“झिरो सम गेम” (Zero Sum Game)

“झिरो सम गेम” (Zero Sum Game)

(पोस्ट थोडी मोठी आहे, पण तरुणांनी वेळ काढून जरूर वाचावी)

समजा दहा मित्र एक एक हजार रुपये घेऊन रमी किंवा तीन पत्ती खेळायला बसले आहेत. म्हणजे सर्वांची मिळून दहा हजार रुपयांची किट्टी तयार झाली आहे. कोणी खिशातून अजून पैसे आणायला परवानगी नाही आहे. त्यांच्यात कोणीही बुकी नाहीये.

रात्रभर खेळल्यावर दहापैकी काही जणांकडे त्यांनी आणलेल्या एक हजार रुपयांपैकी जास्त पैसे जमा झालेले असतात. तर तर काही जणांकडे एक हजार पेक्षा कमी. त्यापैकी काहींनी पूर्ण हजार रुपये गमावलेले असू शकतात.

कोण जिंकले, किती जिंकले, कोण हरले, किती हरले याचा तक्ता बनवला आणि बेरीज केली तर बरोबर दहा हजार रुपये भरेल. एक रुपया कमी नाही की जास्त नाही.

जुगाराच्या अड्ड्यावर हेच होते. फक्त जुगाराच्या अड्याचा बुकी प्रत्येक राऊंडला त्याचे कमिशन काढून घेत असतो. सरकारी किंवा खाजगी लॉटरीमध्ये हेच होत असते. लॉटरी चालवणारे स्पॉन्सर आपले कमिशन काढून घेत असतात. आता सरकारने बंदी आणलेल्या ऑनलाइन गेमिंग मध्ये देखील हेच होत होते.

या सर्व प्रकारात सहभागी झालेल्यांकडून जमा झालेली किट्टी तेवढीच राहते. ती फक्त हरलेल्यांकडून जिंकलेल्यांकडे हस्तांतरित होते. याला “झिरो सम गेम” म्हणतात. पत्ते, जुगार, मटका, ऑनलाईन गेमिंग, लॉटरी किंवा ऑप्शन ट्रेडिंग हे सर्व “झीरो सम गेम”चे प्रकार आहेत.
______

या सर्वात धुमाकूळ घातला गेला आहे भारतातील ऑप्शन ट्रेडिंग बाजारात. सेबीने कारवाई करण्यापूर्वी भारतातील ऑप्शन ट्रेडिंग मध्ये दररोज काही दशलक्ष कोटी रुपयांचे नोशनल व्यवहार होत होते. गेली दहा वर्षे या बाजाराचा आकार दर साल दर शेकडा ५० टक्क्यांनी वाढत होता.

भारतासारख्या गरीब विकसनशील देशातील ऑप्शन ट्रेडिंग बाजाराचा वाटा एकूण जागतिक ऑप्शन ट्रेडिंग बाजारात किती असेल असे वाटते ? जागतिक बाजाराच्या ८० टक्के ! सेबीच्या हस्तक्षेपानंतर तो आता थोडा बहुत कमी झाला आहे.

यामध्ये तरुणांचा सहभाग अजूनही खूप मोठा आहे. यातील कोणालाही ऑप्शन, फ्युचर, फॉरवर्ड कव्हर, डेरिव्हेटिव्ह मार्केट यामधील मॅथेमॅटिकल फॉर्मुले असतात हे देखील माहित नाही.
_____

कोणत्याही झिरो सम गेम मध्ये भाग घेणारे अर्थात पैसे कमावण्यासाठी त्यात सहभागी होतात हे उघड आहे. आता मजा बघा. जे जे जिंकतात ते निमुटपणे जिंकलेले पैसे घेऊन घरी जात नाहीत. आधी आणलेले मुद्दल आणि जिंकलेले पैसे फिरून एकदा घालून अजून पैसे जिंकू असे म्हणून ते बैठकीतून उठत नाहीत. जे हरतात ते झालेला तोटा भरून काढू म्हणून अजून पैसे घेऊन येतात. दागिने, जमिनी विकतात. कर्जे काढतात. कर्जामध्ये अखंड बुडतात आणि आत्महत्या देखील करतात.

तुम्ही जितका जास्त वेळ कोणत्याही “झिरो सम गेम” मध्ये स्वतःचे पैसे लावाल, उठून जाणार नाही, तितकी तुम्ही पैसे गमावून बसण्याची प्रोबबिलिटी वाढत जाते.

पैसे कमवतात फक्त बुकी , स्पॉन्सर्स , ब्रोकर्स इत्यादी
_________

गणपतीला आणि दिवाळीत आणि कुटुंबांमध्ये पैसे लावून पत्ते वगैरे खेळले जातात. मी देखील शाळा कॉलेजच्या मित्रांबरोबरच्या पिकनिकला खेळतो. त्यात धम्माल आहे. पण तो प्रकार पूर्णपणे वेगळा.

ज्यावेळी “झिरो सम गेम”ची इंडस्ट्री कॉर्पोरेट / वित्त भांडवल चालवते तो भिन्न प्रकार आहे. त्याचे प्रवर्तक असतात. त्यांनी भांडवल घातलेले असते. त्या भांडवलावर त्यांना नफा कमवायचा असतो.

असे असले तरी त्यांचे भांडवल फक्त त्यांनी घातलेला पैसा नसतो, तर या गेम मध्ये सहभागी होणाऱ्यांची मानसिकता हे त्यांचे प्रमुख भांडवल असते. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त पैसे घेऊन गेम खेळावा म्हणून, कोणीही खेळण्याचे बंद करू नये म्हणून ते सर्व क्लुप्त्या करतात. त्याच्या मार्केटिंगसाठी भरपूर भांडवल ओततात

मी येथे “झिरो सम गेम”चे नैतिक मूल्यमापन करत नाहीये. मी बेकायदेशीरपणे जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांबद्दल बोलत नाही.

मी विविध झिरो सम गेम चालवणारी कॉर्पोरेटस आणि त्यांच्यावर निगराणी राखणारी “सेबी” सारखे नियमक मंडळे यांच्या बद्दल बोलत आहे. राज्य आणि केंद्र शासनाबद्दल बोलत आहे.

ते कोठे असतात ? ज्यावेळी पुरेश्या उत्पन्नाची साधने नसणारे , भौतिक आकांक्षा चेतवले गेलेले , वैफल्यग्रस्त लाखो तरुण “झिरो सम गेम” खेळण्यात आयुष्य बरबाद करत असतील तर हा समाजाचा , राष्ट्राचा प्रश्न बनतो. नसेल बनत तर बनला पाहिजे.

संजीव चांदोरकर (३० सप्टेंबर २०२५)

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *