• 258
  • 1 minute read

ब्राह्मणवादी संघाच्या खोडसाळपणाचा सही नसलेले चिटोरे पत्रक काढून निषेध का ? माफी व अन्य कारवाईचे संकेत का नाहीत….?

ब्राह्मणवादी संघाच्या खोडसाळपणाचा सही नसलेले चिटोरे पत्रक काढून निषेध का ? माफी व अन्य कारवाईचे संकेत का नाहीत….?

निमंत्रणामागील गौडबंगाल समोर आले पाहिजे, मी आंबेडकरवादी इतके म्हणून विषय कसा संपणार.... ?

 

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोडसाळपणा करीत असेल, असे षडयंत्र करीत असेल, तर केवळ असे चिटोरे पत्रक काढून निषेध व विरोध करणे चालणार नाही. हे पत्रक ही फेक असल्याचे आता समोर येत आहे. हा असा उद्योग कोण व का करीत आहेत. हे करण्यामागे कुणाचे हात व पाय आहेत की आणखी काही हितसंबंध याचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच हा प्रकार बदनामी करण्याचा असल्याने यासंदर्भात संघाला आणि ज्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या, त्या वर्तमानपत्रांना कायदेशीर नोटीसा धाडल्या पाहिजेत. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कमल रामकृष्ण गवई या कायदेशीर कारवाई करणार आहेत का ? हा प्रश्न असून आंबेडकरी समाजाला त्याची प्रतिक्षा नक्कीच आहे. पण असे काही होणार नाही.
       संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अमरावती शाखेच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी मुख्य अतिथी म्हणून संघाने आपल्यासाठी योग असलेल्या व्यक्तीची निवड करून निमंत्रण ही पाठविले. त्यानंतर त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या आणि विरोध सुरू झाला.. विरोध वाढू शकतो याची प्रचिती आल्यावर कमल गवई यांनी एक चिटोरे पत्रक काढले. त्या पत्रावर त्यांची सही ही नाही. खरे तर ते पत्रक अधिकृतपणे, संपादकांच्या नावे वृत्त प्रसिद्ध झाले त्या वर्तमानपत्राकडे पाठवायला हवे होते. पण तसे काहीच झाले नाही. का झाले नाही, हे कळत नाही.
आपल्याशी संपर्क न साधता संघाने मुख्य अतिथी म्हणून आपले नाव निमंत्रण पत्रिकेवर छापले आहे, असा सरळ दावा या पत्रात कमल गवई यांनी केलेला आहे.मात्र संघाचा हा खोडसाळपणावर कारवाई करण्याचे कुठलेच संकेत त्या देत नाहीत. याचा अर्थ काय समजायचा. या प्रकरणाची आंबेडकरी समाजाने दखल घेतली नसती, विरोध झाला नसता, तर सर्व काही गुण्या गोविंदाने सुरू राहिले असते, असे यामुळे स्पष्ट होत आहे.


      भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे महानायक महात्मा गांधी यांनी संघाच्या हिंदुत्ववादी अजेंड्याला कधीच महत्त्व दिले नाही. गांधी संघाच्या विरोधात उभे राहिले. लोकशाही राज्य व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या पंडित नेहरू व डॉ. आंबेडकर यांच्या मागे गांधी खंबीरपणे उभे राहिले. त्याच मुळे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने हिंदुत्ववाद्यांनी त्यांची गोडसे करावी हत्या केली. आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू व गांधी परिवाराला संघाने सतत टार्गेट केले. आज ही केले जात आहे. मात्र महात्मा गांधी, नेहरू व गांधी परिवाराकडे संघाच्या हिंदुत्ववादी अजेंड्याचा विरोध करणारा कुठलाही कृती कार्यक्रम व अनुयायी वर्ग नसल्याने संघाचे काहीही वाकडे होऊ शकले नाही. मात्र तसे संविधान व स्वतंत्र भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही. अथवा ब्राह्मणी संघ त्यांना टार्गेट करू शकत नाही. डॉ. आंबेडकरी विचार व कार्यामुळे साऱ्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या समोर कायमस्वरूपी आव्हान उभे केलेले आहे.
        महात्मा गांधी, नेहरू व गांधी परिवारावर टीका केल्याने संघाचे काहीही नुकसान होताना दिसत नाही. मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचाराने व कार्यामुळे या देशात प्रबुद्ध नागरिक व समाज उभा केला आहे. तो समाज संघाच्या हिंदुत्ववादी म्हणजे विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात सर्व पातळ्यांवर लढत आहे. त्याशिवाय डॉ. आंबेडकर यांनी या देशाला बुद्धाच्या विचारांचा व धम्माचा वारसा पुन्हा दिला आहे. भारत हा बुद्धाचा देश आहे, हे जगभराने मान्य केलेल्या सत्याला,भूमिकेला या देशात पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले असून विषमतावादी व मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेतून ज्यांना मुक्ती हवी आहे, त्यांच्यासमोर जगभरात मान्यता असलेल्या व आधुनिक युगातील विज्ञानवादी भूमिका स्वीकारणाऱ्या बुद्ध धम्माचा पर्याय उभा केला आहे. याचा फटका मनुवादी ब्राह्मणी धर्माला व त्याच्या ठेकेदारांना रोजच बसत आहे. त्यामुळे इच्छा असून ही संघ, भाजप व हिंदुत्ववादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाद करीत नाहीत.

डॉ . आंबेडकर यांना विरोध करताच संघ देशविरोधी ठरतो म्हणून संघ डॉ. आंबेडकर यांचा नाद करीत नाही…..

       बुद्ध, फुले यांच्यानंतर डॉ. आंबेडकरच असे आहेत की, त्यांनी मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेला गाडण्याचे काम केले आहे. इथल्या धर्म व्यवस्थेचा खरा चेहरा हा ब्राह्मणी आहे. मात्र तो फारच अल्पसंख्यांक असल्याने या व्यवस्थेने हिंदुत्व हा मुखवटा धारण केला असून त्यास नागडे करण्याचा एक कृतिशील कार्यक्रम डॉ. आंबेडकर यांनी दिला आहे. त्याशिवाय डॉ. आंबेडकर यांनी या देशाला संविधान, धर्म निरपेक्षता, लोकशाही व अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज दिला असून या साऱ्या गोष्टी आज भारतीय समाजाच्या आत्मा व अस्मिता झाल्या आहेत. संविधान म्हणजे डॉ. आंबेडकर, धर्म निरपेक्षता म्हणजे आंबेडकर, लोकशाही म्हणजे डॉ. आंबेडकर व तिरंगा ध्वज म्हणजे ही डॉ. आंबेडकर. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या टीका अथवा त्यांना विरोध करणे म्हणजे संविधानाला, धर्मनिरपेक्ष व्यवस्थेला, लोकशाही व राष्ट्रीय ध्वजाला विरोध करणे झाले आहे. संघाची ही फार मोठी अडचण झाली असून त्यापैकी एका ही गोष्टीला हिंदू राष्ट्राची निर्मिती करण्याचा अजेंडा हाती घेतलेल्या संघाने विरोध केला की संघ, पूर्ण संघ परिवार व भाजप देश विरोधी ठरतो. अन् भारतीय समाज साहजिकच संघाच्या विरोधात उभा राहतो.
महात्मा गांधी, नेहरू… गांधी परिवारावर टीका केल्यानंतर संघाचे काही नुकसान होत नाही. उलट संघ यांच्या संदर्भांत खोटा प्रचार करीत असल्याने संघाचा फायदाच झाला आहे. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या नादी लागणे संघाला परवडणारे नाही. त्यामुळे संघ डॉ. आंबेडकर यांच्या वाट्याला जात नाही. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ व भाजपच्या काही नेत्यांनी केवळ संविधान विरोधी व बदलण्याबाबत काही विधाने केली होती. त्याचाच फटका बसल्यामुळे भाजप पूर्ण बहुमतात सत्तेवर आला नाही. इंडिया आघाडीने संविधान हाच प्रमुख मुद्दा बनवून भाजपला रोखण्याचे यशस्वी काम केले आहे. त्यामुळे भाजपला कळून चुकले आहे की, डॉ. आंबेडकर यांच्याशी पंगा खूप महागात पडतो.

निमंत्रणामागील गौडबंगाल समोर आले पाहिजे, मी आंबेडकरवादी इतके बोलून विषय संपणार नाही…..

      असे ही नाही की, संघ,विश्व हिंदू परिषद, हिंदुत्ववादी अन्य संघटना यांनी सरळ सरळ कधीच डॉ. आंबेडकर यांचा विरोध केला नाही. देश स्वातंत्र्य होण्या पूर्वी पासून ते आजपर्यंत या धर्मांध शक्तींनी सतत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना व कार्याला विरोध केला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला, आरक्षण व्यवस्थेला, लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मागणाऱ्या मागणीस संघ व हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीर, रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. त्याशिवाय संविधान, लोकशाही, तिरंगा ध्वजाला ही विरोध केला आहे. धर्म निरपेक्ष व्यवस्था आणि हिंदू कोड बिलाचा विरोधात तर सर्व हिंदू समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उभा करण्याचे काम या धर्मांध शक्तींनी केले आहे. मात्र यामध्ये या धर्मांध शक्ती नेहमी पराभूत झाल्या असून त्यांचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे या शक्ती आता शहाण्या झाल्या असून त्यांनी सरळ संघर्ष न करता आठवले, कवाडे, गवई व अन्य छोट्या मोठ्या आंबेडकरी गटांना सत्तेचे तुकडे देवून व दाखवून प्रबुद्ध अशा आंबेडकरी चळवळीत, पक्षात, संघटनांमध्ये व समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केलेला असून त्यात ते यशस्वी होत ही आहेत.
       रामकृष्ण सूर्यभान गवई हे तसे आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख नाव व केंद्र, गवई परिवाराकडे आज दीक्षा भूमीची सूत्रे आहेत. त्यात भाजपचा व संघाचा सरळ सरळ शिरकाव आहे. गवई यांचे स्मारक सरकार अमरावतीत उभे करीत आहेत. गवई यांच्या नावे असलेल्या शैक्षणिक संस्थेला सरकार भरभरून मदत करीत आहे. गेल्या काही वर्षात संघ व गवई परिवाराचे नाते घट्ट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातून हे निमंत्रण आले असावे. तसेच विरोध होताच सहजच Exit ही घेतली जात असावी. या निमंत्रणा मागील गोडबंगाल आंबेडकरी जनतेसमोर आले पाहिजे. मी आंबेडकरवादी आहे, इतके बोलण्याने हे प्रकरण संपणार नाही. हे खरे.

…………………

राहुल गायकवाड
प्रवक्ता व महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश .

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *