवंतेचा स्मृतीदिन काळाचौकीत आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही, बबन सरवदे, गजानन गावंडे व संदेश कर्डक गेलो होतो. नेहमीप्रमाणेच आम्ही तेथे चळवळीच्या कविता म्हणून श्रावण यशवंतेना अभिवादन केले. मला वाटते अनिल यशवंतेची आणि आमची झालेली प्रत्यक्ष अशी ही शेवटची भेट. आणि आज अचानक ही दुःखद बातमी कळली. खुप वाईट वाटले. आमच्या उठाव साहित्य मंचाच्या सर्व आंबेडकरी कवींच्या वतीने या आमच्या कडव्या भिमसैनिकाला आदरांजली वाहतो. जयभीम!

– विवेक मोरे
अध्यक्ष
उठाव साहित्य मंच

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *